महाराष्ट्रातील पहिली AI अंगणवाडी, पण लहान वयात VR सेटद्वारे शिकवण्याचा अट्टाहास योग्य आहे का?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"जंगलात मला अस्वल दिसतेय. ते चारा खात आहे. अस्वलला मी पकडलं"
अवघ्या साडेतीन वर्षांच्या वयात डोळ्याला व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट लावून आभासी जग बघणारी युगांती तिच्या बोबड्या भाषेत बडबडत होती.
युगांती सध्या नागपूरच्या वडधामना गावातल्या अंगणवाडीत शिकते आहे. AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटलिजन्सचा वापर होणारी ही देशातील पहिली अंगणवाडी असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अंगणवाडीचं उद्घाटन केलं होतं.
फक्त युगांतीच नाही, तर या अंगणवाडीतील 25 बालकं व्हीआर सेट लावून त्यामधून त्यांना जे जे दिसेल ते सांगतात.
AI अंगणवाडीत नेमकं काय होतं?
बालकांना व्हीआर सेट द्वारे शिकवणं आणि त्यांच्या पोषण ट्रॅकरची माहिती AI द्वारे साठवून मुलांच्या आरोग्याबद्दल सल्ला देणं असं काम या AI अंगणवाडीत चालतं, अशी माहिती नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी दिली.
या AI अंगणवाडीत नेमकं काय केलं जातं हे त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगितलं.
"सर्वसाधारण अंगणवाडीत पॅनल बोर्डवर काही बाबी दाखवल्या जातात. पण, AI अंगणवाडीच्या माध्यमातून आम्ही व्हीआर सेट लावून मुलांना शिकवतो. त्यांच्या आसपास काही नसेल तरी समोर एक आभासी प्रतिमा येते."
"त्यांना जंगलातील काही प्राणी दाखवायचे तर, सिंह चालतो कसा, दिसतो कसा, गर्जना कसा करतो, तो शिकार कसा करतो या सर्व बाबींची मुलांना प्रत्यक्ष अनुभूती येते.
या वयात मुलांचा मेंदू जास्तीत जास्त विकसित होतो. या वयातच मेंदूला अधिकाधिक प्रत्यक्ष अनुभूती देता आली तर त्या लक्षात राहतात. टीव्हीवर काही बघितलं तर इतकं लक्षात राहणार नाही", असंही ते सांगतात.
तसंच पोषण ट्रॅकरचा डेटा हा AI मधून साठवला जाईल. त्यामुळं बालकांचं वजन किती आहे? तो बालक कुपोषित आहे का? कुपोषित असेल तर त्याला कुठला आहार द्यायला हवा? त्याचं वजन वाढवण्यासाठी काय करायला हवं? याचा सल्लाही AI द्वारे घेतला जाणार आहे.

यामुळे आपल्यावरील कामाचा भार काही प्रमाणात कमी होईल असं अंगणवाडी सेविका सरोज कुकडे यांना वाटतं.
त्या म्हणतात, आधी मुलगा कुठल्या वजन गटात बसतो हे आम्हाला पुस्तकावरून काढायला लागायचं. पण, आता ते काम AI द्वारे आपोआप होईल.
पण, 3-6 वर्षांच्या वयात मुलांचा मेंदू विकसित होत असतो. या वयात मुलांना जास्तीत जास्त निसर्गातून कसं शिक्षण देता येईल याकडे लक्ष दिलं जातं.
मग इतक्या लहान वयात मुलांना आभासी पद्धतीनं शिकवण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे?
"अंगणवाडी म्हटलं की खिचडी केंद्र अशी प्रतिमा होती. पण आपलं अंगणवाडी केंद्र त्यापलीकडे आहे. या वयात मुलं खूप काही शिकू शकतात. कारण, त्यांचा मेंदू विकसित होत असतो. या काळात त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाल्या तर त्या खूप प्रभावी ठरून मुलांच्या प्रगतीसाठी फायदा होईल."
"गरीब मुलांना सुविधा मिळत नाही. त्यांना एक जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दर्जाच्या सुविधा त्यांना दिल्या तर त्यांची चांगली प्रगती होईल. त्यामुळे ही AI अंगणवाडी सुरू करण्यात आली," असं कैलास घोडके सांगतात.
इतक्या लहान वयात व्हीआर सेट वापरण्याची परवानगीच नाही
गरीब मुलांना सुविधा देण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी करत असल्याचं अधिकारी सांगत असले तरी इतक्या कमी वयात मुलांना व्हीआर सेट लावून मुलांचं आरोग्य धोक्यात टाकलं जात आहे का? असा प्रश्न आहे.
त्याचं कारण म्हणजे, या अंगणवाडीतल्या 3-6 वर्ष वयोगटातील मुलांना जे व्हीआर सेट लावले जात आहेत ते मेटा कंपनीचे आहेत. पण, स्वतः मेटा त्यांच्या हेल्थ अँड सेफ्टी गाईडलाइन्सनुसार 10 वर्षांच्या खालील मुलांना हे व्हीआर सेट वापरण्याची परवानगी देत नाही.
कारण, या वयोगटातील मुलांसाठी अजून व्हीआर सेट तयार झालेले नाहीत. आता अंगणवाडीत वापरण्यात येणारे व्हीआर सेट हे 10 वर्षांच्या वरील मुलांसाठीचे आहेत. त्यामुळं या लहान मुलांना हे व्हीआर सेट डोक्याला नीट बसतही नाहीत.
हे व्हीआर सेट 10 वर्षांच्या आतील मुलांनी का वापरू नयेत याची कारणंही मेटानं त्यांच्या हेल्थ अँड सेफ्टीच्या गाईडलाइन्समध्ये दिलेली आहेत. ती पुढील प्रमाणे
1. लहान मुलांच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्यामुळे त्यांची मान, डोळे, पाठ आणि ताकद त्यांना सुरक्षितपणे व्हीआर सेट वापरण्याची परवानगी देत नाही.
2. व्हर्च्युअल कंटेटवर लहान मुलं अतिशय तीव्र प्रतिक्रिया देतात. तसेच आभासी जगाला वास्तविक जगापासून वेगळं करणं त्यांच्यासाठी कठीण असतं.
3. व्हीआर सेट वापरताना दृष्टी अंधुक झाली, डोळे दुखत असतील, अस्वस्थ वाटत असेल तर लहान मुलं लगेच व्यक्त होऊन व्हीआर सेटचा वापर थांबवू शकत नाही.
या कारणांमुळे मेटा 10 वर्षांच्या खालील मुलांना व्हीआर सेट वापरण्याची परवानगी देत नाही. तसेच आतापर्यंत या लहान मुलांसाठी व्हीआर सेट सुद्धा तयार झालेले नाहीत.
व्हीआर सेट तयारी करणारी मेटा ही सर्वात मोठी कंपनी आहे. त्यानंतर इतरही कंपन्या व्हीआर सेट तयार करतात. पण, यासाठी सगळ्या कंपन्यांनी वयोमर्यादा घालून दिलेली आहे. कारण, व्हीआर सेटच्या तात्पुरत्या वापरावर काही रिसर्च झालेले आहेत.
त्यानुसार व्हीआर सेटचा वापर करणाऱ्या काही लोकांना डोळे, नाकावर ताण येणे असे अनुभव आलेले आहेत.

अर्थात हा तात्पुरत्या वापरावर झालेला अभ्यास आहे. दीर्घकाळ व्हीआर सेट वापरल्यानं काय परिणाम होतात? याबद्दल अजून कोणालाच माहिती नाही. त्यामुळे कंपन्या सुद्धा 10 वर्षांच्या खालील मुलांना हे व्हीआर सेट वापरण्याची परवानगी देत नाहीत.
2017 मध्ये युनायटेड किंग्डममधील लीड्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी व्हीआर सेटबद्दल एक संशोधन केलं होतं. व्हीआर सेट तात्पुरते वापरल्यानं दृष्टी आणि शरीराची हालचाल यामध्ये संतुलन राखण्यात त्रास जाणवत असल्याचं समोर आलं होतं.
हे रिसर्च करणारे लीड्स युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्राचे प्रोफेसर मार्क मॉन विलियम्स यांनी युनिर्व्हसिटीच्या वेबसाईटवर एक आर्टीकल लिहिलं असून यामध्ये व्हीआर सेटच्या परिणामांबद्दल लिहिलेलं आहे.
त्या प्रोफेसर मार्क म्हणतात, आपण बघत असलेली दृष्य आणि हालचाल यामध्ये विसंगती असेल तर संतुलन राखण्यासाठी मानवी मेंदूला जुळवून घ्यावं लागेल. लहान मुलांमध्ये या प्रक्रियेत अडचण येऊ शकते. कारण, त्यांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो.
व्हीआर सेट वापरताना हेच होतं. आपण आभासी जग बघत असतो. पण, आपण शरीरानं मात्र वास्तविक जगात असतो.
हे लीड्स युनिर्व्हसिटीचं रिसर्च ज्यांच्या नेतृत्वात झालं ते यू. के. मधील मानसशास्त्राचे प्रोफेसर डॉ. फैजल मुश्ताक यांच्यासोबत आम्ही इमेलवरून संपर्क साधला.
त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "सातत्यानं मुलं व्हीआर सेटचा वापर करत असतील तर आभासी जग आणि वास्तव यामधील रेषा नक्कीच अस्पष्ट होते.
माझी पण दोन लहान मुलं आहेत. त्यांनी शैक्षणिक उपक्रमांमध्ये व्हीआर सेटचा नियमित वापर केलेला मला चालणार नाही. एखादी गोष्ट खऱ्या जगात अनुभवणं फारच कठीण असेल किंवा अशक्य असेल तर वापर ठीक आहे."
लहान वयात व्हीआर सेटद्वारे शिकवण्याचा अट्टाहास का?
व्हीआर सेटचा शिक्षणात पहिल्यांदाच वापर होतोय असं नाही. जगभरात शिक्षणासाठी याचा वापर होतोय.
भारतातही काही सरकारी शाळा आणि खासगी शाळांमध्ये व्हीआर सेटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. पण, हा वापर वयोमर्यादेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होतो.
पण, अंगणवाडीतील बालकं कुठल्याही परिस्थितीत व्हीआर सेट वापरण्याच्या वयोमर्यादेत बसत नाही.
शिवाय त्यांच्यासाठी विशेष हेडसेटही बनवून घेतलेले नाहीत. मोठ्या मुलांना वापरतात तेच व्हीआर हेडसेट या 3-6 वर्षांतील मुलांसाठी वापरले जात आहेत.
स्वतः कंपनीची परवानगी नसतानाही मेंदूच्या विकासाच्या टप्प्यात असणाऱ्या मुलांसाठी व्हीआर सेट वापरण्याचा अट्टाहास का केला जातोय?
याबद्दल नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी म्हणतात की, आम्ही बालकांसाठी वेळेची मर्यादा ठरवून दिलेली आहे. एका बालकाला दिवसातून 5 मिनिटं व्हीआर सेट लावण्याची परवानगी आहे.
पण, ती मुलं लहान आहेत. व्हीआर सेट म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारचं खेळणं आहे. आपआपल्याला ते परत परत मिळावं यासाठी ते जिद्द करतात हे स्वतः अंगणवाडी सेविका कुकडे यांनी सांगितलं.
तसंच पालकही म्हणतात की, मुलं घरी येऊन व्हीआर सेटसाठी जिद्द करतात. तेव्हा आपणही घेऊ अशी तात्पुरती समजूत काढून आम्ही त्यांना शांत करतो असं पालक रामराव चवरे यांनी सांगितलं.

विनायक महामुनी पुढे म्हणतात की, "मेटाचा दृष्टीकोण बरोबर आहे की, जो कंटेट दाखवतो त्यामुळे मुलांना चक्कर येऊ नये, त्यांच्या मेंदूच्या वाढीवर परिणाम होऊ नये.
पण, आपला कंटेट रेग्युलेटेड कंटेट आहे. आपण ज्या पद्धतीनं मोबाईल वापरतो, एखादा पाच सात वर्षाचा मुलगा थिएटरमध्ये जाऊन दोन अडीच तास थ्री डी मध्ये चित्रपट बघतो. त्या पद्धतीनं आपण फक्त 5 मिनिटं वेळेची मर्यादा घातलेली आहे."
"जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार 3-6 वयोगटातील मुलांना अनुभूती देणारं शिकवलं तर त्यांच्या मेंदूचा विकास जास्त चांगला होतो. आम्ही मेटाचा पण रिसर्च बघितला. त्यामुळे आम्ही कंटेट रेग्युलेटेड ठेवलेला आहे.
त्यांना फक्त अनुभूती देणारं शिक्षण द्यायचं आहे. गाडी कशी चालते, वाघ कसा चालतो, वाघाची डरकाळी कशी असते हेच आम्ही मुलांना शिकवतो. मुलांना भीतीदायक वाटेल असं काहीच नाही", असंही ते म्हणतात.
व्हीआर सेटचा वापर करणाऱ्यांच्या डोळ्यावर, नाकावर ताण येत असल्याचंही काही अभ्यासांमधून समोर आलेलं आहे. मग हे व्हीआर लावताना अंगणवाडीत बालकांच्या आरोग्याचा विचार केला गेला नाही का? त्यांच्या आरोग्याचं काय?
याबद्दल महामुनी म्हणतात की, बालकांच्या मानेवर ताण येऊ नये यासाठी आम्ही बीन बॅग दिलेल्या आहेत. जेणेकरून तो झोपून बघू शकेल. नाकावर ताण येऊ नये यासाठी त्याला एक सेपरेट स्ट्रॅप दिली आहे.
पाच मिनिटं असल्यामुळे मानेवर, नाकावर ताण येत नाही. अजूनही यावर संशोधन सुरूच आहे. त्यामुळे याचा वापर करणं हे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही.
काही संशोधन सपोर्ट करणारे असतात, तर काही विरोध करणारे. आम्ही फक्त सकारात्मक गोष्टी पुढे घेऊन जात आहोत. आमच्या बालकांची आरोग्य तपासणी सुद्धा आम्ही नेहमी करत असतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























