जेव्हा गोपीचंद पडळकरांच्या गावात 4 धनगड सापडले; धनगर-धनगड असा फरक का झाला?

धनगर आणि धनगड असा फरक का झाला? धनगर आरक्षणाचा प्रश्न काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images

Published

यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे सुरू असलेलं बेमुदत उपोषण मागे घेण्यात आलं आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (ST) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला होता.

या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून उपोषण सुरू होतं.

आज (26 सप्टेंबर) भाजप नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेण्यात आले.

धनगर आणि धनगड असा फरक का झाला? धनगर आरक्षणाचा प्रश्न काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images

गिरीश महाजन यांनी म्हटलं की, दिनांक 21 सप्टेंबरला धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि यशवंत सेनेचे सर्व प्रतिनिधी यांची सह्याद्रीवर एक बैठक झाली. तुमची मागणी न्याय आहे, राज्य सरकारचा तुमच्या या निर्णयाला पाठिंबा आहे असं म्हणत राज्य सरकारने त्यांना पाठिंबा दर्शविला. मात्र, काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

त्यांची दुसरी मागणी होती की त्या आंदोलनादरम्यान जे गुन्हे दाखल झाले आहे ते मागे घेण्यात यावेत. शासनाने तेही या ठिकाणी मान्य केलं आहे.

आरक्षणासंदर्भात आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. तसेच येत्या पन्नास दिवसात पुढील कारवाई कर करू असं आश्वासनही सरकारने त्यांना दिलं आहे.

आतापर्यंत काय झालं?

धनगर आरक्षण प्रकरणी आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारकडून गुरुवारी (21 सप्टेंबर) एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित होते.

धनगर समाजाच्या तीव्र भावनांचा विचार करून तातडीची बैठक बोलवली याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करतो, असं गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं.

या बैठकीत धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र देण्याबद्दल चर्चा झाली असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

तेलंगणा राज्याने एसटी संवर्गाचं 6 टक्के आरक्षण 10 टक्के केलं. या आधारावर आम्ही मागणी केली की धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं, असं पडळकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं की, निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आवश्यकतेनुसार एक समिती गठित केली जाईल, त्यात धनगर प्रतिनिधीही असतील. जोवर अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत आदिवासी समाजाला मिळणारे लाभ धनगर समाजालाही दिले जातील.

धनगड आणि धनगर

धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवगार्तून (ST) आरक्षण द्यावं, अशी या समाजाची जुनी मागणी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे. अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आला आहे.

'ड' ऐवजी 'र' असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नसल्याचा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो.

धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावा समाजातर्फे करण्यात आला आहे.

राज्यात एक ही धनगड जातीची व्यक्ती नसल्याचा दावा करताना संयोजन समितीचे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगड जातीची व्यक्ती दाखवा, असं आवाहन केलं होतं.

2019 साली गोपीचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस बीबीसी मराठीशी साधलेल्या संवादात त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं होतं.

ते म्हणाले होते, "1971 साली राज्यात 1 धनगड व्यक्ती असल्याचं आकडेवारीत नमूद करण्यात आलं होतं. वास्तविक धनगर आणि धनगड हे वेगवेगळे नाहीत. त्यांची संख्या वाढत गेली. आम्ही याबाबत स्पष्टता दिल्यावर राज्य सरकारलाही भूमिका बदलावी लागली. आमच्याच गावात 4 धनगड दिसून आले ते आमच्यापैकीच होते. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायतीत जाऊन नोंद पाहिली असता, काही धनगरांचीच नोंद धनगड असल्याचं दिसून आलं. या दोन्हींमध्ये काहीही फरक नाही."

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या अशी मागणी करत 'भारत अगेन्स्ट करप्शन' या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

याच मुद्यावर राणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच, ईश्वर ठोंबरे आणि पुरुषोत्तम धाखोले यांनी तीन स्वतंत्र रीट याचिका दाखल केल्या आहेत.

धनगर आरक्षणासाठी आतापर्यंत झालेली आंदोलनं आणि ठळक घटना

2014 ला निवडणुकांवेळी नरेंद्र मोदी यांनी साधारणतः तीन सभांमध्ये धनगर आरक्षणावर भाष्य केलं होतं. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यात झालेल्या या सभांमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाला हवा दिली होती. त्या बारामतीच्या सभेचा वारंवार उल्लेख केला जातो.

  • जानेवारी 2015मध्ये वर्ध्यात धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणावरून आम्ही मागे हटणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं.
  • 2015च्या पावसाळी अधिवेशनात जुलैमध्ये विरोधकांनी धनगरी वेषात विधानसभेबाहेर निदर्शनं करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सत्तेत आल्यानंतर एक महिन्याच्या आत धनगरांना अनुसूचीत जमातीचं आरक्षण लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्याला वर्ष झाल्यानिमित्त हे आंदोलन होतं.
  • 2017ला मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या भाजप खासदारांच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी उपस्थित केला होता. नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान धनगर युवक मंडळातर्फे मोर्चा काढण्यात आला होता.
  • मे 2018मध्ये आझाद मैदानात ढोलगर्जना आंदोलन करण्यात आलं. चौंडी, अहमदनगरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिवसानिमित्त लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कार्यक्रमात व्यत्यय आणल्याबद्दल 51 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
  • 2018च्या ऑगस्ट महिन्यात राज्यभरात धनगर समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. शेळ्या-मेंढ्यांसह ढोलताशे, हलगी, पिवळे झेंडे घेऊन लोक आंदोलनात सहभागी झाले होते.
  • राज्यात एक ही धनगड जातीची व्यक्ती नसल्याचा दावा करताना संयोजन समितीचे उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर यांनी धनगड जातीची व्यक्ती दाखवा असं आवाहन केलं होतं. पावसाळी अधिवेशनात आमदार रामराव वडकुते यांनी नियम 97 अन्वये धनगर आरक्षणावर चर्चा उपस्थित केली. या चर्चेदरम्यान तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी TISS ही स्वायत्त संस्था असल्याचं सांगत या संस्थेला कोणताही घटनात्मक अधिकार किंवा दर्जा नाही. असं असताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल असा प्रश्न उपस्थित केला होता.
  • नोव्हेंबर2018 मध्ये महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण जाहीर करत असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा विरोधकांतर्फे उचलला गेला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं.
  • 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' (टिस)चा बहूप्रतिक्षित अहवाल याच महिन्यात राज्य सरकारला मिळाला होता. हायकोर्टातही एका याचिकेवर उत्तर देताना राज्य सरकारने या अहवालाचा अभ्यास सुरू असल्याचं म्हटलं.
  • उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर या प्रकरणात विशेष काही होऊ शकलं नाही. यानंतर पुढील 2 वर्षे कोरोनामुळे हे प्रकरण प्रलंबित राहिलं.
  • धनगर आरक्षणासाठी सातत्याने आवाज उठवणारे गोपीचंद पडळकर यांना यादरम्यान भाजपच्या वतीने विधान परिषदेवर पाठवण्यात आलं.
  • पुढे, शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दोन महिन्यांत याप्रकरणी अंतिम सुनावणी होती. पण सरकार पक्षाने यादरम्यान महाधिवक्त्यांना बदललं. नंतर सुनावणी काही काळासाठी स्थगित झाली.
  • सध्या या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोणती तारीख देण्यात आली आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
  • यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी 6 सप्टेंबरपासून चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे.
  • 8 सप्टेंबर 2023 रोजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी आलेल्या धनगर समाजाच्या शेखर बंगाळे या कार्यकर्त्याने निवेदन देत थेट अंगावर भंडारा उधळल्याची मोठी चर्चा झाली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)