फॅटी लिव्हर असल्यावर दारू पूर्ण सोडावी का; काय आहेत फॅटी लिव्हरची लक्षणं आणि कसा कराल बचाव?

    • Author, प्रियंका धिमान
    • Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

आपल्यापैकी अनेकांना यकृताबद्दल (लिव्हर) फारशी माहिती नसते. परंतु, हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीर निरोगी ठेवण्यात याची मोठी भूमिका असते.

लिव्हरचा काही त्रास झाल्यावरच आपण त्याकडे लक्ष देतो. आज आपण लिव्हरशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं आणि त्यापासून बचाव करण्याचे सोपे उपाय जाणून घेऊया.

या विषयावर आम्ही प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट डॉ. अजयकुमार यांच्याशी संवाद साधला. सध्या ते दिल्लीमधील बीएलके मॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर डिसीजचे विभागप्रमुख आणि अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

प्रश्नः हल्ली अनेक लोकांना फॅटी लिव्हरची समस्या जाणवत आहे. याचं कारण काय?

उत्तरः फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात चरबी (फॅट) साचणे. भारतात ही समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

1980 पर्यंत फॅटी लिव्हर हा आजार केवळ अति मद्यपान करणाऱ्यांनाच होतो, असं मानलं जात होतं. परंतु, नंतर जगभरातून झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं की, मद्यपान न करताही लिव्हरमध्ये चरबी साचून फॅटी लिव्हर होऊ शकतो.

लिव्हरमध्ये साचलेली ही जास्तीची चरबी त्याच्या पेशींचं नुकसान करते. त्यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते, गंभीर आजार होऊ शकतात आणि पुढे जाऊन लिव्हर कॅन्सरचा धोकाही वाढण्याची शक्यता असते.

दुर्दैवाने, मागील 10 वर्षांत फॅटी लिव्हरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

सध्याच्या अंदाजानुसार, भारतात साधारण 12 कोटी लोक फॅटी लिव्हरच्या (यकृतामध्ये चरबी साचण्याच्या) समस्येने त्रस्त आहेत.

याशिवाय मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइडचे जास्त प्रमाण आणि लठ्ठपणामुळेही फॅटी लिव्हर होण्याची प्रमुख कारणे आहेत.

फॅटी लिव्हर आहे हे कसं ओळखाल?

प्रश्न- मद्यपान करणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो का? यात किती तथ्य आहे?

उत्तर- मद्यपानामुळे म्हणजेच दारू पिण्यामुळे लिव्हरला नुकसान होते, हे सत्य आहे. पण, आता आणखी एक मोठी चिंता समोर आली आहे. दारू न पिणाऱ्या अनेक तरुणांमध्येही फॅटी लिव्हरची समस्या दिसून येत आहे.

वेळीच उपचार किंवा योग्य काळजी घेतली नाही, तर पुढे जाऊन यामुळे लिव्हरचे इतर गंभीर आजारही होऊ शकतात.

अनेकवेळा परिस्थिती इतकी गंभीर होते की, रुग्णाचे लिव्हर ट्रान्सप्लंटही (यकृत प्रत्यारोपण) करावं लागू शकतं.

ही आरोग्याची एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. तसेच, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनेही प्रभावी धोरणं आणि योजना राबवणं आवश्यक आहे.

प्रश्नः एखाद्या व्यक्तीला आपलं लिव्हर फॅटी झालं आहे, हे कसं समजतं?

उत्तरः फॅटी लिव्हरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीही ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना हा आजार बराच बळावल्यानंतरच त्याबद्दल समजतं.

फॅटी लिव्हरचे वेळेवर निदान करायचे असेल तर नियमित आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) करणं महत्त्वाचं आहे. यासाठी काही रक्त चाचण्या केल्या जातात.

तसेच फायब्रोस्कॅन आणि इलास्टोग्राफीसारख्या चाचण्यांमधून लिव्हरमध्ये किती चरबी साचली आहे आणि त्यावर व्रण (फायब्रोसिस) तर पडत नाहीत ना, हेही समजू शकतं.

लिव्हरच्या कार्याची माहिती मिळण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) केली जाते. यात एसजीओटी आणि एसजीपीटी या घटकांची पातळी तपासली जाते. या घटकांचे प्रमाण वाढलेले दिसून आल्यास ते लिव्हरमध्ये काही समस्या असल्याचे संकेत असू शकतात.

याशिवाय एफआयबी-4 स्कोअरही उपयुक्त ठरतो. यासाठी वेगळी चाचणी करण्याची गरज नसते. व्यक्तीचे वय, एसजीओटी, एसजीपीटी आणि प्लेटलेट्सच्या आधारे हा स्कोअर काढला जातो.

जर हा स्कोअर सामान्यापेक्षा जास्त आला तर, आजाराची योग्य स्थिती समजावी यासाठी डॉक्टर पुढील चाचण्या किंवा तपासणी करण्याचा सल्ला देतात.

फॅटी लिव्हरपासून बचाव कसा कराल?

प्रश्नः फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता?

उत्तरः सर्वात प्रथम फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करायला हवं, हे समजून घेणं गरजेचं आहे. यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपल्या जीवनशैलीत बदल करणे.

यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर, मद्यपान लिव्हरसाठी अत्यंत हानिकारक असल्याने ते टाळावे.

फॅटी लिव्हरची समस्या असेल, तर दररोज नियमितपणे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आहारातही बदल केला पाहिजे. संतृप्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट) कमी खावी, प्रथिनांचे प्रमाण वाढवावे आणि कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट) सेवन मर्यादित ठेवावे.

शक्यतो गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये, जसं की कोल्ड ड्रिंक्स, टाळावीत. अति प्रमाणात चॉकलेट खाणंही टाळावं. दैनंदिन आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचा नक्की समावेश करावा.

जर एखाद्या व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास सुरू झाला तर, थोड्या प्रमाणात केलेल्या मद्यपानामुळेही त्याच्या लिव्हरचं मोठं नुकसान होऊ शकतं.

मी हे आवर्जून सांगू इच्छितो की, ज्या व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास आहे, त्याने मद्यपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे.

प्रश्नः फॅटी लिव्हर झाल्यास डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे का, की घरच्या घरीच त्यावर उपचार करता येते?

उत्तरः सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे लिव्हरचे किती नुकसान झाले आहे, हे समजू शकतं. त्यानुसार पुढील उपचार निश्चित केले जातात. काही वेळा लिव्हरवर व्रण (फायब्रोसिस) पडतात किंवा ते कडक (स्टिफनेस) होऊ लागते. त्यामुळे लिव्हरचं कायमचं नुकसान होण्याचा धोका वाढतो.

परंतु, लिव्हरमध्ये केवळ चरबी साचली असेल आणि त्याला गंभीर नुकसान झाले नसेल, तर जीवनशैलीतील बदलांच्या माध्यमातून फॅटी लिव्हर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येतो.

यासाठी नियमित व्यायाम, मद्यपान पूर्णपणे बंद आणि संतुलित आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे.

डॉक्टरांच्या मते, आठवड्यातून किमान 5 दिवस दररोज 45 मिनिटे ते 1 तास व्यायाम केला पाहिजे. यासाठी वेगाने चालणे (ब्रिस्क वॉक) हा सर्वोत्तम पर्याय आहे. साधारण 10 मिनिटांत 1 किलोमीटर अंतर चालण्याचा वेग योग्य मानला जातो.

दररोज सुमारे 6 किलोमीटर चाललात, तर त्याचा लिव्हरसह संपूर्ण आरोग्याला मोठा फायदा होतो.

फॅटी लिव्हर आणि मधुमेहाचा काय संबंध?

प्रश्नः मधुमेह (डायबिटिज) आणि फॅटी लिव्हरचा संबंध किती जवळचा आहे?

उत्तरः मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींना फॅटी लिव्हर होण्याचा धोका जास्त असतो. एखाद्या मधुमेही रुग्णाला फॅटी लिव्हरची समस्या असेल, तर सर्वात आधी त्याच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.

पूर्वी भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी (डायबिटीज कॅपिटल) म्हटलं जायचं. आता मात्र फॅटी लिव्हरच्या रुग्णांच्या संख्येतही भारत जगातील सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक असल्याचे मानले जात आहे.

अलीकडेच वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मधुमेही रुग्णांची फायब्रोस्कॅन तपासणी करण्यात आली. या अभ्यासाचे निष्कर्ष अत्यंत चिंताजनक होते.

मधुमेह असलेल्या सुमारे 60 ते 70 टक्के रुग्णांना फॅटी लिव्हरची समस्या असल्याचे तपासणीत आढळून आलं.

प्रश्नः ब्लॅक कॉफी फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करते का?

उत्तरः अनेक वैज्ञानिक संशोधनांनुसार ब्लॅक कॉफी लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासही तिची मोठी मदत होऊ शकते. परंतु, तिचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचं आहे. दिवसातून जास्तीत जास्त दोन कप ब्लॅक कॉफी पिणे योग्य मानले जाते.

यापेक्षा जास्त कॉफी पिल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

प्रसिद्ध हेपॅटोलॉजिस्ट डॉ. संजीव चोप्रा यांनीही या विषयावर एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिव्हरच्या आरोग्यासाठी कॉफीचे फायदे सविस्तरपणे सांगितले आहेत.

प्रश्नः जर एखाद्याला फॅटी लिव्हर असेल तर, त्याच्या हृदयावर काय परिणाम होतो? त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो का?

उत्तरः फॅटी लिव्हर हा मेटाबॉलिक सिंड्रोमचा एक भाग आहे. या सिंड्रोममध्ये उच्च रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल, रक्तातील चरबीचे असंतुलित प्रमाण (लिपिड्स) आणि फॅटी लिव्हर अशा अनेक समस्या एकाच वेळी दिसू शकतात.

अशा रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. अनेकदा अशा रुग्णांच्या मृत्यूचे प्रमुख कारणही हृदयविकार हेच ठरते. याशिवाय, अशा लोकांना काही प्रकारच्या कॅन्सरचा धोकाही जास्त असू शकतो.

फॅटी लिव्हरचे निदान लिव्हरचे मोठे नुकसान झाल्यानंतर झाले, तर त्यातून लिव्हरमध्ये गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. परंतु, एकंदरीत अशा रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोकाही तितकाच गंभीर असतो.

म्हणूनच डॉक्टर असा सल्ला देतात की, एखाद्या रुग्णाला फॅटी लिव्हरसोबत मधुमेहही असेल, तर त्याची संपूर्ण तपासणी करावी. यात लिव्हरच्या चाचण्यांसोबतच हृदयाची तपासणीही अवश्य करावी.

लिव्हरचा कॅन्सर कसा होतो? उपचार काय आहेत?

प्रश्नः लिव्हर कॅन्सर कसा होतो? त्याच्यावर उपचार काय आहेत?

उत्तरः लिव्हर कॅन्सर होण्यामागे हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी हे विषाणू (व्हायरस) प्रमुख कारणांपैकी एक आहेत. हे विषाणू दीर्घकाळ लिव्हरला नुकसान पोहोचवू शकतात आणि त्यामुळे लिव्हर सिरोसिस (यकृत गंभीरपणे खराब होणे) होण्याचा धोका वाढतो.

परंतु, काही लोकांमध्ये हा विषाणू दीर्घकाळ शरीरात राहिल्यामुळे सिरोसिस न होताही लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. मात्र बहुतेक वेळा लिव्हर सिरोसिस हेच कॅन्सरचे मुख्य कारण असते. हा सिरोसिस हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी किंवा फॅटी लिव्हरमुळेही होऊ शकतो.

मागील 10 वर्षांत लिव्हर कॅन्सरच्या उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. उपचार ठरवताना डॉक्टर प्रामुख्याने दोन गोष्टी निश्चित करतात. पहिलं म्हणजे रुग्णाला सिरोसिस आहे का आणि दुसरं म्हणजे कॅन्सर कोणत्या टप्प्यावर आहे.

जर कॅन्सर केवळ लिव्हरपुरता मर्यादित असेल आणि शरीराच्या इतर भागांत पसरलेला नसेल, तर डॉक्टर कॅन्सरचा आकार आणि तो रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचला आहे का, हे तपासून पाहतात.

अशा परिस्थितीत लिव्हर ट्रान्सप्लांट (लिव्हर प्रत्यारोपण) हा सर्वात प्रभावी उपचार मानला जातो. काही रुग्णांमध्ये केवळ कॅन्सर झालेला भाग शस्त्रक्रियेद्वारे काढता येतो.

पण, सिरोसिसमुळे लिव्हर खूप खराब झाले असेल, तर लिव्हर ट्रान्सप्लांट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो आणि त्याचे परिणामही चांगले मिळतात.

परंतु, अडचण अशी आहे की, बहुतांश रुग्ण कॅन्सर बऱ्याच प्रमाणात वाढल्यानंतरच डॉक्टरांकडे येतात. तोपर्यंत कॅन्सर जवळच्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला असू शकतो. अशा परिस्थितीत उपचार करणे आव्हानात्मक होते.

प्रश्नः लिव्हर कॅन्सरवर उपचारासाठी किती खर्च येतो?

उत्तरः उपचाराचा खर्च कॅन्सर कोणत्या टप्प्यावर आहे, यावर अवलंबून असतो. जर रुग्णाला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडली, तर त्याचा खर्च खूप जास्त असू शकतो. सामान्यपणे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी 18 ते 20 लाख रुपयांपासून 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

प्रश्नः एखाद्या व्यक्तीचे लिव्हर कोणत्या कारणांमुळे खराब होऊ शकते?

उत्तरः लिव्हर खराब होण्याचे एक मोठे कारण म्हणजे अति प्रमाणात मद्यपान करणे. याशिवाय, हेपॅटायटिस ए, बी, सी आणि ई हे चार प्रमुख विषाणूही लिव्हरवर परिणाम करू शकतात.

यापैकी हेपॅटायटिस ए आणि ई हे विषाणू सहसा दीर्घकाळ लिव्हरला नुकसान पोहोचवत नाहीत. पण, हेपॅटायटिस बी आणि सी हे शरीरात बराच काळ राहून लिव्हरला गंभीर नुकसान करू शकतात.

चांगली गोष्ट म्हणजे, गेल्या काही वर्षांत हेपॅटायटिस-सीच्या उपचारासाठी प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत. ही औषधे साधारणपणे 3 महिने घेतल्यास 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. त्यामुळे आता हेपॅटायटिस-सीच्या रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

हेपॅटायटिस-बी पासून बचावासाठी प्रभावी लस उपलब्ध आहे. त्यामुळे सरकार सर्व नवजात बाळांना ही लस देण्याचा सल्ला देते. ज्यांना हेपॅटायटिस-बीची लागण झाली आहे, त्यांच्यासाठीही आता चांगली आणि प्रभावी औषधे उपलब्ध आहेत.

प्रश्नः लिव्हरचं काम काय असतं?

उत्तरः लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरात दोन मूत्रपिंडे (किडनी) आणि दोन फुफ्फुसे असतात, पण लिव्हर मात्र एकच असते.

एक किडनी किंवा एक फुफ्फुस खराब झाले, तरी दुसरे काही प्रमाणात काम करू शकते. पण, लिव्हर गंभीरपणे खराब झाले तर शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

लिव्हर शरीरात अनेक महत्त्वाची कामं करतं. ते शरीरासाठी ऊर्जेचा मोठा साठा असतं, जिथे ग्लुकोज साठवलं जातं. याव्यतिरिक्त, लिव्हर एका कारखान्यासारखं काम करतं आणि शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक पदार्थ तयार करतं. तसेच, शरीरातील हानिकारक आणि टाकाऊ घटक बाहेर काढण्यातही लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते.

प्रश्नः लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर जीवनशैलीत कोणते बदल केले पाहिजेत?

उत्तरः लिव्हरशी संबंधित आजारापासून बचाव करायचा असेल तर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे.

यासाठी नियमित व्यायाम करावा, मद्यपान पूर्णपणे टाळावे आणि कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहावे. नशा करणाऱ्या लोकांमध्ये हेपॅटायटिसच्या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे.

याशिवाय तळलेले पदार्थ आणि जंक फूड खाणं टाळावं. नेहमी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. तसेच, वेळेवर जेवण्याची सवय लावावी. या चांगल्या सवयी लिव्हरला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मोठी मदत करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)