You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
18 खुनाचे आरोप, कोर्टात साखरपुडा, जामिनावर लग्न; जाणून घ्या, गँगस्टर अनिल दुजानाचा एनकाऊंटरपर्यंतचा प्रवास
- Author, प्रियंका झा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) गँगस्टर अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला मेरठमध्ये झालेल्या एका एनकाऊंटरमध्ये ठार केल्याचा दावा केला आहे.
UP-STF चे अतिरिक्त महासंचालक अमिताभ यश यांनी सांगितलं, “सराईत गुन्हेगार अनिल दुजाना याला आमच्या पथकाने गुरुवारी दुपारी मेरठमधील एका गावात पकडलं. दुजानाने पळून जाण्याच्या प्रयत्नात आमच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो मारला गेला आहे.”
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले, “STF आणि गुंडांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत गँगस्टर अनिल दुजाना जखमी झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो चारचाकी वाहनातून प्रवास करत होता. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि मोठ्या संख्यने काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.”
पश्चिम उत्तर प्रदेशातील मोठ्या गँगस्टरपैकी एक मानला जाणारा अनिल दुजाना गेल्याच आठवड्यात तुरुंगातून बाहेर आला होता.
यूपीच्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील दुजाना गावचा रहिवासी असलेल्या अनिल दुजानावर हत्या, लूटमार, खंडणीखोरी, जमिनीवर कब्जा यांच्यासारखे 65 गंभीर गुन्हे दाखल होते.
दुजानावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका), शस्त्रास्त्र आणि गँगस्टर कायदा यांच्याअंतर्गतसुद्धा खटले दाखल करण्यात आले होते.
अनिल दुजानाची दहशत दिल्ली-एनसीआर भागात पसरली होती. यूपी पोलिसांनी दुजानावर बक्षीसही ठेवलेलं होतं.
कुख्यात माफिया सुंदर भाटी आणि त्यांच्या गँगसोबत त्याचं शत्रुत्वही होतं.
या शत्रुत्वातून आतापर्यंत अनेक हत्याही झाल्या आहेत. पण अनिल दुजानाने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवलं तेव्हा दोघे एकत्र काम करायचे.
मित्र बनले शत्रू
पश्चिम उत्तर प्रदेशात गँगवॉरची सुरुवात महेंद्र फौजी आणि सतबीर गुर्जर यांच्या दुश्मनीतून झाली.
दोघेही 1990 च्या दशकात एनकाऊंटरमध्ये मारले गेले.
यानंतर, सतबीर गुर्जरचे सहकारी असलेल्या नरेश भाटी आणि सुंदर भाटी यांच्यातील गँगवॉरची चर्चा होऊ लागली.
2000 वर्षापूर्वी अनिल दुजाना सुंदर भाटीसाठी लोखंडी सळईचा अवैध व्यवसाय करायचा.
या व्यवसायातून होणाऱ्या कमाईचा काही भाग तो सुंदर भाटी याला देत असे.
त्यावेळी अनिल दुजानाचं नाव तितकं चर्चिलं जात नव्हतं. दुजानाने आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी सुंदर भाटीच्या नावाचा आधार घेतला. हळूहळू त्याचंही नाव कुप्रसिद्ध होऊ लागलं.
पण, हे फार काळ चालू शकलं नाही. अवैध सळई व्यवसायातील व्यवहारावरूनच अनिल दुजाना आणि सुंदर भाटी यांच्यात वितुष्ट आलं. यानंतर दोघे वेगळे झाले.
पुढे अनिल दुजानाचा कल रणदीप भाटी गँगच्या दिशेने झुकला. यानंतर दुजानाने नरेश भाटी गँगसोबत मिळून लूटमार, श्रीमंत आणि व्यापारी वर्गातील लोकांकडून खंडणी वसूल करणं, अशी कामे सुरू केली.
UP-STF ने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे की अनिल दुजानाने गुन्हेगारी विश्वात सक्रिय होताच आपल्या साथीदारांसोत मिळून हत्येची सुपारी घेणंही सुरू केलं होतं.
सुंदर भाटी गँगसोबतची जुनी दुश्मनी
2004 सालची गोष्ट आहे. त्यावेळी सुंदर भाटी गँगने नरेश भाटीची हत्या केली.
UP-STF च्या माहितीनुसार, त्याच्या पुढच्याच वर्षी नरेश भाटीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्याचा छोटा भाऊ रणपाल भाटी याने सुंदर भाटीचा भाचा लाला फौजी याची हत्या केली.
2006 मध्ये रणपाल भाटी याला UP पोलिसांनी एका चकमकीत ठार केलं. यानंतर नरेश भाटी गँगची सुत्रं त्याचा आणखी एक लहान भाऊ रणदीप भाटी आणि भाचा अमित कसाना यांनी सांभाळली. दोघांनी गँगची आखणी नव्याने करून पुन्हा काम सुरू केलं.
नरेश भाटीच्या गॅंगमध्ये अनिल दुजाना गेला. दरम्यान, अनिल दुजाना हासुद्धा या गँगमध्ये सामील झाला. तेव्हापासून अनिल दुजाना आणि सुंदर भाटी यांच्यातील गँगवॉर सुरू होतं.
2011 मध्ये सुंदर भाटीला मारण्यासाठी त्याच्या भाच्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला.
रणदीप भाटी, अमित कसाना आणि अनिल दुजाना यांनी मिळून लग्नाच्या कार्यक्रमात एके-47 बंदुकीने बेछूट गोळीबार केला.
या हल्ल्यातून सुंदर भाटी वाचला, मात्र इतर 3 जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी 2012 मध्ये अनिल दुजानाला पकडलं आणि त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
यानंतर दुश्मनीचं हे प्रकरण सुरूच राहिलं. 2014 साली सुंदर भाटीने आपल्यावरील हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून अनिल दुजानाच्या भावाची हत्या केली.
21 वर्षांपूर्वी पहिला गुन्हा दाखल
2002 मध्ये गाझियाबादच्या कविनगर येथे हरबीर पहलवान याची हत्या झाली होती.
या प्रकरणातूनच अनिल दुजानाच्या गुन्ह्यांची कहाणी सुरू होते.
ही पहिली घटना होती, ज्यामध्ये दुजानाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे दुजानावर दाखल हत्येच्या गुन्ह्यांची संख्या वाढत गेली.
ताज्या माहितीनुसार, अनिल दुजानावर सध्या हत्येचे 18 गुन्हे दाखल आहेत.
कोर्टात साखरपुडा, जामिनावर लग्न
दुजाना तुरुंगात गेला तरी इतर गँगसोबत मिळून त्याचं काम सुरुच होतं. दुजानाने आपल्या गँगमध्ये सातत्याने नव्या गुंडांना जोडणं सुरू ठेवलं होतं.
हळूहळू अनिल दुजानाच्या नावाची दहशत पश्चिम उत्तरप्रदेशात सर्वदूर पसरली.
दुजानाने तुरुंगातूनच 2015 साली जिल्हा परिषद सदस्यपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याने विजयही मिळवला. मात्र, नंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली.
अनिल दुजानाच्या लग्नाचा किस्साही अतिशय नाट्यमय असा आहे. या लग्नाला काहीजण ‘नाईलाज’ असंही संबोधतात.
झालं असं की बागपतचे रहिवासी असलेल्या लीलू यांचा राजकुमारसोबत 40 बिघा जमिनीवरून एक वाद होता.
राजकुमारने लीलू यांच्याशी लढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या दोन मुलींचं लग्न कुप्रसिद्ध गुन्हेगार हरेंद्र खडखडा आणि त्यांच्या भावाशी करून दिलं होतं.
त्यामुळे त्यांच्यासमोर लीलू कमकुवत पडला होता. यामुळेच लीलूनेसुद्धा आपली मुलगी पूजा हिचं लग्न हरेंद्र याच्यापेक्षाही मोठ्या गुन्हेगारासोबत करून द्यायचं ठरवलं.
यावेळी लीलूची नजर सुनिल राठी याच्यावर हल्ला करणारा गँगस्टर अनिल दुजाना याच्यावर गेली. त्याने आपली मुलगी पूजाचं लग्न अनिल दुजानाशी करून देण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी अनिल दुजाना तुरुंगात होता. त्यामुळे हे लग्न कसं होईल, हा प्रश्न होता.
यानंतर एका खटल्याच्या सुनावणीसाठी 16 फेब्रुवारी 2019 रोजी अनिल दुजाना हा ग्रेटर नोएडातील सुरजपूर कोर्टात येणार होता.
ही संधी साधून लीलू यांनी कोर्टातच पूजाचा साखरपुडा अनिल दुजानासोबत करून दिला.
यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये अनिल दुजाना जामिनावर बाहेर आला. त्यावेळी पूजाचं लग्न त्याच्याशी लावून देण्यात आलं.
नोएडा आणि आजूबाजूच्या बातम्यांचं वार्तांकन करणारे पत्रकार सुजित राठी यांनी याबाबत बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की अनिल दुजानाची पत्नी त्याला भेटण्यासाठी तुरुंगात जात असायची. दोघांना एक मुलगीही आहे.
सुंदर डाकूच्या गावचा अनिल
बादलपूर येथील दुजाना गाव हे गँगस्टर अनिल दुजानामुळे चर्चेत आलं आहे. पण अनेक वर्षांपूर्वीही या गावातून एका डाकूचं नाव चर्चेत आलं होतं.
1970-80 च्या दशकात सुंदर नागर उर्फ सुंदर डाकूचा तो काळ होता. क्राईम तक वेबसाईटच्या माहितीनुसार, सुंदर डाकूने त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
अखेर सुंदर डाकूला एका चकमकीत पोलिसांनी ठार केलं. नागरशी संबंध वाटू नये म्हणू अनिलने नागर हे नाव बदलून दुजाना केलं.
अनिल दुजाना हा जमिनीवर कब्जा करणं, कब्जा सोडवणं, लूटमार, खंडणी आदी गुन्ह्यांमध्ये पारंगत बनला होता.
त्याच्यावर नोएडा पोलिसांनी 50 हजार तर बुलंदशहर पोलिसांनी 25 हजारांचं बक्षीस घोषित केलं होतं.
माध्यमांमधील बातम्यांनुसार, गेल्या आठवड्यात तुरुंगातून बाहेर येताच अनिल दुजानाने आपल्याविरुद्ध साक्ष देणाऱ्या लोकांना धमकावणं सुरू केलं होतं. STF ने त्याचा शोध सुरू केला, पण अखेर गुरुवारी एका चकमकीत त्याचं एनकाऊंटर केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)