उद्धव ठाकरेंची विधिमंडळ अधिवेशनात उपस्थिती

Published

विधिमंडळाच्या या सत्रात प्रथमच उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली.

शिवसेना नेते ( UBT) उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या या सत्रात पहिल्यांदाच आपली उपस्थिती लावली. सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले.

त्याआधी विरोधकांनी सरकारला अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून धारेवर धरले.

गेल्या आठवड्याप्रमाणेच विधिमंडळात कापूस आणि कांद्याचा मुद्दा चर्चेला आला. विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात यावर प्रश्न विचारले.

कापूस आणि कांद्याला दर मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांवर घोषणाबाजीही केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यावर उत्तर दिले. मात्र विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अवकाळी पावसाबाबत सरकारने तातडीने माहिती मागवली आहे. एकूण 8 जिल्ह्यात 13,729 हेक्टरचं नुकसान झालं आहे. ज्वारी, हरभरा, आंबा , काजू, द्राक्षे अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. आपर्यंत आलेल्या माहितीनुसार मदतीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. दुपारनंतर अधिकची माहिती घेऊन निवेदन केलं जाईल."

"विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या मुद्यावर फक्त राजकारण करायचं आहे. हे शेतकऱ्यांच्या बाजूने नाहीत. राज्याचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांला सरकार मदत करेल. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला मदत करेल. पंचनामे सुरू आहेत."

शिमग्याच्या दिवशीच पाऊस पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे.

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

विरोधकांच्या घोषणा

शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे झालेच पाहिजेत...अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे... जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा... कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही...बळीराजाला मदत मिळालीच पाहिजे... मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी... नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा... अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, "ज्यावेळी अख्खं जग होळी खेळत होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला आहे. तोंड बडवून घेतायेत. आज महिला दिनी शेतकरी महिला तोंड बडवून घेतायेत."

वर्धा जिल्ह्यात परवा रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा संत्रा पिकांवर मोठा फटका बसलाय.

पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळ संत्रा गळून पडला आहे. कारंजा या तालुक्यात संत्रा पिकांसह अन्य पिकांचही नुकसान झालं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. यामुळे गहू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काढणीला आलेला गहू शेतात अक्षरशः झोपला आहे.

पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)