You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वियर यांमध्ये नेमका फरक काय असतो?
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानं समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारी श्रेणीतून हटवलं. म्हणजेच, परस्पर संमतीने दोन प्रौढ व्यक्तींमधील समलैंगिक संबंध गुन्हा मानला जाणार नाही.
मात्र, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं बाकी आहे.
कोर्टात ही मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांमध्ये लेस्बियन, गे आणि ट्रान्सजेंडर जोडप्यांचा समावेश आहे. मूलभूत हक्कांचा हा वाद अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी L, G, B, T, Q, I, A चा अर्थ जाणून घेणे आवश्यक आहे.
समलिंगी समूहांच्या या वेगवेगळ्या ओळखीमागे दोन पैलू आहेत. एक म्हणजे शारीरिक इच्छा आणि दुसरी शरीराच्या गुप्तांगांची रचना.
यातूनच विविध लैंगिक (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल) आणि लिंग ओळख (ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स) तयार होतात.
लेस्बियन (L) : अशी स्त्री, जिला लैंगिकदृष्ट्या स्त्रीचंच आकर्षण असतं.
गे (G) : असा पुरुष, ज्याला लैंगिकदृष्ट्या पुरुषाचंच आकर्षण असतं.
अनेकदा ‘गे’ हा शब्द संपूर्ण समलैंगिक समूहासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ – ‘गे कम्युनिटी’ किंवा ‘गे पीपल’.
बायसेक्शुअल (B) : अशी व्यक्ती, जिला लैंगिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष दोन्हींचं आकर्षण असतं. ही व्यक्ती पुरुष किंवा स्त्री यांपैकी कुणीही असू शकते.
ट्रान्सजेंडर (T) : ज्या व्यक्तीची लैंगिक ओळख जन्माच्या वेळी त्याच्या शरीराच्या जननेंद्रियांच्या रचनेनुसार ठरवले गेले जाते. मात्र, ती व्यक्ती मोठी झाल्यानंतर जन्मावेळी ठरवण्यात आलेल्या लैंगिक ओळखीच्या विरुद्ध स्वत:बद्दलच्या भावनांचा अनुभव त्या व्यक्तीला येतो.
ट्रान्सजेंडर वुमन : जन्मावेळी एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख गुंप्तांगाच्या आधारे ‘पुरुष’ अशी मानली जाते. मात्र, कालांतरानं ती व्यक्ती स्वत:ला ‘स्त्री’सारखं मानू लागते.
ट्रान्सजेंडर मॅन : जन्मावेळी एखाद्या व्यक्तीची लैंगिक ओळख गुप्तांगाच्या आधारे ‘स्त्री’ अशी मानली जाते. मात्र, कालांतरानं ती व्यक्ती स्वत:ला ‘पुरुषा’सारखं मानू लागते.
औषधोपचार, 'हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी' आणि 'सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी' यांद्वारे 'ट्रान्सजेंडर' व्यक्ती तिच्या शरीराच्या जननेंद्रियांची रचना बदलतात, जेणेकरून त्यांचे शरीर त्यांना जसे वाटते तसे होते.
एखाद्या पुरुष किंवा स्त्रीप्रमाणे 'ट्रान्सजेंडर' त्यांच्या शारीरिक आवडीनुसार 'लेस्बियन ट्रान्सजेंडर', 'गे ट्रान्सजेंडर' किंवा 'बायसेक्शुअल ट्रान्सजेंडर' होऊ शकतात.
भारताच्या विविध भागात राहणाऱ्या ट्रान्सजेंडरच्या स्थानिक नावांमध्ये हिजडा, अरावणी, कोथी, शिव-शक्ती, किन्नर आणि जोगती यांचा समावेश होतो.
क्लिअर (Q) : सुरुवातीला हा शब्द समलिंगी समुदायाबद्दल द्वेष दाखवण्यासाठी वापरला जात असे.
आता समलैंगिक समूहातील काही लोक ते परत स्वीकारत आहेत. दुसरीकडे, काहींना असा विश्वास आहे की, त्यांना त्यांची ओळख केवळ त्यांच्या शारीरिक इच्छांच्या 'लेबल'पुरती मर्यादित ठेवायची नाहीय.
क्वेश्चनिंग (Q) : अशी व्यक्ती, जी स्वत:ची लैंगिक ओळख आणि शारीरिक इच्छा निश्चित करू शकली नाहीय.
इंटर-सेक्स (I) : ज्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जननेंद्रियावरून त्याची मुलगा आहे की मुलगी यातली नेमकी ओळख स्पष्ट होत नाही, त्यांना ‘इंटर-सेक्स’ म्हणतात.
त्यावेळी डॉक्टरांना जे योग्य वाटतं, त्यानुसार त्या व्यक्तीची लैंगिक ओळख ठरवली जाते आणि त्यानुसार त्याला वाढवलं जातं. वाढत्या वयानुसार, लैंगिक ओळख ठरवण्याइतकी समज आल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला पुरुष, स्त्री किंवा 'ट्रान्सजेंडर' यातलं काहीही समजू शकते.
2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात 'ट्रान्सजेंडर' ही तृतीय लिंग म्हणून ओळख दिली. याअंतर्गत त्यांना नोकरी, शिक्षण इत्यादींमध्ये आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती.
ऐलाइज (A) : समलिंगी नसूनही जे समलिंगी समूहाला पाठिंबा देतात, त्यांना ऐलाइज म्हणतात.
असेक्शुअल (A) : शारीरिकदृष्ट्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे आकर्षित न होणाऱ्या व्यक्तीला असेक्शुअल म्हणतात.
पॅनसेक्शुअल (P) : अशी व्यक्ती जी शारीरिकदृष्ट्या कोणाकडेही आकर्षित होऊ शकते. त्यांची स्वतःची लिंग आणि लैंगिक ओळख देखील निश्चित नसते.