शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही 'आधार'सक्ती #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. शाळा प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही आधारसक्ती
शाळेत प्रवेश घेताना आता विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचं आधार कार्ड देखील लिंक केलं जाणार आहे. बोगस विद्यार्थी पटसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारकनं हा निर्णय घेतला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
बीड जिल्ह्यातील बोगस विद्यार्थी पटसंख्या प्रकरणी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती.
या समितीचा अहवाल स्वीकारून राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शाळा प्रवेशाबाबतच्या नवीन मार्गदर्शक सूचना -
- विद्यार्थ्यांचे प्रवेश हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसोबत जोडण्यात यावेत.
- प्रवेश अर्जासोबत पालकांचे सुद्धा आधार कार्ड सादर करण्यात यावे.
- शाळा व्यवस्थापन समिती ही प्रवेश देखरेख समिती म्हणून काम करेल.
- विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना शाळांनी पालकांकडून दोन प्रतीमध्ये प्रवेश अर्ज भरून घ्यावा.
- प्रवेश अर्जावर पालकांची स्वाक्षरी असावी. प्रवेश अर्जावर पालक आणि विद्यार्थ्यांचे फोटो लावलेले असावेत.
- प्रवेश अर्जाची एक प्रत केंद्र प्रमुखास देण्यात यावी. तर एक प्रत शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावी.
- शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांनी वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पटपडताळणी पार पाडावी त्यात दुरुउपयोग आढळून आल्यास संबंधित पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करावा.
- काही कारणांमुळे पालक आधारकार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणांमध्ये पालकांचे आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा.
2. नरेंद्र मोदींकडून ईडी-सीबीआयचा गैरवापर नाही - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीही चुकीचं वागत नाहीत असं म्हटलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीबीआय, आयकर विभाग, ईडी यांचा गैरवापर करत आहेत असं मला वाटत नाही. ते जे काही करत आहेत ते कायद्याच्या चौकटीत राहून करत आहेत. सत्ता राखण्यासाठी त्यांना जे आवश्यक आहे ते सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या जागी मी असतो, म्हणजेच जर मी नरेंद्र मोदी असतो तर मी देखील हेच केलं असतं जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची खुर्ची हवीच आहे. कायदेशीर मार्गाने ती वाचवणं यात काहीही चुकीचं नाही. याआधीच्या सरकारांमध्येही अशा प्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. कुणीही सत्ता राखण्यासाठी तेच करतं जे आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
“मला उद्या भाजपासोबत जाण्याचा मोह झाला तर मी जाऊ शकतो. एक तर माझा पक्ष मला अडवू शकतो किंवा माझे कुटुंबीय मला अडवू शकतात. तिसरी अशी कुणीच व्यक्ती नाही,” असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
3. नांदेडमध्ये ऑनर किलिंग; वडील आणि भावांकडून डॉक्टर मुलीची निर्घृण हत्या
नांदेड जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमामुळे संतापलेल्या वडील, भाऊ आणि मामांनीच मुलीची हत्या केली आणि गुपचूप मृतदेह जाळून टाकल्याचं समोर आलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे. ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे घडली आहे. शुभांगी जोगदंड असे मुलीचे नाव असून, ती BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती.
23 वर्षीय शुभांगी ही BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती आणि तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम जुळले. कुटुंबीयांना त्यांचं नात मान्य नव्हतं. यानंतर घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न जुळवलं, पण तिनं हे लग्न मोडलं.
यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी झाली, या रागातून आरोपी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी जोगदंड, कृष्णा आणि गोविंद या दोन चुलत भावांनी मुलीला ठार मारलं.
4. 15 वर्षं जुनी सरकारी वाहनं एप्रिलपासून रद्दीत जाणार
केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार, एप्रिल महिन्यापासून 15 वर्षं पूर्ण केलेल्या सर्व सरकारी वाहनांना रस्त्यावर धावता येणार नाहीये. कारण या वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र कालबाह्य केलं जाणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जुन्या वाहनांसाठी आधीच वाहन स्क्रॅपिंग धोरण आणलं आहे. या धोरणाचा मसुदा नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आला होता.
5. महाराष्ट्रात शनिवार-रविवारी विजांसह पावसाचा अंदाज
शनिवार आणि रविवारी पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पश्चिमी चक्रवातामुळे वातावरणात बदल झाला आहे. महाराष्ट्रात कोकण व विदर्भ वगळता नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, साताऱ्यासह मराठवाड्यात 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
शनिवार व रविवारी विजांसह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह अकोला, अमरावती, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























