You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नामवंत शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान
देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना शुक्रवारी (14 नोव्हेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र भूषण 2024' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अॅड. आशीष शेलारही उपस्थित होते.
"जीवनाचे खरे शिल्पकार 'महाराष्ट्र भूषण' राम सुतार", अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले , "महाराष्ट्र भूषण' हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना प्रदान करताना आनंद होत आहे. त्यांनी जगामध्ये भारताचे आणि महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे."
"त्यांनी अतुलनीय प्रकारची शिल्पे तयार केली आहेत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् ते सरकारी नोकरी व नंतर पुरातत्व खात्यात शिल्प जोडण्याचे आणि शिल्प निर्माण करण्याचे काम राम सुतार यांनी केले", असे सांगून त्यांच्या जीवनाचा प्रवास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.
"ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांनी जवळ जवळ 77 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो शिल्प तयार केली, देशातले असे कुठले राज्य नाही की, जिथे राम सुतार यांनी तयार केलेले शिल्प नाही. जगातील किमान 15 देशांमध्ये राम सुतार यांनी तयार केलेली शिल्प अभिमानाने उभी आहेत. ज्या दगडाचे ते शिल्प तयार करतात, त्याला आकार देतात, त्याला प्रतिरूप देतात, तेव्हा त्या शिल्पातून ती व्यक्ती प्रत्यक्ष साकार होते", असंही फडणवीसांनी नमूद केलं.
शिल्पकलेतील 'किमयागारा'चा सन्मान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शिल्पकलेसारख्या काहीशा अवघड कलेला आपल्या परिसस्पर्शाने नवीन आयाम मिळवून दिलेल्या सुतार यांचे या क्षेत्रातील योगदान निव्वळ अतुलनीय आहे. आपल्या शिल्पकलेने देशातील अनेक दिग्गज नेते, महापुरुष तसेच अनेक प्रभृतींची शिल्पे त्यांनी घडवली. आजवरच्या मूर्तिकलेतून साकारलेल्या शिल्पकृतींमधून त्यांचे कार्य आगामी पिढ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल." त्यांना देण्यात आलेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने या पुरस्काराचे भूषण वाढले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुतार यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केली.
पवार म्हणाले, "मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि 25 लाखांचा धनादेश असं स्वरूप असलेल्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराचा हा सन्मान हा राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आदर, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. महाराष्ट्राच्या इतिहास, कला आणि सांस्कृतिक वैभवाला अधोरेखित करणारा हा सन्मान राम सुतार यांच्या कार्याचा अभिमानपूर्वक गौरव करतो. त्यांच्या अद्वितीय कलाकृतींसाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 मार्चला विधानसभेत या पुरस्कारसंदर्भात निवेदनाद्वारे घोषणा केली होती.
सभागृहात या माहिती देताना ते म्हणाले होते, "महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो. या पुरस्काराचं स्वरूप 25 लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असं आहे."
"12 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या नावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, तरी ते अजूनही शिल्पं तयार करत आहेत." असंही त्यांनी नमूद केलं होतं.
दरम्यान, विशेषतः मुंबईतील इंदू मिलमधील 'स्टॅचू ऑफ इक्वॉलिटी' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं कामही राम सुतार हेच करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गुजरातमधील ज्या 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' ची म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची जगभरात इतकी चर्चा झाली, तो राम सुतार यांनी घडवला आहे.
तसेच त्यांनी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक पुतळे आणि मूर्ती उभारल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मातीत घडलेला शिल्पकार
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील आहेत.
मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला शिल्पकलेला वाहून घेतलं.
त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगभरात कौतुकाच्या विषय ठरल्या.
त्यांनी घडवलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचंही खूप कौतुक झालं आहे.
फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक शहरांसह जगभरातील 450 हून अधिक शहरांमध्ये त्याची स्थापना करण्यासाठी निवड देखील झाली आहे.
त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिली आहे. अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि मायकेल एंजेलो यांच्या कौशल्याशी देखील केली आहे.
आज 'राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या भव्य शिल्पं तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांचा भव्य स्टुडिओ आहे.
जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची होती इच्छा
शालेय जीवनात असताना त्यांनी पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे फोटो पाहिले होते तेव्हापासून त्यांना जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची खूप इच्छा होती.
दरम्यान, गुजरातमधील साधू बेट येथील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंच.
522 फूट उंच असलेला सरदार वल्लभ भाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा मानला जातो.
दरम्यान, त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्याप्रमाणेच त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार हे देखील एक शिल्पकार आहेत आणि ते त्यांच्या वडीलांसोबत काम करतात.
सध्या भारतात बनवल्या जाणाऱ्या अनेक सर्वात मोठ्या पुतळ्यांची निर्मिती ते करत आहेत. यात अयोध्येत प्रस्तावित 251 मीटर उंच भगवान रामाचा पुतळा देखील समाविष्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)