You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दसरा, दिवाळीत घरातील पसारा आवरण्यासाठी वापरा 'या' 4 भन्नाट टिप्स
- Author, अॅलेक्स टेलर
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
दसरा आला की आपल्याकडे घरातील पसारा आवरण्याची लगबग सुरू होते. कारण अगोदर दसरा आणि त्या पाठोपाठ दिवाळी येणार असते.
जेव्हा आपण घर आवरायला घेतो आणि घराकडे पाहतो तेव्हा वाटतं चला, आता सगळं नीटनेटकं करून टाकूया.
मानसशास्त्र सांगतं की, घर स्वच्छ आणि टापटीप ठेवलं की मनावरचा ताण कमी होतो आणि उत्साह वाढतो.
पण यातील मेख अशी आहे की, पसारा कमी करताना काय ठेवायचं आणि काय काढून टाकायचं, हे ठरवताना घेताना बहुतेक सगळेच अडखळतात.
म्हणून आता यावर थेट तज्ज्ञांनी सांगितलेल्या 4 भन्नाट टिप्स बघूया, ज्या उपयुक्त ठरतील.
1. छोटी सुरुवात करा
सर्वात कठीण काम म्हणजे सुरुवात करणं. त्यामुळे स्वतःला समजवा की, "हो, आता घर आवरायचं."
ज्या वस्तू फक्त कर्तव्य म्हणून ठेवल्यात किंवा कुणीतरी दिलंय म्हणून ठेवतोय त्या वस्तुंची आस सोडून द्या.
बीबीसीच्या इंटिरिअर डिझाईन मास्टर्सच्या परीक्षक मिशेल ओगुंदेहीन सांगतात, "सगळं एकदमच काढून टाकायचं असं नाही. एकेक पाऊल टाका."
सुरुवात एखाद्या छोट्या ड्रॉवरपासून करा. मग हळूहळू कपाट, मग मोठ्या रूमपर्यंत पोहचा. त्यामुळे काम आवाक्यातलं वाटतं, डोकं गरगरत नाही.
2. वस्तूंची विल्हेवाट कशी लावायची ते आधी ठरवा
वस्तू बाहेर काढल्या आणि त्याचा ढिगारा व्हरांड्यातच पडून राहिला, तर सगळा उत्साह मावळतो.
व्यावसायिक ऑर्गनायझर इन्ग्रिड जान्सेन सांगतात, आधीच ठरवा की, वस्तू दान करायच्या, रिसायकल करायच्या, विकायच्या की सरळ टाकून द्यायच्या.
आजकाल चॅरिटी, दान करण्यासाठीचे अॅप्स, सेकंड हँड विक्री असे खूप पर्याय आहेत.
पण विकायचं ठरवताना विचार करा. कारण बऱ्याचदा आपण वस्तू भरून ठेवतो, मात्र विकायला जात नाही.
लेस्ली स्पेलमन सांगतात, "विकणे चांगले आहे, पण वस्तुस्थिती पाहा. 3 पिशव्या टेबलाखाली काही महिन्यांपासून पडल्या असतील तर त्या आता टाकून द्या."
3. क्वालिटीला महत्व द्या
"कठोर व्हा" असं बरेच लोक म्हणतात. पण खरं तर तुमच्या आवडीच्या, मनाला आनंद देणाऱ्या वस्तू काढायच्या नसतात.
ओगुंदेहीन सांगतात, "घरात तसं वातावरण ठेवा ज्या वस्तू तुमची कहाणी सांगतात, ज्या तुम्हाला आनंद देतात."
म्हणजे सुट्ट्यांमधून आणलेल्या वस्तू, मुलांची चित्रं, फोटो – ज्या तुम्हाला आनंद देतात त्या ठेवा.
बाकीच्या वस्तूंची एखादी मर्यादित जागा ठरवा, त्या सगळीकडे पसरू देऊ नका.
4. आठवण आणि ओढ यात फरक ओळखा
आपण अनेकदा भावनिक कारणामुळे वस्तू टाकून देत नाही.
सायकोथेरपिस्ट स्टेलिओस किओस्सेस दोन भावनिक कारणं सांगतात –
- Sentimentality म्हणजे आत्ता त्या वस्तूशी असलेलं नातं.
- आणि Nostalgia म्हणजे भूतकाळाची ओढ, त्या काळाच्या आठवणी.
उदा. मुलाचे पहिले बूट – आपण म्हणतो "हे मुलासाठी ठेवतोय." पण खरं तर ती आपली आठवण आहे – तेव्हा आपण ते विकत घेतले, मुल किती गोड दिसत होते हे आठवतं.
म्हणून नीट विचार करा – खरंच ती वस्तू घरातली मंडळी मिस करतील का?
आजकाल फोनमध्ये फोटो काढून ठेवणं सोप्पं आहे.
"फोटो हजार शब्द बोलतो, मग खरंच सगळं जपून ठेवायची गरज आहे का?"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)