सफाई कर्मचाऱ्याने फ्रिज बंद केला आणि 20 वर्षं केलेलं संशोधन झालं उद्ध्वस्त

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मॅटिआ बुबालो
- Role, बीबीसी न्यूज
- Published
त्रासदायक वाटणाऱ्या अलार्मचा आवाज आला म्हणून एका सफाई कामगाराने एका प्रयोगशाळेतला फ्रिज बंदच करुन टाकला. पण यामुळे जवळपास 2 दशकं केलेलं संशोधन नष्ट झालं. या फ्रिजमध्ये गेल्या 20 वर्षांत संशोधन केलेले नमुने ठेवण्यात आले होते. ही माहिती अमेरिकेतल्या वकिलांनी दिली आहे. 2020 साली ही कथित घटना घडली होती.
या यंत्रणेत बीपचा आवाज बंद करण्यासाठी म्यूटचे चिन्ह दाखवण्यात आले होते मात्र एरर दिसल्यावर संपूर्ण यंत्रणाच बंद करण्यात आली असं सांगण्यात आलं आहे.
या प्रयोगशाळेत उणे 80 सेल्सियस तापमानाला नमुने साठवले होते ते आता वाचवण्याच्या योग्य राहिलेले नाहीत. यामुळे 10 लाख डॉलर्सचं नुकसान झाल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.
ही प्रयोगशाळा ज्या शाळेत होती ती या सफाई कामगाराच्या कंपनीविरोधात दावा करत असून त्यांनी या कामगारास अयोग्य प्रशिक्षण दिल्याचा ठपका शाळेने ठेवला आहे.
न्य यॉर्कच्या रेन्सेलिअर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली होती असं टाइम्स युनियनने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
या प्रयोगशाळेत प्राध्यापक के व्ही लक्ष्मी यांच्या नेतृत्वात प्रकाशसंश्लेषणावर संशोधन सुरू होतं आणि ते सोलर पॅनलच्या विकासात भविष्यात अत्यंत नाविन्यपूर्ण ठरलं असतं असा या संस्थेच्या वकिलांनी दावा केला आहे.
फ्रिजर बंद होण्याआधी काही दिवस तापमान 3 अंशांनी वाढल्याचा संदेश देणारा एक अलार्म वाजला होता. हे असं तापमानात वरखाली होणं मोठा धक्का देणारं ठरलं असतं तरी त्यावेळेस पेशींची रचना, नमुने आणि संशोधनाला काहीही फटका बसला नव्हता असं लक्ष्मी यांनी स्पष्ट केल्याचं या खटल्यात म्हटलं आहे.
कोव्हिडच्या निर्बंधामुळे यंत्रणेत दुरुस्तीसाठी आठवड्याभराचा काळ लागला असता.
मात्र या काळातच फ्रिजरवरील एका चिन्हाजवळ संदेश आला, तो असा होता- “हा फ्रिज दुरुस्ती सुरू असल्यामुळे बिपचा आवाज येत आहे, कृपया तो हलवू नका किंवा त्याचा विद्युतप्रवाह बंद करू नका. इथे कोणत्याही क्लिनिंगची गरज नाही. तुम्हाला हा आवाज नको असेल तर अलार्म/टेस्ट म्यूट बटण 5-10 सेकंद दाबून तो बंद करू शकता.”

फोटो स्रोत, Getty Images
पण हा आवाज काही दिवस सुरूच राहिला. मग सफाई कर्मचाऱ्याने थेट सर्किट ब्रेकर बंद करुन या फ्रिजचा विद्युतपुरवठाच बंद केला.
यातील उणे 80 अंशाखाली ठेवलेले नमुन्यांपैकी बहुतांश नमुने यामुळे एकतर नष्ट झाले किंवा ते वाचवण्याच्या स्थितीपलिकडे गेले. असं या खटल्यात म्हटलं आहे.
याची माहिती देताना संस्थेच्या पब्लिक सेफ्टी स्टाफने सांगितले, सफाई कर्मचाऱ्याला आपण ब्रेकर हटवत आहोत असं वाटलं होतं मात्र ते वास्तवात बंद करण्यात आलं होतं, असं न्यू यॉर्क पोस्टने बातमीत म्हटलंय.
यातील बिघाड लक्षात आल्यावर संशोधकांना त्याचे तापमान 50 अंशांनी म्हणजे उणे 30 अंशांवर आल्याचं समजलं.
वकील मायकेल गिन्सबर्ग यांनी एनबीसीशी बोलताना सांगितले, “कर्मचाऱ्याला अत्यंत त्रासदायक अलार्म ऐकू आला. त्याच्याशी बोलल्यावर त्याला अजूनही आपण काही चूक केल्याचं वाटत नसून आपण मदत करू इच्छित होतो असं त्याला वाटतं.”
या सफाई कर्मचाऱ्याला योग्य प्रशिक्षण देण्यात त्याची कंपनी कमी पडली असं या संस्थेच्या वकिलांनी म्हटलं आहे. मात्र कंपनीने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























