You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आता 'कर्ज फिटेपर्यंत 'हे'च माझं काम आहे,' वाचा, एका सेक्सवर्करच्या संघर्षाची कहाणी..
- Author, तुलसी प्रसाद रेड्डी
- Role, बीबीसीसाठी
- Published
तिरुपती शहरात राहणारी सलमा (बदललेलं नाव) एक सेक्स वर्कर आहे. इतर सेक्स वर्कर महिलांप्रमाणे सलमाचं आयुष्यही संघर्षमय आहे.
सलमाचा नवरा वारल्यानंतर आश्रयाला ती तिच्या बहिणीकडे गेली होती. एकीकडे डोक्यावर लाखोंचं कर्ज, चार मुलांची जबाबदारी, अशा स्थितीत तिच्या बहिणीनेच सलमाला वेश्या व्यवसायात ढकललं.
ती सांगते, “माझ्या आई-वडिलांनी अत्यंत कमी वयात माझं लग्न लावून दिलं. पण नवरा वारल्यानंतर सगळंच बदललं. मला सुरुवातीला दोन मुली झाल्या, नंतर एक मुलगा आणि पुन्हा एक मुलगी अशा चार अपत्यांसोबत माझा संसार सुरू होता. नवरा वारल्यानंतर माझा संसार उघड्यावर पडला. बाहेर कुठे कामालाही जाऊ शकत नव्हते. माझी परिस्थिती पाहून माझ्या बहिणीनेच मला या व्यवसायात आणलं. सुरुवातीला मी यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला. पण दिवसेंदिवस मी यामध्ये अडकतच गेले.”
नवरा असतानाही माझं जीवन संघर्षपूर्णच होतं. तो तीन-तीन महिने बाहेरगावी कामासाठी निघून जायचा.
या काळात मुलं आजारी पडली तर त्यांची व्यवस्था मलाच करावी लागायची. कर्ज काढून मला उपचाराचा खर्च भागवावा लागायचा.
“मी खूपच कमी वयात लग्नाच्या बेडीत अडकले. 11व्या वर्षी शहाणी झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षात आई-वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. 14 वर्षांची होईपर्यंत माझ्या हातात दोन मुली होत्या. नंतर 18व्या वर्षी मुलगा झाला. त्यानंतर 25 व्या वर्षी पुन्हा मुलगी झाली.
"मुले झाली तरी नवरा बाहेरच असायचा. घरखर्चासाठीचे दर आठवड्याचे 300 रुपये सोडले तर त्यावर एक दमडीही तो द्यायचा नाही.
खर्च तर दिवसेंदिवस वाढत चालला होता. म्हणून मी कर्ज घेऊन घरखर्च भागवू लागले. व्हायचं ते होणार होतं. उसने पैसे दिलेल्या लोकांनी तगादा लावणं सुरू केलं.
शेवटी मी हे सगळं माझ्या बहिणीला सांगितलं. तिनेच मला मग हे काम करण्यासाठी सुचवलं.
अडचणीत असलेल्या मुली वेश्या व्यवसायात
विविध कारणांनी अडचणीत असलेल्या, एखाद्याकडून फसवणूक झालेल्या, आपल्यासोबत काय घडलं हे सांगू न शकणाऱ्या मुलीच या व्यवसायात दाखल होत असतात, असं सलमा सांगते.
ती म्हणते, “ते रेल्वे स्टेशन, बस स्टँड परिसरात जाळं टाकून बसलेले असतात. मानसिकरित्या तणावात असलेली एखादी महिला दिसली की ते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील.
तिला आरामदायी वातावरण असल्याचं भासवतील. आम्ही आहोत, तू काळजी करू नकोस, असं म्हणतील. यानंतर नियोजनबद्धरित्या त्या महिलेला जाळ्यात ओढून वेश्या व्यवसायात ढकलण्यात येतं.
बाहेर पडणं अत्यंत अवघड
सलमा सांगते, वेश्या व्यवसायाच्या जाळ्यात एकदा अडकलेली महिला पुन्हा बाहेर पडू शकत नाही.
ती घरीही जाऊ शकत नाही, किंवा दुसरं कामही ती पुन्हा करू शकत नाही.
विशेषतः मुंबई-दिल्लीत मोठे कुंटणखाने आहेत. तिथून बाहेर पडणं मुलींना बिलकुल शक्य नसतं.
सलमाच्या मते, “दिल्लीत रेड लाईट परिसरात काही पोलिसांचेही कुंटणखाना चालकांशी लागेबंधे असतात. एखाद्या राज्यातून एखाद्या महिलेच्या शोधात कुणी पोलीस धाड टाकण्यासाठी येणार असतील, तर हे पोलीस त्यांना ही खबर पोहोचवतात. अशा स्थितीत संबंधित मुलींना सुरक्षित ठिकाणी हरवण्यात येतं. एखादी मुलगी जरी निघून गेली, तर ते कोट्यवधी रुपयांचं नुकसान मानलं जातं.”
कधी-कधी बाहेरची ऑर्डर मिळते. म्हणजे बाहेर एखाद्या ठिकाणी सेक्स करण्यासाठी जायचं असतं. त्यावेळीही आपल्यावर नजर ठेवण्यात येते. आजूबाजूला पहारा देण्यासाठी लोक असतात.
त्यांची नजर चुकवता आली, तरच पळून जाता येतं. पण बहुतांश मुली यामध्येही अपयशी ठरतात.
“दिल्ली आणि मुंबईत मुलींना विविध प्रकारच्या युक्ती वापरून या व्यवसायात कशा प्रकारे खेचलं जातं, ते मी पाहिलं आहे. मारहाण करणाऱ्या नवऱ्याचं घर सोडून आलेली महिला, आईने ओरडल्यामुळे घरून पळालेली मुलगी, अशा कित्येक जणी आता दिल्ली-मुंबईतील कुंटणखाण्यात अडकून पडलेल्या आहेत. ”
सलमा म्हणते, “दिल्लीच्या GB रोड भागात बहुतांश कुंटणखाने आहेत. तिथे असलेल्या एका सेक्स वर्कर महिलेला दिवसभरात 20-30 वेळा सेक्स करावा लागतो. हे काम करताना चित्रविचित्र प्रवृत्तींच्या लोकांशी गाठ पडते. पण कामाचा भाग म्हणून आपला तो नाईलाज असतो.”
ती पुढे सांगते, “एखादा ग्राहक आपल्यासोबत काय करेल, याची शाश्वती नसते. आपण त्यांचं न ऐकल्यास ते आक्रमक होतात. शिवीगाळ-मारहाण करतात. चावे घेतात. शरीरावर-गुप्तांगावर ब्लेडने वार करतात. सिगारेटचा चटका देऊ शकतात. किंवा केसांना पकडून फरपटत नेऊ शकतात. मलाही अशाप्रकारे एकदा मारहाण झाली होती, त्यावेळी माझ्या डोळ्याच्या बाजूला एक जखम झाली. त्याचे व्रण आजही कायम आहेत.”
आजकाल सुशिक्षित मुलीही वेश्या व्यवसायात येत असल्याचं पाहून वाईट वाटतं, असं सलमा म्हणते.
मुलांना माझ्या कामाबद्दल माहीत नाही
पूर्वीच्या काळी रोज 1 हजार रुपये कमावले तरी भागायचं. आज ते पैसे पुरत नाहीत. इथे काम केल्यानंतर मला महिन्याकाठी 30 हजार रुपये मिळतात. त्या पैशातून कर्ज फेडून घरखर्च भागवता येतो.
पण बाहेर काही करावं म्हटलं तर 10 हजारपेक्षा जास्त पगार कुणी देणार नाही. म्हणून कर्ज फिटेपर्यंत मला हेच काम करावं लागणार आहे, असं ती म्हणते.
“मुलांना आपल्या या व्यवसायाबद्दल काहीही माहीत नाही, असं सलमाने म्हटलं. ती पुढे म्हणते, “माझ्या कामाबद्दल मुलांना काहीच कल्पना नाही. दोन्ही मुलींना मी दहावीपर्यंत शिकवलं. त्यानंतर त्यांचं लग्न लावून दिलं. लहान मुलगी आणि मुलगा माझ्या आईकडे राहतात. माझ्या डोक्यावरचं कर्ज फिटेपर्यंत मी शांत झोपू शकणार नाही.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)