महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात, पुढील 2-3 दिवस हवामान कसे असेल?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्रात पाऊस पुन्हा बरसतो आहे, पण नेहमीच्या सरासरीपेक्षा तो तुलनेनं कमी आहे. गेल्या 24 तासांत कोकण आणि घाट प्रदेशात काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या आहेत. तसंच पुढचे 2-3 दिवस इथे पावसाची शक्यता आहे.

त्याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कसं असेल, जाणून घेऊयात.

20 जुलैला दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये पाहिलं, तर भारताच्या उत्तर आणि ईशान्य भागात मान्सून अधिक सक्रीय असल्याचं दिसतं. महाराष्ट्रावरही ढग दाटले आहेत, पण तुलनेनं हे विरळ आवरण आहे.

पुढचे 7 दिवस महाराष्ट्रासह पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात काही भागांत जोरदार पाऊस तर पडेल, पण एकूण प्रदेशाची आकडेवारी पाहता, जुलैच्या या काळातील नेहमीच्या सरासरीपेक्षा तुलनेनं कमीच राहण्याची शक्यता आहे.

विशेषतः किनारी भागांत जोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

सध्या नंदूरबार, हिंगोली, गडचिरोली तसंच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसात मोठी तूट आहे. त्यामुळे इथे लोक पावसाची तीव्रतेनं वाट पाहतायत.

पुढच्या 24 तासांत मुंबई आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी पावासच्या जोरदार ते अति जोरदार सरींची शक्यता आहे.

तसंच विदर्भात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो.

मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार 20 जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे आणि लगतच्या घाट प्रदेशात मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट आहे.

तर परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, संभाजीनगर, जळगाव इथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं 21 जुलैला मुंबई, ठाणे, रायगड हे जिल्हे आणि पुण्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

तर पालघर, रत्नागिरी हे जिल्हे आणि सातारा व नाशिकच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी यलो अलर्ट दिलेला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)