शाळेची फी भरली नाही म्हणून मुलांना उभं राहण्याची शिक्षा, पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही मुलांचे फोटो टाकले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
शाळेच्या शुल्कासाठी मुलांना सर्वांसमोर उभं करुन, त्याचा फोटो काढून पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड येथील शाळेत घडला आहे.
आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं या शाळेच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड इथं हिंदूस्थान अँटिबायोटिक्सची शाळा असून ही शाळा आता डेक्कन एज्यूकेशन सोसायटी चालवते.
पण, ही शाळा सरकारी अनुदानित शाळा आहे. हिंदूस्थान अँटीबायोटिक्सनं कंपनीतील कामगारांच्या मुलांसाठी आणि परिसरातील मुलांसाठी ही शाळा सुरू केली होती. पण, कालांतरानं डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ही शाळा चालवायला देण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
याच शाळेत मंगळवारी 26 ऑगस्टला दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
शिक्षिकेनं दुपारच्या सुमारास ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचं शुल्क भरलं नाही त्यांना सर्वांसमोर उभं केलं. त्यांचे फोटो काढले आणि पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करून शाळेचं शुल्क भरण्यास सांगण्यात आलं.
पण, हा प्रकार खूप जास्त अपमानजनक वाटल्याचं एका पालकानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.
गरीब असणं गुन्हा आहे का?
ते म्हणतात, "दुपारीच 72 सदस्य असलेल्या ग्रुपवर फोटो पडले होते. पण, मी सांयकाळी बघितले. तेव्हापासून मला खूप अपमानजनक वाटू लागलं. मुलाला विचारलं काय झालं? तर मुलगा म्हणाला, ज्यांनी फी भरली नाही त्यांना सगळ्यांना उभं ठेवलं. शिक्षिकेनं म्हटलं की, तुम्ही फी भरली नाही म्हणून तुम्ही असे उभे आहात आणि त्या विद्यार्थ्यांनी फी भरली त्यामुळे ते वर्गात बसलेले आहेत."
पुढे ते सांगतात की, "मुलांना असल्या गोष्टी सर्व वर्गासमोर बोलल्यानं आणखीच वाईट वाटलं. शाळेच्या शुल्काबद्दल विद्यार्थ्यांसोबत न बोलता पालकांसोबत बोलायला पाहिजे. पण, वारंवार विद्यार्थ्यांना शुल्कासाठी बोललं जातं."

फोटो स्रोत, Getty Images
"तुम्हाला परीक्षा देऊ देणार नाही अशाही धमक्या देण्यात आल्या होत्या. पण, मुलाला म्हटलं की या महिन्यात मी आजारी होतो, पगार पण झाला नाही. पैसे आले की आपण नक्की पैसे भरू, असं करून मुलाला समजावलं होतं. आम्ही शाळेचे पैसे भरणारच होतो. पचवायचे नाहीच आम्हाला," असंही ते म्हणाले.
हे पालक कंपनीत कामाला जातात. कमी पगारात आपलं कुटुंब चालवतात. शाळा अनुदानित असल्यानं शुल्क फक्त सहा हजार रुपये असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला या शाळेत टाकलं.
पण, या शुल्कासाठी असा त्रास त्यांना सहन करावा लागला.
पुढे ते म्हणतात, "या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी झोपडपट्टीत राहणारे आहेत. सरकारी शाळेपेक्षा थोडी चांगली शाळा म्हणून आम्ही आपल्या मुलांना इथं टाकलं. गरीब असणं गुन्हा नाही. आम्हाला शाळेचे पैसे भरायचे आहेत. पण, शिक्षकांनी शिक्षकांसारखं वागायला पाहिजे. त्यांनी संस्थाचालकांसारखं वागू नये आणि शुल्काबद्दल जे काही बोलायचं आहे ते पालकांसोबत बोलायला हवं.
दोषींवर कारवाई करणार
पालकाच्या एका राजकीय पक्षातील मित्राला ही गोष्ट माहिती झाल्यानंतर ती पुढे आली.
त्यांनी जाऊन महापालिकेत तक्रार दिली. त्यानंतर महापालिकेनं सुद्धा या शाळेच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. चौकशी करून त्याचा अहवाल आयुक्तांना आणि कारवाईसाठी शिक्षण उपसंचालकांना सादर केला जाणार आहे. आम्ही शाळेत जाऊन चौकशी सुद्धा करणार आहोत."
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे काउन्सिल सदस्य आणि शाळा समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे यांनी सुद्धा चौकशी दोषींवर कारवाई करण्यात येईल असं म्हटलंय.
रणपिसे बीबीसी मराठीला म्हणाले, "घडलेला प्रकार चुकीचा आहे. या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























