शाडू मातीची मूर्ती कुठे विसर्जित करावी? या मूर्ती पर्यावरणपूरक असतात का?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मुळे पाण्याच्या स्रोतांतच प्रदूषण होतं म्हणत त्या ऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरल्या जाणं योग्य असल्याचं गेली काही वर्ष सांगितलं जात आहे.

मात्र या शाडू मातीच्या मूर्तीही जर विशेष काळजी घेतली नाही तर पर्यावरणपूरक ठरत नाहीत असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

शाडू मातीच्या मूर्तींचंही विसर्जन नदीपात्रात किंवा समुद्रात केलं जाऊ नये असं मत तज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

गणेशोत्सव विशेष -

पीओपी विरुद्ध शाडूमाती

2007 मध्ये आयआयटी मुंबईने केलेल्या अभ्यासात पीओपीमधील सल्फेटचा परिणाम नैसर्गिक स्रोतांवर होत असल्याचं दिसलं. पीओपीच्या विघटनासाठी लागत असलेला वेळ लक्षात घेता त्यावर बंदीची मागणी पुढे येऊ लागली.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालत त्याचं विसर्जन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्याचे आदेश सरकारला दिले.

मात्र, ही बंदी लगेच अंमलात आली नाही आणि नंतरच्या काळात ती पुढे ढकलली गेली किंवा हा मुद्दा वरचेवर कोर्टासमोर गेला.

2025 मध्ये जून महिन्यात कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार ही बंदी उठवली गेली आहे. त्यानंतर सरकारने आता पीओपीच्या मूर्ती ओळखणं शक्य व्हावं यासाठी त्यावर लाल रंगाने खुण करणं बंधनकारक केलं आहे.

मात्र पीओपीवरून सुरू असलेल्या या वादादरम्यानच अनेकांनी नैसर्गिक म्हणत शाडू मातीच्या मूर्ती बसवण्याचा पर्याय स्वीकारला.

काही जण व्यापाऱ्यांकडून या मूर्ती खरेदी करतात तर काही जणांनी स्वतः देखील या मूर्ती घडवणं सुरू केलं.

स्थानिक महापालिका, एनजीओ, पर्यावरणवादी कार्यकर्ते अशा अनेकांकडून शाडू मातीच्या मूर्ती घडवण्यासाठी प्रशिक्षणाचंही आयोजन करण्यात आलं.

पर्यावरणपूरक असल्याचं समजलं जात असल्याने याचं विसर्जनही नदीपात्रात किंवा पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये केलं जातं. मात्र असं विसर्जन होणं हानिकारक आहे.

ते नेमकं का यासाठी मुळात शाडूमाती नक्की काय आहे ते पाहूयात.

शाडू माती म्हणजे काय?

शाडू माती म्हणजे पांढरट करड्या रंगाची, अत्यंत बारीक कणांची नैसर्गिक माती आहे, पाण्यात कालवल्यानंतर या मातीला आकार देता योते.

त्याचे कण बारीक असल्यामुळे ती पाणी सहज शोषून घेते आणि दिलेला आकार कायमही राहतो.

शाडू मातीपासून घडवलेल्या आकाराला बेकिंगची गरज पडत नाही.

ही माती पर्यावरणपूरक का नाही?

पण तज्ज्ञांच्या मते मात्र ही माती पर्यावरण पूरक नाही. याचं कारण म्हणजे पीओपीपेक्षा या मातीचं वेगाने विघटन होतं हे जरी खरं असलं तरी ती पाण्याच्या स्रोतात मिसळण्यामुळे नुकसान होत असल्याचं तज्ज्ञ मांडतात.

नेमकं काय होतं याविषयी बोलताना गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँण्ड इकॉनॉमिक्सच्या सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे डॉ. गुरुदास नूलकर सांगतात, "शाडू माती किंवा पीओपी हा वाद आपण बाजूला ठेवूया पण ही आपण जी माती टाकतो ती त्या नदीचा नैसर्गिक घटक नाही ते बाहेरून आलेलं आहे. शाडू माती आपण पुण्याबाहेरून आणली तर त्याच्या ट्रान्सपोर्टमुळे उत्सर्जन झालेलं असतं त्यामुळे त्याची कार्बन कॉस्ट येते. ती आपण जमिनीतून म्हणजे टेरेरिस्ट्रीयल इकोसिस्टिममधून काढतो."

"मग ती आपण नदीमध्ये विसर्जित करतो म्हणजे अॅक्वेटिक इकोसिस्टिममध्ये. शाडू मातीचं नदीमध्ये विघटन झालं तरी ती तरंगत रहाते. आणि जेव्हा ती खाली जाऊन बसते तेव्हा तिकडे सबसॉईल रिचार्ज झोन बंद होऊ शकतात. हे छोट्या गावात काही गणपती विसर्जित होत असतील तर ठीक आहे. पण शहरात जेव्हा लाखो मूर्ती विसर्जित होतात तेव्हा कटाक्षाने याचा विचार केला पाहिजे," असं नूलकर सांगतात.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार विसर्जित होणार्‍या मूर्तींपैकी जवळपास 80 ते 85 टक्के मूर्ती पीओपीच्या तर 15 ते 20 टक्के या शाडू मातीच्या आहेत असं ठाण्याच्या रोहित जोशींनी आरटीआय अंतर्गत काढलेली माहिती सांगते.

तर पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार जवळपास साडेपाच लाख मूर्तींचं विसर्जन हे हौदात झालं किंवा त्या मूर्ती दान केल्या गेल्या. उरलेल्या सर्व मूर्ती या नदीपात्रात विसर्जित केल्या गेल्या जातात. पण या गोळा केलेल्या मूर्ती देखील मुंबई आणि ठाण्यात खाडी किंवा समुद्रातच विसर्जित केल्या गेल्याचा दावा जोशी करतात.

रोहित जोशी हे पीओपी मूर्तींच्या विरोधातील न्यायालयातील प्रकरणात याचिकाकर्ते आहेत.

जोशी सांगतात, "मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये 46 लाख किलो पीओपी समुद्रात टाकलं गेलं. याच्या 15 टक्के शाडू माती टाकली गेली. म्हणजेच साधारण सात लाख किलो शाडू माती समुद्रात मिसळली गेली. ठाण्यातल्या खाडीत असंच 6 लाख किलो पीओपी गेलं तर 90 हजार किलो शाडू माती. शाडू माती असो किंवा पीओपी ते जर रिसायकल झालं नाही तर त्याने पर्यावरणाचं नुकसानच होतं."

रोहित जोशींनी केलेल्या पाहणीनुसार जवळपास 6 प्रकारच्या मूर्ती सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी पीओपी आणि शाडू माती व्यतिरिक्त लाल माती, पेपर मॅशे, गोमय आणि मातीच्या मिश्रणाने बनवलेली अशा अनेक प्रकारच्या मूर्ती मिळतात.

मातीच्या मूर्तीत वापरल्या जाणाऱ्या मूर्तीमध्ये माती बारीक असण्याबरोबरच त्या सोबतचे इतर घटकही हानिकारक असल्याचं दिसतं.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहितीनुसार या मूर्तीमध्ये सिलिका, लोखंड, अ‍ॅल्युमिनियम, मँगनिज, पोटॅशियम, सोडियम अशी 8 मिनरल्स त्यांच्या कम्पाऊन्ड्स सह मिळतात.

या मूर्तींवरचे रंग देखील धोकादायक ठरतात. यामुळे होणारं नुकसान मांडताना जिवितनदी या संस्थेच्या संस्थापक शैलजा देशपांडे सांगतात, "नैसर्गिक स्त्रोत असणाऱ्या वाहत्या पाण्यात विसर्जन झालं तर मुळात शाडू मातीचं विघटन होऊन ती पाण्यात पसरते. त्यानंतर पाण्याच्या खाली तिचा थर तयार होतो. शाडू माती ही चिकट असल्याने त्यामुळे पाण्याच्या भूजल पुनर्भरणावर परिणाम होतो.

"यापैकी कॅल्शियम आणि पोटॅशियम हेच पाण्यात मिसळले जातात. शाडू मातीच्या थरामुळे पाण्याची खोली देखील कमी होते. याचा परिणाम पाण्यातील जैवविविधतेवर होतोच शिवाय पिण्यासाठी हे पाणी वापरलं जात असेल तर ते देखील धोकादायक ठरतं," शैलजा देशपांडे सांगतात.

प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाय?

तज्ज्ञांच्या मते सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे शाडूमातीची मूर्ती असली तरी तिचं विसर्जन हे नदी किंवा समुद्रात न करता हौदात करणं किंवा ती दान करणं हेच योग्य.

तसंच घरच्या घरी देखील विसर्जन करून मातीचा पुनर्वापर शक्य आहे. या माध्यमातून ही माती रिसायकल होण्याची शक्यता वाढते. या मूर्तींवर नैसर्गिक रंग वापरणं जास्त योग्य मानलं जातं.

तसंच केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या गाईडलाईन्स नुसार झाडाच्या वाळलेल्या झाडांच्या किंवा वनस्पतींच्या राळेचा उपयोग किंवा फुलांच्या रंगाचा उपयोग मूर्तीमध्ये केला जावा.

सजावटीसाठी देखील अशाच साहित्याचा वापर व्हावा. तसंच जर या मूर्तीचं नदी किंवा समुद्रात विसर्जन होत असेल तर तिथं किती प्रमाणात प्रदूषण झालं आहे यासाठी पाण्याची चाचणी केली जाऊन उपाय योजना केल्या जाव्यात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)