You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक बेवारस मृतदेह, ब्रीफकेसच्या मदतीने हिटलरचा विश्वासघात केला आणि...
- Author, जॉनी विल्किस
- Role, बीबीसी हिस्ट्री एक्स्ट्रा
- Published
तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. 1943 मध्ये मित्र राष्ट्र असलेल्या ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने सिसिली बेट ताब्यात घेण्याची योजना आखली. यात दोन ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांची मुख्य भूमिका होती.
या युद्धात जर्मनीला नेस्तनाबूत करण्यासाठी मदत झाली होती, एक मृतदेह, एक पाणबुडी आणि काही कागदपत्रांनी भरलेल्या ब्रीफकेसची.
मित्र राष्ट्रांनी लढवलेली शक्कल कामी आली आणि दुसऱ्या महायुद्धाला कलाटणी मिळाली. त्यात हजारो जीव वाचले.
पण नेमकं घडलं काय होतं?
अॅडॉल्फ क्लॉस आणि कार्ल-एरिक कुहलेन्थल हे दोघेही जर्मन लष्करी गुप्तचर सेवेतील अधिकारी होते. त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरूच होतं. एके दिवशी या दोन जर्मन गुप्तचर अधिकाऱ्यांना अतिशय महत्वपूर्ण माहिती समजली. त्या दोघांचाही त्यांच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. कारण त्यांना मिळालेल्या माहितीमुळे दुसऱ्या महायुद्धाला वेगळच वळण लागणार होतं.
30 एप्रिल 1943 रोजी रॉयल मरीन या ब्रिटिश नेव्हीतील एका अधिकाऱ्याचा मृतदेह जर्मन हद्दीतील समुद्रकिनाऱ्यावर तरंगताना सापडला. हा अधिकारी विमान अपघातात समुद्रात पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
हा मृतदेह सापडला होता एका मच्छिमाराला. त्याने जर्मन अधिकाऱ्यांना कळवून मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला
या अधिकाऱ्याच्या खिशात ब्रिटिश आर्मीचं गुप्त पत्र होतं.
या पत्रात म्हटलं होतं की, पुढील काही महिन्यांत मित्र राष्ट्र ग्रीस आणि सार्डिनियावर आक्रमण करणार आहेत. यातून जर्मनी आणि शत्रू राष्ट्रांना युरोपमध्ये शिरकाव करण्यापासून रोखण्याचं नियोजन होतं.
या पत्राची एक प्रत हिटलरला देण्यात आली. त्याने ताबडतोब ग्रीस, सार्डिनिया आणि बाल्कन देशांच्या रक्षणासाठी पायदळ, पॅन्झर डिव्हीजन, युद्धनौका, तोफखाना आणि टॉर्पेडो बोट एकत्रित करण्याचे आदेश दिले.
आता जर्मन स्वतःला भाग्यवान समजू लागले होते. कारण त्यांना ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याचं ते पत्र सापडलं होतं आणि त्यामुळे मित्र राष्ट्रांचं आक्रमण त्यांना परतवून लावता येणार होतं.
पण तिकडे लंडनमधील परिस्थिती काही वेगळीच होती. अंधुक, अरुंद तळघरात इंग्रज अधिकारी आनंदाने उड्या मारत होते. जर्मनी युद्धाची तयारी करत आहे हे ऐकून सर्वचजण आनंदात होते.
विन्स्टन चर्चिल यांना एक टेलिग्राम मिळाला. त्यावर लिहिलं होतं- "Mincemeat Swallowed Rod, Line, Sinker".
त्या टेलिग्रामचा अर्थ काय होता? मिन्समीट म्हणजे काय?
ऑपरेशन मिन्समीट
जर्मन लोक आणि अॅडॉल्फ हिटलरने ब्रिटीश अधिकाऱ्यांनी रचलेल्या कटावर विश्वास ठेवला होता. समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला मृतदेह रॉयल मरीनच्या कॅप्टन विल्यम मार्टिनचा नव्हता. तो मृतदेह मायकल नावाच्या एका अनाथ व्यक्तीचा होता.
ब्रिटिशांनी एक योजना आखली. त्यानुसार काही वैयक्तिक कागदपत्रे, चाव्या, सिगारेट, शिक्के, थिएटरची तिकिटे आणि होणाऱ्या बायकोने दिलेल्या भेटवस्तू त्याच्या खिशात ठेवण्यात आल्या. योजनेनुसार ब्रिटिशांनी त्याचा मृतदेह पाण्यात सोडला. जर्मनांना सापडलेलं गुप्त पत्रही याच कटाचा एक भाग होता.
ब्रिटिशांनी जर्मन लोकांना फसवण्यासाठी आखलेली ही योजना होती. सिसिलीपासून जर्मनीचं लक्ष विचलित करण्यासाठी ‘ऑपरेशन मिन्समीट’ आखण्यात आलं होतं.
1942 च्या शेवटी शेवटी मित्र राष्ट्रांनी उत्तर आफ्रिकन मोहिमेवर विजय मिळवला. आता त्यांचं लक्ष जर्मन-व्याप्त युरोपकडे गेलं. त्यांच्या दृष्टीने सिसिली एक महत्वाचं बेट होतं. सिसिलीवर जर नियंत्रण मिळवलं तर भूमध्यसागरीय समुद्रातून जो व्यापार चालतो त्यावर नियंत्रण मिळवता येणार होतं. पण सिसिली जिंकून घेणं तितकं सोपं नव्हतं.
मात्र मित्र राष्ट्र शांत बसले नाहीत. त्यांना इटलीकडे जाणारा सिसिली हा मुख्य मार्ग काहीएक करून हवाच होता. यासाठी त्यांनी एक रणनीती आखली. त्यांनी जर्मन लोकांचं लक्ष सिसिलीकडून हटवून ग्रीसकडे लक्ष वळवलं.
त्या दिशेने ऑपरेशन बार्कले योजना पुढे आणण्यात आली. बनावट लष्कर आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. मित्र राष्ट्र आता बाल्कनवर हल्ला करणार असल्याची खात्री हिटलरला झाली होती.
‘ऑपरेशन मिन्समीट’ची कल्पना कशी सुचली?
मिन्समीट ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना होती. पण मिन्समीटची कल्पना सुचली होती 1939 च्या 'टॉर्ट मेमो' नावाच्या दस्तऐवजातून.
हे दस्ताऐवज ब्रिटनच्या नौदल गुप्तचर विभागाचे संचालक जॉन गॉडफ्रे यांनी प्रसिद्ध केलं असलं तरी याचे मूळ लेखक होते गॉडफ्रे यांचे सहाय्यक इयान फ्लेमिंग.
या दस्तऐवजामध्ये शत्रूला फसवण्याचे अनेक मार्ग सुचविण्यात आलेत. या सगळ्या क्लृप्त्या जेम्स बाँडच्या कादंबरी मध्येही दिसतात. कारण फ्लेमिंग यांनीच जेम्स बाँड ही कादंबरी लिहिली होती.
या दस्तऐवजात लिहिलेल्या एका कल्पनेप्रमाणे, "एअर फोर्सच्या गणवेशातील माणसाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सोडून त्याच्या खिशात दिशाभूल करणारी आवश्यक कागदपत्रे ठेवावीत. मृतदेह पॅराशूटमधून समुद्रात पडला असावा असा भास निर्माण व्हायला हवा. मृतदेह ताजा असावा."
सिसिली जिंकण्यासाठी पारंपरिक युद्धनीती पुरेशी नव्हती. चर्चिलच्या शब्दात ‘आवश्यक असे डावपेच’ आखणं गरजेचं होतं.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इयान फ्लेमिंगच्या या दस्तऐवजातून पॉइंट 28 चा उपयोग करायचं ठरवलं. या रणनीतीमागील खरे सूत्रधार चार्ल्स चालमांडेली आणि इवेन मॉन्टॅगू होते. दोघेही डबल एजंट म्हणून काम करायचे.
चालमंडेलीच्या डोळ्यावर मोठा भिंगाचा चष्मा आणि मोठ्या मिशा असायच्या. तो ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स मध्ये होता.
इवेन मॉन्टॅगू नेवल (नौदल) इंटेलिजन्समध्ये होता. त्यापूर्वी तो बॅरिस्टर म्हणून काम करायचा.
या दोघांनीही ज्या ग्रुपचं नेतृत्व केलं त्याला सेक्शन 17 एम नावाने ओळखलं जायचं. या ग्रुपमधील सगळे अधिकारी नौदल मुख्यालयाच्या तळघरातील अरुंद खोली क्रमांक 13 मध्ये भेटायचे. या खोलीत अंधुक प्रकाश असायचा. ऑपरेशन मिन्समीटची योजना आखण्यासाठी केवळ सहा लोकं बसू शकतील इतक्या जागेत डझनभर लोक जमा व्हायचे.
विल्यम मार्टिन, ग्लिंडवर मायकल कोण होते?
आता योजना तर तयार होती, पण मृतदेह मिळवणं ही चालमांडेली आणि मॉन्टॅगू समोरची पहिली समस्या होती. मृत शरीरावर इतर कोणत्याही प्रकारची जखम नको होती. शिवाय त्याच्या कुटुंबातील कोणीतीही व्यक्ती अस्तित्वात नको होती.
यासाठी त्या दोघांनीही पॅथॉलॉजिस्ट सर बर्नार्ड स्पिल्सबरी यांचा सल्ला घेतला. शेवटी, जानेवारी 1943 मध्ये त्यांना हे ऑपरेशन करण्यासाठी योग्य मृतदेह सापडला.
34 वर्षीय ग्लिंडवर मायकल.. ज्याला घर नव्हतं, नोकरी नव्हती, मागे कोणीही नव्हतं. त्याने जानेवारी 1943 मध्ये उंदीर मारायचं औषध पिऊन आत्महत्या केली होती. किंग्ज क्रॉसजवळील गोदामात त्याचा मृतदेह आढळून आला.
मॉन्टॅगू म्हणतो की, "हा माणूस त्याच्या मरणानंतर खऱ्या अर्थाने उपयोगी ठरला."
आणि ते अगदी खरंच होतं. कारण जर एखाद्या महत्त्वाकांक्षी इतिहासकाराने 1990 च्या दशकात या सर्व गोष्टींचा शोध लावला नसता, तर ‘ऑपरेशन मिन्समीट’मध्ये वापरण्यात आलेलं शरीर कोणाचं होतं हे माहीत पडलं नसतं आणि ग्लिंडवर मायकल इतिहासात अनामिकच राहिला असता.
चालमंडेली आणि मॉन्टॅगूने मायकलचा मृतदेह शवागाराच्या फ्रिजमध्ये लपवून ठेवला आणि इतर तयारीला लागले.
त्यांनी विल्यम मार्टिन नावाचा एक बनावट आयडी तयार केला. हे नाव रॉयल मरीनमध्ये कॉमन असं नाव होतं. त्या नावासोबत उच्च दर्जाचं अधिकारी पद जोडलं. जर्मन लोकांना लगेच लक्षात येईल असं पद न देता थोडं मध्यम दर्जाचं पद देण्यात आलं.
मृतदेहाचा फोटो काढून ओळखपत्र बनवता येत नसल्याने मायकलचा चेहरा जुळेल अशा व्यक्तीचा शोध घेणं चालू केलं. एम 15 च्या रॉनी रीड आणि मायकलच्या चेहऱ्यात साम्य असल्याचं लक्षात येताच ऑपरेशनला सुरुवात झाली. त्यांनी मायकलच्या शरीरावर नौदल अधिकाऱ्यांचे कपडे चढवले. त्याच्या खिशात कुलूप, सिगारेट, थिएटरची तिकिटे, नवीन शर्ट विकत घेतल्याची पावती, वडिलांचे पत्र, बँकेची नोटीस अशा गोष्टी ठेऊन दिल्या. ही कागदपत्रे छापण्यासाठी पाण्यात पुसली जाणार नाही अशी शाई वापरण्यात आली.
आता विल्यम मार्टिन अर्थात मायकलची एक मैत्रीण हवी होती. यासाठी एम 15 मध्ये लिपिक म्हणून काम करणाऱ्या जीन लेस्लीला तयार करण्यात आलं. तिचं टोपणनाव पॅम होतं. तिच्या नावे एंगेजमेंट रिंगची पावती आणि काही प्रेमपत्र तयार करण्यात आली.
चालमांडेली आणि मॉन्टॅगू यांनी नाझींना फसवण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेचा पुरेपूर आनंद लुटला असं म्हणता येईल. दिवंगत इतिहासकार आणि राजकारणी हर्बर्ट फिशर यांच्या कपाटातून 'मार्टिन' साठी अंडरवेअर आणण्यात आले. मार्टिनचा गणवेश एकदम व्यवस्थित बसावा यासाठी चालमंडेलीने तो बऱ्याचदा घालून पाहिला.
मॉन्टॅगूने मात्र जीन लेस्लीसोबत रोमान्स केला. मॉन्टॅगूच्या या प्रकारामुळे त्याची बायको काळजीत पडली आणि अमेरिकेहून परत आली.
आता सिसिलीवर आक्रमण करण्याची वेळ जवळ येऊ लागली होती. त्यामुळे ऑपरेशन मिन्समीट वेगाने सुरू करावं लागलं. चालमंडेली आणि मॉन्टॅगू यांनी मायकेलचा मृतदेह तयार केला, तो बर्फाच्या पेटीत टाकून स्कॉटलंडला नेला. तिथे एचएमएस सेराफ ही पाणबुडी वाट पाहत होती. मृतदेह समुद्रात टाकायला दहा दिवस लागले. पण पाणबुडीत मृतदेह आहे याची कोणाला कानोकान खबर नव्हती.
मृतदेह समुद्रात सोडल्यानंतर पाणबुडीचं इंजिन पुन्हा चालू करण्यात आलं. मृतदेह तरंगत तरंगत स्पेनच्या किनारपट्टीवर आला.
30 एप्रिलच्या सकाळी हुएल्वाजवळ एका सार्डिन मच्छिमाराने या ब्रिटिश अधिकाऱ्याचा मृतदेह पाहिला.
लढाईत मारला गेलेला अधिकारी असावा असं समजून स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मीन्समेटमध्ये काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी मार्टिनला लष्करी सन्मान देऊन मृतदेहाचे दफन केले.
मृतदेहासोबतची रहस्य
मृतदेहाच्या ट्रेंच कोटला एक ब्रीफकेस लटकलेली होती. त्याच्या आत ‘टॉप सीक्रेट’ असं लिहिलेलं एक पत्र होतं. हे पत्र म्हणजेच ‘ऑपरेशन मीन्समीट’ होतं. हे पत्र इम्पीरियल जनरल स्टाफचे व्हाईस-चीफ लेफ्टनंट जनरल सर आर्किबाल्ड नाय यांनी उत्तर आफ्रिकेतील 18 व्या आर्मी ग्रुपचे कमांडर जनरल सर हॅरोल्ड अलेक्झांडर यांना लिहिलं होतं. जर्मन लोकांना खरं वाटावं म्हणून जनरल सर आर्किबाल्ड नाय यांनी यावर सही केली होती.
पत्रात लिहिलं होतं की, "आमच्या माहितीप्रमाणे जर्मन सैन्याने ग्रीस आणि क्रीटमध्ये त्यांच्या हालचाली वाढविल्या आहेत. इम्पीरियल जनरल स्टाफच्या प्रमुखांना असं वाटतं की, जर्मनीवर हल्ला करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं सैन्यबळ नाही. त्यामुळे केप अरॅक्सोसच्या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर हल्ला करण्यासाठी सैन्याची 5 वी तुकडी आणखीन मजबूत करावी असे आदेश इम्पीरियल जनरल स्टाफच्या प्रमुखांनी दिले आहेत."
सिसिलीवर हल्ला करण्याची योजना नसल्याचंही पत्रात नमूद करण्यात आलं.
एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा मृतदेह समुद्रात सापडल्याची बातमी जर्मन लोकांना मिळाली. त्यावेळी स्पॅनिश सरकार नाझींना सहकार्य करत होतं. त्यामुळे मृतदेहासोबत पत्र देखील जर्मन गुप्तहेरांपर्यंत पोहोचल्याची खात्री ब्रिटिशांना झाली. कारण मृतदेह हुएल्वाजवळ दफन करण्यात आल्याची माहिती होती.
यावेळी जर्मन लोकांची दिशाभूल करण्यासाठी चालमंडेली आणि मॉन्टॅगू यांनी एकमेकांना टेलिग्राम केला. यात ब्रीफकेस कोणीही उघडू नये असं म्हटलं गेलं.
शिवाय त्या काळ्या ब्रीफकेसमध्ये गोपनीय कागदपत्रे आहेत. ती कोणाला दिसू नयेत आणि ब्रीफकेस उघडू नये याची काळजी घेतली पाहिजे असंही त्या टेलिग्राममध्ये लिहिलं होतं
हा टेलिग्राम अॅडॉल्फ क्लॉसने ट्रेस केला होता, त्यामुळे त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे असतील असा त्याने विचार केला.
पण खरी रणनीती तर वेगळीच होती. ही ब्रिफकेस आम्ही जर्मन लोकांच्या हातून काढून घेत आहोत असं दाखवण्यात चालमांडेली आणि मॉन्टॅगू यशस्वी ठरले. पत्र असलेला लिफाफा उघडल्याबरोबर त्यात महत्वाची माहिती आहे हे कळावं अशी तजवीज करण्यात आली होती.
‘ऑपरेशन मीन्समीट’ यशस्वी झालं का?
स्पॅनिश अधिकाऱ्यांनी मार्टिनच्या मृतदेहासोबत सापडलेल्या वस्तू जर्मन लोकांना देण्यास नकार दिला. शेवटी जर्मन गुप्तहेर संघटनेचे सर्वात वरिष्ठ एजंट, कार्ल-एरिच कुहेलेन्थल यांना हस्तक्षेप करावा लागला. अखेर एका आठवड्यानंतर त्यांना पत्र हातात मिळालं.
त्याचा फोटो काढून त्यांनी हिटलरला पाठवला. हे पत्र हिटलरपर्यंत पोहोचल्याचं ब्रिटिश अधिकाऱ्यांना माहीत होतं.
पण हिटलरने त्या पत्रावर विश्वास ठेवलाय की नाही याबद्दल ब्रिटिश साशंक होते. वातावरणात थोडा तणाव होता. पण हळूहळू त्यांना जे हवं होतं ते घडू लागलं होतं, तशा बातम्या त्यांच्या कानावर येऊ लागल्या होत्या.
हिटलर ग्रीसच्या रक्षणासाठी सैन्य पाठवत असल्याची माहिती त्यांना मिळाली. सिसिलीवरील आक्रमण रोखण्यासाठी पाठवलेलं लष्करी सैन्य ग्रीसच्या दिशेने वळवण्यात आलं होतं.
हिटलरने या पत्रावर इतका विश्वास ठेवला होता की, 10 जुलैला जेव्हा मित्र राष्ट्रांनी सिसिलीवर आक्रमण केलं तेव्हा हिटलरला गल्लत झाल्याचं वाटलं.
मित्र राष्ट्रांनी ‘हस्की’ नावाने ऑपरेशन राबवलं होतं. मित्र राष्ट्रांनी 38 दिवसांत सिसिली ताब्यात घेतली. या युद्धात अपेक्षेपेक्षा कमी जीवितहानी झाली.
पुढे मित्र राष्ट्रांनी इटलीवर आक्रमण केलं. परिणामी बेनिटो मुसोलिनीला माघार घ्यावी लागली. तिकडे हिटलरने सोव्हिएतच्या दिशेने पाठवलेलं सैन्य माघारी बोलवून इटलीच्या बचावासाठी पाठवलं.
आणि अशाप्रकारे दुसऱ्या महायुद्धाने वेगळच वळण घेतलं. मार्टिनच्या ब्रीफकेसमधील पत्र पाहिल्यानंतर जर्मन लोकांनाही वाटलं होतं की युद्ध आता वेगळ्या वळणावर आलं आहे. पण त्यांना अपेक्षित असं वळण युद्धाने घेतलंच नाही
"एक माणूस जो कधी अस्तित्वातच नव्हता," मॉन्टॅगूने या शब्दात ‘ऑपरेशन मीन्समीट’चं वर्णन केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)