You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हेलिपॅड, 8 खोल्या आणि इन्फिनिटी पूल असलेली रशियन अब्जाधीशाची लक्झरी नौका अमेरिकेने काढली विकायला
अमेरिकेचं सरकार जगातील सर्वात महागड्या सुपरयाटपैकी एकाचा लिलाव करत आहे. या याटमध्ये इन्फिनिटी पूल, 8 खोल्या आणि चक्क एक हेलिपॅडही आहे. ही नौका नसून ते पाण्यावर तरंगणारं एक पंचतारांकित हॉटेलच असल्याचं वर्णनही केलं जातं.
'अमाडेआ' ही सुपरयाट अमेरिकेच्या न्याय विभागाच्या क्लेप्टोकॅप्चर टास्क फोर्सने फिजीच्या समुद्रकिनाऱ्यावरून जप्त केली होती. या टास्क फोर्सची याचवर्षी स्थापना करण्यात आली आहे.
अमेरिकेने 2022 मध्ये या याटची किंमत 23 कोटी डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही याट रशियन राजकारणी सुलेमान केरिमोव्ह यांच्या कुटुंबाची आहे, पण केरिमोव्ह यांनी हा दावा फेटाळला आहे.
टास्क फोर्सने जप्त केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मालमत्ता मानली जात आहे.
त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जो बायडन यांनी ही याट रशियन श्रीमंत लोकांच्या 'गैरफायद्यांचं' प्रतीक असल्याचं म्हटलं होतं.
टास्क फोर्स केली होती बंद
'अमाडेआ' ही त्या अनेक याट, विमानं आणि आलिशान मालमत्तांपैकी एक आहे जी टास्क फोर्सने जप्त केलेली आहे.
यातील अनेक मालमत्ता सध्या कायदेशीर वादात अडकलेल्या आहेत.
गेल्या वर्षी अमेरिकेच्या संसदेने (काँग्रेसने) एक कायदा केला. त्यामुळे जप्त केलेली रशियन मालमत्ता युक्रेनला लष्करी मदतीसाठी देण्याचा अधिकार मिळाला.
ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अमेरिकेचे तत्कालीन अॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी ही टास्क फोर्स बंद केली होती.
या याटची किंमत 325 दशलक्ष डॉलर इतकी होती.
तज्ज्ञांच्या मते, 2017 मध्ये तयार झालेल्या या याटची किंमत 325 दशलक्ष डॉलर सांगण्यात आली होती.
मालकीवरून दीर्घ कायदेशीर लढाई झाल्यानंतर आता ही याट मोठ्या सवलतीत विकली जाण्याची शक्यता आहे.
जप्त केल्यानंतर ही सुपरयाट सध्या कॅलिफोर्नियातील सॅन डिएगो येथे पार्क करण्यात आली आहे.
याटमध्ये आहेत या सुविधा
याच वर्षी 'अमाडेआ'ला जप्त केल्यावर बीबीसीला ती आतून पाहण्याची परवानगी मिळाली होती.
ही याट एका फुटबॉल मैदानाएवढी लांब आहे. एक टोकावर हेलिपॅड आहे आणि दुसऱ्या टोकावर 10 मीटर लांब इन्फिनिटी पूल आहे.
या याटमध्ये जिम, ब्युटी सलून, सिनेमा, वाइन सेलर आणि 16 पाहुण्यांसाठी आलिशान केबिन्स आहेत.
पाहुण्यांना सेवा देण्यासाठी 36 क्रू मेंबर्ससाठी राहण्याची सोय देखील आहे.
कोण आहेत सुलेमान केरिमोव्ह?
मार्च महिन्यात न्यू यॉर्कचे न्यायाधीश डेल हो यांनी ही नौका अमेरिकेच्या सरकारकडे सुपूर्द केली. त्यांनी ती नॅशनल मेरिटाइम सर्व्हिसेस आणि याट ब्रोकर फ्रेझर याट्सच्या देखरेखीखाली लिलावासाठी पाठवली.
या याटची मालकी सुलेमान केरिमोव्ह यांच्या कुटुंबाकडे आहे, हे न्यायाधीशांनी नोंदीतील पुराव्यांवरून निश्चित केलं.
परंतु, रशियन खासदार आणि अब्जाधीश केरिमोव्ह यांनी अमेरिकेचा हा दावा फेटाळला आहे.
त्यांच्या प्रतिनिधींनी 2022 मध्ये बीबीसीला सांगितलं की, त्यांचा 'अमाडेआ'शी कोणताही संबंध नाही आणि ते मालकी हक्क मान्य करत नाहीत.
फोर्ब्सनुसार, 59 वर्षांचे केरिमोव्ह हे रशियाच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. त्यांच्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेची किंमत सुमारे 16.4 अब्ज डॉलर इतकी आहे.
त्यांनी ही संपत्ती सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रशियन कंपन्यांमधील हिस्सेदारी खरेदी करून कमावली होती.
अमेरिकेनं 2018 मध्ये केरिमोव्ह यांच्यावर निर्बंध लादले होते. त्यानंतर मार्चमध्ये ब्रिटननेही त्यांच्याविरुद्ध अशाप्रकारचेच पाऊल उचलले होते.
त्यांनी युक्रेनचं स्वातंत्र्य आणि सुरक्षा कमी करणाऱ्या धोरणांना पाठिंबा दिला, असं युरोपियन युनियनचं म्हणणं आहे.
देखभालीसाठी तब्बल 32 दशलक्ष डॉलर खर्च
2023 मध्ये रशियन सरकारी तेल कंपनी रोसनेफ्टचे माजी सीईओ एडुआर्ड खुदेनाटोव्ह यांनी या याटवर मालकी हक्काचा दावा केला.
युरोपीय संघाने खुदेनाटोव्ह यांच्यावरही प्रतिबंध लादले.
केरिमोव्ह हे या सुपरयाटचे मालक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयीन अधिकाऱ्यांकडे कोणताही साक्षीदार नाही, असा युक्तिवाद खुदेनाटोव्हचे वकील अॅडम फोर्ड यांनी न्यायालयात केला.
फिर्यादीच्या वकिलांनी मात्र त्यांना केरिमोव्हचे 'स्ट्रॉ ओनर' म्हटलं.
खुदेनाटोव्ह यांच्याकडे मालकी हक्काचा कोणताही वैध दावा नाही, असं मार्चमध्ये न्यायाधीश डेल हो यांनी आपल्या निर्णयात सांगितलं.
त्यानंतर लिलावाचा मार्ग मोकळा झाला.
न्यायालयीन नोंदींनुसार, जून 2022 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या मार्शल सर्व्हिसने या याटवर वाहतूक, देखभाल आणि साठवणुकीसाठी 32 दशलक्ष डॉलर खर्च केले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)