You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रणिती शिंदे खरंच भाजपमध्ये जातील? सुशीलकुमार शिंदेंच्या ‘त्या‘ वक्तव्याचा अर्थ
- Author, गणेश पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
भाजपकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दुसऱ्यांदा जाहीररित्या म्हटलं आहे.
“भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करा, असं म्हणाले आहेत. पण ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो. जिथे आमचे बालपण गेले. आता मी 83 वर्षांचा झालोय. या वयात दुसऱ्याशी घरोबा कसा करणार? हे शक्य नाही,” असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतंच म्हटलं.
बुधवारी (17 जानेवारी) सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी गावातील हुरडा पार्टीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिंदे बोलत होते. तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील नेते भाजपकडे वळताना दिसत आहेत.
तर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात 51 टक्के मते मिळवण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी ते इतर पक्षांतील नेत्यांना आपल्यासोबत घेऊ शकतात, असंही भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी मार्च 2019मध्येही शिंदे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचं वक्तव्य केलं होतं.
आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्याआधी शिंदे यांच्या ‘भाजप ऑफर’ वक्तव्याला आणखी महत्त्व प्राप्त झालंय.
सुशीलकुमार शिंदे यांच्या जाहीर वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी मात्र अशी कोणतीही आम्ही ऑफर दिलेली नाहीये. पण कुणी स्वत:हून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारत असेल तर त्याचं स्वागत आहे, असं म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिंदे यांना ऑफर दिल्याचं म्हटलं नाही.
मग सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला ऑफर आल्याचं वक्तव्य का केलं असावं? यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शिंदेंच्या वक्तव्यामागे काय राजकारण?
सुशीलकुमार शिंदे यांचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. तसंच काँग्रेस पक्षात आपल्या बोलण्याला काही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.
आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होतोय, असंही ते म्हणाले आहेत.
पण आता सुशीलकुमार शिंदे यांची आपल्या मुलीच्या राजकीय करिअरसाठी धडपड सुरू आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
शिंदेंचं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा यामागे काही योगायोग आहे की त्यांचं काँग्रेसअंतर्गत दबावाचे राजकारण आहे याची, चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीये.
प्रणिती शिंदेंना लोकसभेचे तिकीट मिळावं म्हणून पक्षात लॉबिंग करत असल्याच्या चर्चा सातत्यानं होतायत.
आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 2009 पासून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत.
आता प्रणिती यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
पण या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यापैकी सध्या पाच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि केवळ प्रणिती शिंदेच या काँग्रेसच्या आमदार आहेत.
त्यामुळे प्रणिती यांना खासदारकी जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
"सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. सुशीलकुमार शिंदे यांचं या ठिकाणी वर्चस्व होतं. पण त्याकाळात त्यांनी मतदारसंघात पक्षबांधणीसाठी काहीच मेहनत घेतली नाही. केवळ निवडणुकीपुरतं राजकारण केलं. त्यामुळे सध्या प्रणिती यांना निवडणूक जिंकायची असेल तर रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागणार आहे," असं सोलापूरमधील दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
पण कन्या प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणात लाँच करण्यासाठी कदाचित हे पक्षांतर्गत दबावतंत्र असू शकतं, असं मुजावर यांना वाटतं.
सुशीलकुमार शिंदे यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही, हे स्पष्ट केलं असलं तरी चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांनी 'प्रणिती तिचा ती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते', असंही म्हटलं आहे.
"मी काँग्रेसी आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही", असं शिंदे म्हणाले. मग प्रणिती शिंदे या भाजपात जाणार का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले, "प्रणितीच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही. ती प्रगल्भ आणि स्वतंत्र आहे.”
या दरम्यान, शिंदेंच्या अशा वक्तव्यामुळे सध्या सोलापूरच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
सोलापूर मतदारसंघाची राजकीय गणिते
1952 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली. तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे.
पण 2014 पासून या मतदारसंघावर भाजपने ताबा मिळवला आहे.
सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे.
बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे. या मतदारसंघाच वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ आहे.
2014पासून हा मतदारसंघ सुशीलकुमार शिंदेंकडून निसटला. त्यानंतर त्यांना इथे पुन्हा विजय मिळवता आला नाही.
2014 साली शरद बनसोडे आणि 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता.
सोलापूर मतदारसंघात 2014च्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि 2019ला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.
त्याचा फटका सुशिलकुमार शिंदे यांना बसला होता. त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता.
पण सध्या प्रकाश आंबेडकर हे INDIA आघाडीमध्ये गेले तर तिथे तिथली मत पुन्हा कॉंग्रेसला मिळतील. दलित मुस्लिम मतांचं विभाजण होणार नाही. MIM जरी वंचितपासून वेगळी झाली असली तरी मविआमध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत.
सोलापूर मतदारसंघात सर्वाधिक अनुसूचित जातीचे मतदान आहे. त्यानंतर लिंगायत, मुस्लीम, मराठा, धनगर आणि ओबीसी समाजाची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
सोलापूरमध्ये कुणाचं पारडं जड?
सध्या सोलापूरमधून भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खासदार आहेत.
पण त्यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसंच त्यांची गे्लया पाच वर्षांतील कामगिरी सुमार असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत महास्वामीजी यांनी जनसंपर्क वाढवला नाही, असंही राजकीय विश्लेषक सांगतात.
"2014 आणि 2019मध्ये मोदी लाटेमुळे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले. पण राखीव जागेवर उमेदवार देताना भाजपला कसरत करावी लागत आहे. अजूनतरी त्यांना सोलापूरसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाहीये. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड असलं तरी त्यांना सर्वपरिचित चेहऱ्याची गरज आहे," असं सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यासाठी इतर पक्षातून उमेदवार आयातही केला जाऊ शकतो.
असं जरी भाजप नेत्यांकडून म्हटलं असलं तरी शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये जाणार नाहीत, असं जोशी सांगतात.
दुसरीकडे काँग्रेसकडे प्रणिती शिंदे यांच्यासारखा सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा आहे. पण त्यांचा संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात म्हणावासा जनसंपर्क नाहीये.
स्वत:च्या विधानसभा मतदारसंघाबाहेर त्यांचं कामही दिसून येत नाही. त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही पक्षांना इथे दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे, असं अरविंद जोशी सांगतात.
पक्षबांधणी केली नसल्याने शिंदेंनी लोकसभा निवडणूक जड वाटतेय. तर मतदारसंघात ताकद असून सर्वपरिचित उमेदवार न मिळणे हा भाजपसमोरचा प्रश्न आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे येत्या काळात आणखी चुरशीचं होऊ शकतं, असं जाणकार सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)