पॅलेट गन म्हणजे नेमकं काय? तिच्यावरून इतका वाद का सुरू आहे?

2016 मध्ये श्रीनगरमध्ये पॅलेट गनचा वापर करताना एक सुरक्षा कर्मचारी. (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, 2016 मध्ये श्रीनगरमध्ये पॅलेट गनचा वापर करताना एक सुरक्षा कर्मचारी. (फाइल फोटो)
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

'कॉक्रोच जनता पार्टी'च्या 'संसद मार्च'दरम्यान सोमवारी (20 जुलै) जंतर-मंतर आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी लाठीचार्ज केला. सुरक्षा दलाच्या या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले.

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारामुळे त्यांचेही अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 21 वर्षांच्या एका विद्यार्थिनीवर दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, दोन दिवसांपूर्वी तिचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, ती आता शुद्धीवर आली असून तिची प्रकृती स्थिर आहे. तरीही तिला अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचारांची गरज आहे.

या सर्व घडामोडींमध्ये काही आंदोलकांविरूद्ध पॅलेट गनचा वापर झाल्याचे आरोपही केले जात आहेत.

राहुल गांधींनी उपस्थित केला मुद्दा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी साहिल नावाच्या तरुणाला प्रसारमाध्यमांसमोर आणलं.

त्यांनी म्हटलं की, "20 जुलै रोजी दिल्लीत शांततेत आंदोलन करणाऱ्या 19 वर्षीय साहिलच्या चेहऱ्यावर दिल्ली पोलिसांनी पॅलेट हल्ला केला."

"साहिल हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी तो पार्ट-टाइम कार चालवण्याचं काम करतो. 2025 मध्ये झालेल्या एसएससी दिल्ली पोलीस भरती परीक्षेच्या पेपरफुटीचाही तो स्वतः बळी ठरला आहे."

साहिलबरोबर राहुल गांधी

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, साहिलबरोबर राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, "आम्ही साहिलसोबत आहोत. उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत आम्ही आहोत. मोदीजी, या पापाबद्दल देशातील मुलांची माफी मागा, जबाबदारांवर कठोर कारवाई करा आणि धर्मेंद्र प्रधान यांना त्वरीत पदावरून हटवा."

पॅलेट गन म्हणजे नेमकं काय?

सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी 20 जुलैच्या रात्री एक्सवर एका जखमीचा व्हीडिओ पोस्ट केला होता.

त्यांनी लिहिलं होतं, "दिल्ली पोलिसांची दादागिरी! शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला."

सौरव दास यांच्या पोस्टला उत्तर देताना नवी दिल्लीचे डीसीपी यांनी एक्सवर लिहिले, "शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत."

'सर्वसामान्य लोकांनी व्हेरिफाय न झालेली माहिती किंवा पोस्ट शेअर करू नये. कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांकडून तपासून घ्या.'

मे 2019 मध्ये श्रीनगरच्या जुन्या शहरातील जामा मशिदीबाहेर झालेल्या झटापटीदरम्यान आंदोलकांवर पॅलेट गन रोखून उभा असलेला एक पोलीस. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मे 2019 मध्ये श्रीनगरच्या जुन्या शहरातील जामा मशिदीबाहेर झालेल्या झटापटीदरम्यान आंदोलकांवर पॅलेट गन रोखून उभा असलेला एक पोलीस. (फाइल फोटो)

परंतु, आता काही प्रसारमाध्यमांमध्ये सोमवारी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच, दिल्लीतील रुग्णालयांमध्ये पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या किमान तिघांवर उपचार सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

पण पॅलेट गन म्हणजे नेमकं काय आणि तिच्या वापरावरून इतका वाद का होत आहे?

जगभरात पोलीस आणि सुरक्षा दल संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही बिगर घातक शस्त्रांचा वापर करतात. त्यामध्ये पॅलेट गनचाही समावेश होतो. याशिवाय अश्रुधूराचे नळकांडे, पाण्याचा मारा, पेपर स्प्रे आणि टेझर गन यांचाही वापर केला जातो.

पॅलेट गन हे हवेच्या दाबावर (एअर पॉवर्ड) चालणारं शस्त्र आहे. यातून धातूचे किंवा प्लास्टिकचे छोटे गोळे वेगाने बाहेर फेकले जातात. काही वेळा जमावावर नियंत्रण मिळण्यासाठी सुरक्षा दल याचा वापर करतात. तसेच, ही गन खेळांमध्ये आणि कीटक नियंत्रणासाठीही वापरली जाते.

पॅलेट गनचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात.

पहिला प्रकार म्हणजे एअर पिस्टल. ही हँडगन (हातात धरून वापरायचे शस्त्र) स्प्रिंग, गॅस किंवा कार्बन डायऑक्साइडच्या मदतीने चालते. याचा उपयोग प्रामुख्याने नेमबाजीच्या सरावासाठी केला जातो.

दुसरा प्रकार म्हणजे एअर रायफल. या लांब नळीच्या बंदुका असतात. त्यांचा नेम अधिक अचूक लागतो. छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी आणि काही क्रीडा प्रकारांमध्ये त्यांचा वापर केला जातो.

तिसरा प्रकार म्हणजे क्राउड कंट्रोल शॉटगन. हे 12 गेज पंप-ॲक्शन शस्त्र असते. सुरक्षा दलाकडून याचा वापर करतात. यातून अनेक लहान पॅलेट (छर्रे) असलेली काडतुसे एकाच वेळी डागली जातात.

सामान्य बंदुकांपेक्षा पॅलेट गन वेगळी असते. कारण यात गोळी झाडण्यासाठी दारूगोळ्याच्या स्फोटाऐवजी कॉम्प्रेस्ड एअरचा वापर केला जातो.

पॅलेट गनचे छर्रे (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, पॅलेट गनचे छर्रे (फाइल फोटो)

या सुधारित पंप-ॲक्शन शस्त्रातून काडतुसे डागली जातात. त्यामध्ये शिसे, धातू किंवा रबरचे छोटे पॅलेट असतात. लक्ष्यावर आदळल्यानंतर हे पॅलेट वेगाने पसरतात आणि गंभीर दुखापत होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये यामुळे डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

पॅलेट गनचा प्रभाव साधारणपणे कमी अंतरापर्यंत असतो. पण, अगदी जवळून वापरल्यास ती जीवघेणी ठरू शकते, विशेषतः डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवांना इजा झाल्यास. त्यातील छर्रे शरीराच्या मऊ ऊतींमध्ये (सॉफ्ट टिश्यू) घुसून गंभीर दुखापत होऊ शकते.

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, 20 जुलै रोजी नेमकं काय घडलं, हे शोधण्यासाठी सीआरपीएफने चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर, रॅपिड ॲक्शन फोर्सच्या (आरएएफ) जवानांनी आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर केला होता का, याचीही चौकशी केली जात आहे.

आरएएफ ही सीआरपीएफची विशेष तुकडी आहे. 1992 मध्ये दंगली हाताळण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली होती.

पॅलेट गनमुळे जखमी झालेले लोक

20 जुलैच्या आंदोलनानंतर आणि सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईनंतर पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या किमान तिघांची माहिती समोर आली आहे.

रुग्णालयात दाखल असलेला 25 वर्षीय इर्शाद शेख गुरुग्राममध्ये काम करतो. 19 वर्षीय साहिल लोचब हा दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आणि तिसरी व्यक्ती 'आउटलुक' मासिकात काम करणारा 28 वर्षीय पत्रकार आहे.

दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर पॅलेट गन वापरल्याचा आरोप फेटाळला आहे. पण, पॅलेट गन आणि शॉक बॅटन ही रॅपिड ॲक्शन फोर्सच्या साधनसामग्रीचा भाग आहेत.

सीआरपीएफच्या या विशेष तुकडीचे जवान 20 जुलै रोजी पोलिसांसोबत तैनात होते. सध्या देखील जंतर-मंतर परिसरात त्यांना तैनात करण्यात आले आहे.

सौरव दास यांनी दिल्ली पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचं म्हटलं होतं. तर दिल्ली पोलिसांनी हा आरोप फेटाळला होता.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सौरव दास यांनी दिल्ली पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचं म्हटलं होतं. तर दिल्ली पोलिसांनी हा आरोप फेटाळला होता.

'द हिंदू'च्या एका वृत्तानुसार, सोमवारी पालिका बाजारजवळ आरएएफच्या एका अधिकाऱ्याने इर्शादला मारहाण केली होती. इर्शादच्या मित्राने सांगितलं की, त्याच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर सुमारे 30 ते 40 जखमा झाल्या होत्या. त्यापैकी मानेवरील जखमेसह 4 जखमा गंभीर होत्या. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

'द हिंदू'च्या आणखी एका वृत्तानुसार, पॅलेट गनचा शेवटचा वापर 2024 मधील शेतकरी आंदोलनादरम्यान पंजाब-हरियाणा सीमेवरील खनौरी आणि शंभू सीमेवर करण्यात आला होता.

त्यावेळी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप फेटाळला होता. पण शेतकरी नेत्यांनी यात अनेक लोक जखमी झाल्याचा आरोप केला होता.

2023 मध्ये मणिपूरमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचाराच्या काळातही आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि लोकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

यापूर्वी 2016 मध्ये जम्मू-काश्मीरमध्येही पॅलेट गनचा वापर करण्यात आला होता. त्या वेळी अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

साहिल लोचबची प्रकृती कशी आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दिल्लीत पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव साहिल लोचब आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या साहिलला त्याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

एम्समधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं की, साहिलच्या शरीराच्या उजव्या बाजूला पॅलेटमुळे जखमा झाल्या आहेत. "त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि वेदना कमी करण्यासाठी औषधं दिली जात आहेत. डोळ्याची दृष्टी जाईल का, याबाबत आत्ताच काही सांगणं घाईचं ठरेल. त्याच्यावर शक्य ते सर्वोत्तम उपचार सुरू आहेत."

दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा विद्यार्थी असलेल्या साहिल लोचबने सांगितलं की, 20 जुलैच्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. 2024 मधील दिल्ली पोलीस भरतीची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाल्याने तो 'निराश' झाला होता.

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, पॅलेटमुळे जखमी झालेली तिसरी व्यक्ती 'आउटलुक' मासिकातील पत्रकार आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या 22 जुलैच्या वैद्यकीय अहवालात जंतर-मंतरवरील पॅलेट गनच्या हल्ल्यात त्यांना दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या उजव्या हातावर, छातीवर आणि पाठीवर अनेक लहान लहान जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी या जखमा 'पॅलेटमुळे झालेल्या जखमांसारख्या' दिसत असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.