You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात पुढील 5 दिवस हवामान कसे असणार? जाणून घ्या कुठे कोणता अलर्ट
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ वायव्य बंगालच्या उपसागरावर असलेले 'डीप डिप्रेशन' (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) गेल्या 6 तासांत ताशी 7 किमी वेगाने पश्चिम - वायव्य दिशेकडे सरकले आहे. या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने दिघाजवळ पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशाचा किनारा ओलांडला आहे.
पुढील 24 तासांत ते उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि उत्तर छत्तीसगडमधून पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकत राहण्याची दाट शक्यता आहे. या वादळामुळे घाट क्षेत्रात आणि विदर्भात पावसात वाढ होते आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवसांचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जारी केला आहे. त्यानुसार आज (28 जुलै) विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागासाठी यलो व ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जाणून घेऊयात नेमका कुठे कोणता अलर्ट.
राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट?
आज (28 जुलै) राज्यात गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर घाट परिसर या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यलो अलर्ट कुठे?
जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कुठे ग्रीन अलर्ट?
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
पुढील 5 दिवस हवामान कसे असेल?
राज्यात कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड वॉर्निंग जारी करण्यात आलेली नाही.
28 जुलैला भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
29 जुलैला पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. राज्याच्या बहुतांश भागात यलो अलर्ट राहणार असून पावसाचा जोर काही प्रमाणात कायम राहण्याचा अंदाज आहे.
30 जुलैपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष इशारा नाही. मात्र घाट परिसरात आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता कायम आहे.
31 जुलैला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो अलर्ट लागू आहे. उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी विशेष इशारा नाही.
1 ऑगस्टला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात हवामान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता आहे.
कुठे किती पाऊस झाला?
राज्यातील अनेक भागांत पावसाची संततधार कायम आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने 28 जुलैला सकाळी 8.30 वाजेपर्यंत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार कोकणातील रत्नागिरी येथे गेल्या 24 तासांत सर्वाधिक 17.6 मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल अलिबाग येथे 52.8 मिमी, गोवा (पणजी) येथे 31 मिमी, हर्णई येथे 30 मिमी, मुंबई (सांताक्रूझ) येथे 7.8 मिमी आणि मुंबई (कुलाबा) येथे 9.6 मिमी पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 168.6 मिमी पावसाची नोंद झाली. हा विभागातील सर्वाधिक पाऊस ठरला. याशिवाय पुणे येथे 18.3 मिमी, सातारा येथे 12.7 मिमी, नाशिक येथे 10.6 मिमी, जळगाव येथे 9.6 मिमी, कोल्हापूर येथे 6.7 मिमी, जेजुरी येथे 2 मिमी, सांगली येथे 1.7 मिमी, तर सोलापूर आणि अहिल्यानगर येथे पावसाची नोंद झाली नाही.
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहिला. छत्रपती संभाजीनगर येथे 6.8 मिमी, नांदेड येथे 5.8 मिमी, परभणी येथे 1.7 मिमी, धाराशिव येथे 0.5 मिमी पाऊस झाला, तर इतर भागांत हलक्या सरी पडल्या.
विदर्भात ब्रह्मपुरी येथे 22.8 मिमी पाऊस झाला. तो विभागातील सर्वाधिक आहे. बुलडाणा येथे 4 मिमी, चंद्रपूर येथे 3 मिमी, अकोला आणि अमरावती येथे प्रत्येकी 2 मिमी, नागपूर येथे 1.4 मिमी, वर्धा येथे 1.2 मिमी पावसाची नोंद झाली. यवतमाळ येथे पावसाची नोंद झाली नाही.
तापमानाचा विचार करता कोकणातील डहाणू येथे कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस, रत्नागिरी येथे 31.2 अंश आणि हर्णई येथे 31 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. विदर्भातील अमरावती येथे 32.6 अंश, वर्धा येथे 32.5 अंश, ब्रह्मपुरी येथे 32.5 अंश आणि यवतमाळ येथे 32.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
यंदाच्या पावसाळ्यात 1 जूनपासून झालेल्या एकूण पावसाच्या आकडेवारीनुसार, मुंबई (सांताक्रूझ) येथे 1903.7 मिमी, मुंबई (कुलाबा) येथे 1609.6 मिमी, हर्णई येथे 1643.7 मिमी, डहाणू येथे 1545 मिमी आणि रत्नागिरी येथे 1476.6 मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे आतापर्यंत 3790.2 मिमी पाऊस झाला. हा राज्यातील प्रमुख केंद्रांपैकी सर्वाधिक पाऊस आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)