276 महिलांना 'जटामुक्त' करणाऱ्या नंदिनी जाधव, ब्युटी पार्लरचा व्यवसाय सोडून समाजकार्य

    • Author, प्राजक्ता धुळप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 20 ऑगस्टला दहा वर्षं पूर्ण होत आहेत. विवेकवादी विचारवंत आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक असलेल्या डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर अंधश्रद्धेविरोधातला लढा बोथट होईल असं काहींना वाटलं होतं, पण प्रत्यक्षात उलटच झालं.

हत्येनंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी समाज प्रबोधनाची परंपरा सुरूच ठेवली.

2013 मध्ये पुण्यात राहणाऱ्या नंदिनी जाधव यांनी नुकतीच अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामाला सुरूवात केली होती.

'आमचा लढा देवावरच्या श्रद्धेविरोधात नाही तर देवाच्या नावाखाली शोषण करणाऱ्या प्रथांच्या विरोधात आहे' असं सांगत हे कार्यकर्ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले. त्यांच्यापैकीच एक होत्या पुण्यातल्या नंदिनी जाधव.

दाभोलकरांच्या हत्येनंतर नंदिनी यांनी तेजीत चाललेला आपला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सोडून दिला. आणि जात पंचायत, अघोरी प्रथा यांच्याविरोधात अंनिसच्या कामात हातभार लावला. "मी स्त्रियांचं बाह्यसौंदर्य वाढवण्यासाठी काम करत होते. त्यापेक्षा स्त्रियांचं आंतरिक सौंदर्य वाढवणं गरजेचं आहे." या विचारापर्यंत पोहचत त्यांनी या कामात पूर्णवेळ झोकून दिलं.

नंदिनी जाधव या व्हॉलिबॉल आणि शूटिंग बॉलच्या खेळाडू आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

नंदिनी यांच्या कामाला वाखाणलं जातं ते जटा निर्मुलनाच्या कामासाठी. त्यांनी गेल्या दहा वर्षांत 276 महिलांना त्यांनी जटामुक्त केलंय. त्यासाठी त्या महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यांमध्ये फिरल्या आहेत. त्या सांगतात, “एखाद्या महिलेला जटा काढायची आहे असं कळल्यावर मी घरातून तास-दीड तासात निघते. महिलेचा विचार बदलायच्या आधी तिच्यापर्यंत पोहचायचं असतं.”

जटेच्या प्रथेमागची मानसिकता

जट म्हणजे केसाचा घट्ट झालेला गुंता.

भारतात केसामध्ये जट आली की तिला देवीला सोडण्याची देवदासी ही अमानुष प्रथा होती. आजही जट असेल तर देवीचा अंश समजून ती जपून ठेवली जाते, मुलीला वा महिलेला केस कापू दिले जात नाहीत.

देवदासी प्रथेविरोधात काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी जटा निर्मुलनाच्या कामात आतापर्यंत भरीव योगदान दिलेलं आहे. अनिष्ठ प्रथांपासून महिलांचं संरक्षण करणारे जे कायदे आहेत त्यात प्रामुख्याने देवदासी प्रथा प्रतिबंधक आणि निर्मुलन कायदा, जादुटोणाविरोधी कायदा, सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा यासह महिलांची छळवणूक वा हिंसेविषयक कायदे यांचा समावेश होतो.

पण कायदा असूनही जटेशी जोडलेल्या अंधश्रद्धेची पाळमुळं अजूनही घट्ट आहेत, हे गेल्या दहा वर्षांच्या घटनांमधून समोर येतं.

एखाद्या मुलीच्या वा महिलेच्या केसात जट असेल तर थेट तिच्या घरातले लोक संपर्क करत नाहीत, नंदिनी सांगतात. शेजारी, नातेवाईक वा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी त्यांना नाव न सांगण्याच्या अटीवर फोनवरून माहिती देतात.

जटेमुळे शाळेतून काढलं

अगदी 7 वर्षांच्या मुलीपासून 60 वर्षांच्या महिलेपर्यंतच्या केसेस नंदिनी यांनी हाताळल्या आहेत. राजगडजवळील एका शाळकरी मुलीची त्यांनी जटेतून अशीच मुक्तता केली.

“अकरा वर्षांच्या मुलीच्या केसात तीन वर्षांपासून जट होती. वडिलांचं आधीच निधन झालं होतं. तिला आईने शाळेतून काढून टाकलं होतं. तिची आई म्हणायची की पाळी झालेल्या मुलीने स्पर्श केला की हिला ताप येतो. कारण हिच्याकडे देवीची जट आहे. खरंतर तिला ताप यायचं कारण वेगळं होतं. तिच्या डोक्यात जटेमुळे जखमा झाल्या होत्या. त्या जखमा चिघळून पू झाल्याने तिला ताप येत होता. एरव्ही जटेमुळे तिच्याशी मुलं बोलायची नाहीत की खेळायची नाहीत. मानसिक रुग्ण होण्याच्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला होता. तिच्या संवेदना कमी झाल्या होत्या.”

त्या मुलीचं देवीसोबत लग्न लावण्यात येणार होतं. त्याच दरम्यान गावातल्या दुसऱ्या एका शाळकरी मुलीने नंदिनी यांना आपली ओळख लपवण्याच्या अटीवर माहिती दिली. पण नंदिनी अंनिसच्या कार्यकर्त्यांसह त्या गावात पोहचल्या तेव्हा गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला.

‘ही जट काढली तर गावावर संकट येऊ शकतं’ अशी गावकऱ्यांची अंधश्रद्धा होती. त्या गावकऱ्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि त्यांना कायद्यांचा धाकही दाखवावा लागला. त्यानंतर तिची आईही नमली. आणि गावाच्या वेशीबाहेर तिची जटमुक्ती सुरू झाली.

“जेव्हा मी जट कापली तेव्हा 3 वर्षांपासून न रडलेली ती मुलगी जोरजोरात रडायला लागली. आई म्हणत होती- देवी जागृत झाली म्हणून ती रडतेय. तेव्हा मी तिच्या आईला जवळ बोलवून दाखवलं. जटेच्या खाली एक पापुद्रा तयार झाला होता. त्या पापुद्राला कात्रीचं टोक लागलं होतं. त्या पापुद्राच्या खाली उवा, जखमा, किडे झालले होते. वारुळासारखी गत झाली होती. याचा त्रास झाल्यानेच ती मोठमोठ्याने रडतेय हे आईलाही कळलं.”

‘जट काढली तर पुरूषाचा मृत्यू’

जट काढली तर तिच्या भावाचा मृत्यू होईल, अशी धारणा आईची होती. पण जट कापल्यानंतर तिची ही धारणा बदलली.

जटामुक्त झालेली मुलगी आज अकरावीत शिकतेय आणि आनंदी आयुष्य जगतेय याचं नंदिनी यांना समाधान वाटतंय.

केवळ ग्रामीण भागातच हे घडतं असं नाही. शहरी आणि सुशिक्षित समाजातही या घटना दिसतात. नंदिनी यांनी आयटी इंजिनिअर, वकील, बीएस्सी शिक्षण असलेली तरूणीच्या डोक्यातली जटही कापलेली आहे. त्या सांगतात- “बँकेत मॅनेजर पदावर असणारे एक जण आपल्या पत्नीच्या केसातली जट काढायला घाबरत होते. त्यांना आपला मृत्यू होईल अशी भीती वाटत होती.”

“अशा धारणेमागे पुरुषसत्ताक विचार असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. घरातल्या पुरूषाला मृत्यू वा त्यांच्यावरचं संकट दिसत असतं. पण त्या पुरूषाला पत्नीच्या वेदना दिसत नाहीत. त्याची जाणीव आम्हाला करून द्यावी लागते. एका जटेमागे आम्हाला पन्नास लोकांचं समुपदेशन करावं लागतं. कारण त्या महिलेला सतत सांगितलं गेलेलं असतं की तुला देवीने लाखांतून एक निवडलं आहे. हेच लोक जट कापल्यानंतर भीती घालतात. पण कायद्याचा धाक दाखवल्यानंतर आधार देणारे लोकही आम्ही पाहतो.”

जट 7-8 किलो वजनाची

जट आलेल्या महिलांच्या केसेस हाताळल्यानंतर केसाचा गुंता कसा घट्ट होत जातो, याची माहिती नंदिनी देतात. केसांची स्वच्छता ठेवली नाही किंवा आजारपणात केस विंचरले नाही तर गुंता होऊन पहिल्यांदा एक छोटीशी जट तयार होते. पण अंधश्रद्धेमुळे तिला उग्र रूप धारण होतं. तिच्यात धुळीमुळे जंतूसंसर्ग होऊ लागतो. कारण देवीला पुजण्यासाठी त्या जटेत हळदी, कुंकू, दही, तेल टाकलं जातं. मग पुढे जाऊन त्यात जखमाही होतात. प्रचंड दुर्गंधी येते.

“मी पहिली जट काढली तेव्हा आठ दिवस मला जेवताना त्रास होत होता. तो वास माझ्या नाकातून जात नव्हता.”

“वयाच्या सहा महिन्यांपासून सत्तरीपर्यंत महिलांना जट राखलेली दिसून येते. आणि अशा जटेचं वजन 8 किलोपर्यंत असू शकतं.”

जट घेऊन वावरणाऱ्या महिलेला मानसिक त्रासासोबत शारिरक त्रासही सहन करावा लागतो. सात-आठ किलोचं वजन वागवल्याने मान, पाठ, मणका, डोळ्याचे आजार होतात. वजनामुळे शिराही ताणल्या जातात. पण हा सगळा त्रास त्या भीतीपोटी सहन करतात.

महिलांना होणाऱ्या मानसिक त्रासामुळे दैवी शक्ती असल्याचा भ्रम तयार होतो आणि अंगात येण्यासारख्या आजाराला त्या बळी पडतात, नंदिनी अशी उदाहरणं सांगतात.

‘अपमान म्हणजे फुलांचा वर्षाव’

जट निर्मुलनाच्या कामात नंदिनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकांचं कधी-कधी वर्षभरही समुपदेशन करावं लागतं. तर कधी त्यांना होणारा विरोध खूप तीव्र असतो, तरीही त्या मागे हटत नाहीत. शिवीगाळ, मारहाणीसाठी अंगावर धावून येणं, हाताला धरून घरातून बाहेर काढणं, फोनवरून धमकावणं हे त्यांच्यासाठी सवयीचं झालंय.

त्या म्हणतात- “अपमान म्हणजे आमच्यासाठी फुलांचा वर्षाव असल्यासारखं आहे. आम्ही समुपदेशन सुरूच ठेवतो. लोकांच्या श्रद्धेला आम्ही कोणताही तडा जाऊ देत नाही. पण श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला आमचा विरोध आहे.”

अंधश्रद्धेविरोधातलं काम हसत-खेळत करण्याचं श्रेय त्या डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या संयमी आणि संवादी वृत्तीला तसंच विवेकवादाला देतात.

“डॉक्टर नेहमी म्हणायचे ही लढाई दशकांची नाही तर शतकांची आहे. 21व्या शतकात जग बदललंय पण तरीही अंधश्रद्धा आहेत, आणि त्याविरोधात काम करत राहावं लागणार आहे.”

अशा अंधश्रद्धेतून लोकांना मुक्त करणं हेच दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना आमचं उत्तर आहे असं त्या आवर्जून सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)