मुस्लीम महिलेच्या निधनानंतर हिंदूंनी पुढे ढकलली रामलीला; उत्तर प्रदेशातील गावाची अनोखी गोष्ट

फोटो स्रोत, Shazbaz Anwar
- Author, शहबाज अन्वर,
- Role, बीबीसीसाठी, बिजनौर
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"गावात गफूरन बुआचे पार्थिव ठेवलेले होते. त्या केवळ आमच्या गावच्या लेक नव्हत्या तर आमच्या आत्यासारख्याच होत्या. एका बाजूला गावात त्यांचे पार्थिव असताना आम्ही मात्र रामलीला करून आनंदोत्सव साजरा करावा, हे आमच्या मनाला अजिबात पटलं नाही. म्हणूनच आमच्या कमिटीनं त्या दिवशी सुरू होणारी रामलीला पुढे ढकलली."
हे शब्द आहेत उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील मोहडा गावातील ऋषिपाल सिंह यांचे. ऋषिपाल सिंह हे गावातील 'आदर्श रामलीला समिती'चे संरक्षक आणि गावचे ग्रामप्रधान आहेत.
बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना ते म्हणाले, "आमचं संपूर्ण गावच मुळात आपसातील बंधुभावाचं एक उत्तम उदाहरण आहे. इथं कधीही हिंदू-मुस्लीम यांच्यात वाद झालेला नाही. गफूरन बुआ नेहमी आपल्या घरासमोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या असायच्या. देवदर्शनासाठी गावात जेव्हा जेव्हा नवविवाहित जोडपी यायची, तेव्हा त्या प्रत्येकाला आवर्जून प्रेमाने आशीर्वाद द्यायच्या. त्या अत्यंत प्रेमळ होत्या."
ते पुढे म्हणतात, "गावातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला त्या त्यांच्या घराण्यावरून ओळखायच्या. गावात त्यांचा एवढा मान होता की, समोरून जाताना त्यांना नमस्कार किंवा सलाम केल्याशिवाय कोणी पुढं निघून गेलाय, असं कधी झालंच नाही."
गफूरन बुआच्या निधनामुळे रामलीला पुढे ढकलली
बिजनौरच्या धामपूर तालुक्यातील मोहडा ग्रामपंचायतीत हे गाव येतं. साधारण 3200 लोकवस्ती असलेल्या या गावात चौहान समाजाचे लोक बहुसंख्य असून मुस्लीम, वाल्मिकी आणि इतर समाजाचे नागरिकही येथे गुण्यागोविंदानं राहतात.
![[photo caption- ऋषिपाल सिंह, ग्रामप्रधान आणि आदर्श रामलीला समितीचे संरक्षक]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/c2ca/live/6119b7d0-ca17-11f1-a64c-550be9e3c66b.jpg.webp)
फोटो स्रोत, Shazbaz Anwar
10 ऑक्टोबरला गावातील 85 वर्षांच्या गफूरन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. संध्याकाळी 5 च्या सुमारास त्यांचे पार्थिव गावात आणलं गेलं, तेव्हा सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती.
विशेष म्हणजे, याच दिवशी रात्री 8 वाजेपासून गावात रामलीला सुरू होणार होती. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने दरवर्षी याच दिवशी रामलीलेचा शुभारंभ होतो.
मात्र, गफूरन यांच्या निधनामुळे 'आदर्श रामलीला कमिटी'च्या सर्व आयोजकांनी एकत्र येत एकमुखाने त्या दिवशीची रामलीला रद्द करून पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला.
हिंदू-मुस्लीम एकतेचा आणि सलोख्याचा हा प्रसंग संपूर्ण परिसरात चांगलाच चर्चेत आला असून सोशल मीडियावरही लोक या निर्णयाची विशेष चर्चा करत आहेत.
गफूरन बुआ नक्की कशा होत्या?
धामपूर-मुरादाबाद हायवेवरून साधारण दीड किलोमीटर आत गेले की मोहडा गाव लागते. गावात शिरताच जागोजागी लाकडी खांबांवर लाउडस्पीकर्स लावलेले दिसतात आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सजावटीची लगबग दिसेल.
रामलीलेचं मैदान गफूरन आत्यांच्या घरापासून जेमतेम 500 मीटरवर आहे. संपूर्ण गावात लावलेल्या लाउडस्पीकर्समुळे घरात बसूनही रामलीलेचे संवाद आणि भजनं प्रत्येकाच्या कानावर पडतात.
नाव जाहीर न करण्याच्या विनंतीसह एका मुस्लीम महिलेनं आमच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "आम्हीसुद्धा सगळे एकत्र जमून रामलीला बघायला जातो. गावातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्या नातेवाईकासारखीच वाटते."
एवढ्यात रामलीला मैदानाकडून रामलीला समितीचे अध्यक्ष ऋषिपाल सिंह समोरून येताना दिसले.
गफूरन बुआचं जाणं आणि रामलीला रद्द करण्याच्या निर्णयावर बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना ते म्हणाले, "गफूरन यांच्यासोबत आमचं रक्ताचं नातं नसेलही, पण तरी त्या संपूर्ण गावच्या लेकीसारख्या होत्या."
![[photo caption- संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन सध्या रामलीला न करण्याचा निर्णय घेतला आहे.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/4754/live/687da7c0-ca17-11f1-bc2e-018d645d8d21.jpg.webp)
फोटो स्रोत, Shazbaz Anwar
तिथेच बाजूला निळ्या रंगाचा शर्ट घालून उभे असलेले भूपेंद्र सिंह यांनीही आमच्याशी बातचीत केली. ते या कमिटीचे उपसचिव आहेत.
ते म्हणाले, "गेल्या जवळपास 40 वर्षांपासून आमच्या गावात रामलीला होते. पण इथे कधीही कसलाच वाद किंवा तणाव झाला नाही. उलट गावातील अनेक मुस्लीम कुटुंबं रामलीला कमिटीला मदत करतात. त्यांच्या घरातल्या महिलासुद्धा इथं रामलीला पाहायला येतात."
आम्ही ज्या दिवशी मोहडा गावात गेलो त्या दिवशी गावात 'राम बारात' काढली जात होती. रामलीलेच्या मैदानावर लहान मुले खेळत होती, तर महिला आणि वडीलधारी मंडळींचीही तिथे चांगलीच गर्दी जमली होती.
श्रीरामांची मिरवणूक बघायला आलेल्या सुनीता देवी यांच्याशी आम्ही गफूरन बुआबद्दल बोललो. त्या म्हणाल्या, "माझं वय आता साधारण 56 वर्षे आहे. लग्न होऊन मी या गावात पाऊल ठेवल्यापासून सगळ्यांमध्ये असंच प्रेम बघत आले आहे. गफूरन बुआ संपूर्ण गावच्या आवडत्या होत्या, कारण रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावरून त्या मायेनं हात फिरवायच्या."
तिथेच उभ्या असलेल्या उर्मिला आजींनी गफूरन यांच्या आठवणी सांगताना म्हटलं, "त्यांचं कुटुंब साधारण 50-55 वर्षांपूर्वी जवळच्याच एका गावातून इथं स्थायिक झालं. गफूरन यांचं लग्न जवळच्या जटपुरा गावातील अकबर हुसेन यांच्याशी झालं होतं. काही कारणांमुळे ते दोघंही नंतर याच गावात येऊन राहायला लागले. हे गाव खूप प्रेमळ आणि आपुलकी जपणारं आहे, असं गफूरन नेहमी म्हणायच्या."
गावातील भूरे मियाँ सांगतात, "आमच्या गावात आजपर्यंत कधीही जाती-धर्मावरून वातावरण बिघडलेलं नाही. गावातल्या वेशीवरच अशा सगळ्या गोष्टी थंडावतात आणि पुढंही असंच राहील."
गफूरन यांच्या मुलाने काय सांगितले?
गावात शिरताच डाव्या बाजूला एक छोटा रस्ता फुटतो. या रस्त्याच्या दुतर्फा ऊसाची शेतं आहेत. साधारण 300 मीटर पुढे गेल्यावर डाव्या हाताला संरक्षक भिंत घातलेलं एक मोठं पिंपळाचं झाड दिसतं. तिथून अवघी 15 ते 20 पावलं पुढे गेलं की गफूरन यांचं घर लागतं, ज्याच्या दारावर लाल रंगाचं लोखंडी गेट आहे.
गफूरन बुआंना चार मुलगे आणि एक मुलगी होती. त्यांच्या पतीसह दोन मुलगे आणि एका मुलीचं बऱ्याच वर्षांपूर्वीच निधन झाले होते.
आता त्यांच्या मुलांपैकी 65 वर्षांचे झाकीर हुसेन आणि त्यांचे लहान भाऊ शमशाद हुसेन हे दोघंच आता हयात आहेत. झाकीर गावातच स्वतःचा दवाखाना चालवतात. त्यांच्या मुलांचंही लग्न झालंय. म्हणजेच गफूरन यांच्या घरात त्यांची चौथी पिढी वाढत आहे.
![[फोटो caption- झाकीर हुसेन, गफूरन यांचे ज्येष्ठ सुपुत्र ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/071d/live/6f400080-ca17-11f1-a64c-550be9e3c66b.jpg.webp)
फोटो स्रोत, Shazbaz Anwar
झाकीर यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "10 ऑक्टोबरच्या सकाळी आईची तब्येत अचानक खूप बिघडली. आम्ही त्यांना धामपूरच्या डॉक्टरांकडे नेले पण दुर्दैवानं संध्याकाळी 4 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
झाकीर पुढं म्हणाले, "गावात रामलीलेची सगळी तयारी झाली होती. पूजेच्या वेळीही गावात नेहमी भोंगा वाजत असायचा. पण त्या दिवशी गावातला भोंगा पूर्णपणे शांत होता. रात्री सुरू होणारी रामलीलासुद्धा त्या दिवसासाठी रद्द करून पुढे ढकलण्यात आली."
ते पुढे सांगतात, "आईनं संपूर्ण कुटुंबाला नेहमी एकत्र जोडून ठेवलं. आजही आमच्या सगळ्या घराला मिळून एकच मुख्य दरवाजा आहे. हीच एकी आणि प्रेम त्या संपूर्ण गावाशीही बाळगून होत्या."
लहानपणापासूनच रामलीलेत आवडीनं आणि उत्साहानं भाग घेण्याची शिकवण स्वतः आईनंच आपल्याला दिल्याचे झाकीर यांनी आवर्जून सांगितलं.
झाकीर सांगतात, "दिवाळी असो किंवा ईद, गावातील हिंदू बांधवांच्या घरी आमचं येणं-जाणं नेहमीच सुरू असायचं. आईच्या अंत्यविधीसाठीही गावातील अनेक हिंदू बांधव आवर्जून उपस्थित होते."
ते पुढे म्हणतात की, आजही दररोज अनेक लोक घरी येऊन आमचं सांत्वन करत आहेत.
रामलीलेच्या कलाकारांची काय प्रतिक्रिया होती?
'आदर्श रामलीला'च्या नाटकात रामाची भूमिका अमित चौहान करत आहेत. रामलीला पुढे ढकलल्याबद्दल आणि गफूरन बुआविषयी बोलताना ते म्हणाले की, "नाटकासाठी खूप दिवसांपासून संवादांची तयारी आणि ॲक्टिंगची प्रॅक्टिस सुरू असते. अशा स्थितीत ज्या दिवसासाठी एवढी जय्यत तयारी केली, त्याच दिवशी शो पुढे ढकलावा लागला तर कलाकाराला वाईट वाटणे स्वाभाविक आहे."
पण लगेच ते पुढे म्हणतात, "गफूरन बुआबद्दल आम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत वडीलधाऱ्यांकडून ऐकत आलोय. आम्ही त्यांना स्वतः पाहिलेलं आहे. त्यांचं अचानक निघून जाणं हे संपूर्ण गावासाठी कधीही भरून न येणारं नुकसान आहे."
![[photo caption- गावातले वकील गजेंद्र सिंह यांनीसुद्धा गावकऱ्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/5bf0/live/7c0ea870-ca17-11f1-bc2e-018d645d8d21.jpg.webp)
फोटो स्रोत, Shazbaz Anwar
धामपूरमधील दंगलीची झळही या गावाला स्पर्श करू शकली नाही.
या गावापासून धामपूर शहर अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. धामपूर हा उत्तर प्रदेशचा एक विधानसभा मतदारसंघ असून भाजपचे अशोक कुमार राणा इथले आमदार आहेत.
धामपूर ही एक नगरपालिका असून इथे हिंदू आणि मुस्लीम समाजाची एकत्र लोकवस्ती आहे. आसपासच्या खेड्यांपाड्यांतील अनेक लोक रोजच्या गरजेच्या खरेदीसाठी दररोज या शहरात येत असतात.
एसडीएम कार्यालयाजवळच वकिलांची कार्यालयं आहेत. तिथं प्रॅक्टिस करणारे ज्येष्ठ वकील आणि माजी पत्रकार गजेंद्र सिंह म्हणतात, "हे बघा धामपूरमध्ये 1978 साली जातीय सलोखा बिघडला होता. त्या काळात धामपूर शहराचं खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतरही काही वेळा शहरात तणावाचे प्रसंग उद्भवले. पण मोहडा गावात मात्र कधीच वाद किंवा अशांततेची झळ पोहोचली नाही. तिथं पहिल्यापासूनच एकमेकांबद्दलचं प्रेम आणि बंधुभाव कायम आहे ही गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























