महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणी दूर झाल्यात का?

भाजपा आणि नरेंद्र मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल- एकनाथ शिंदे
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा विजय झाल्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय अद्यापही प्रलंबितच ठेवण्यात आला आहे.

मात्र, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडल्यानंतर कदाचित पुढील मुख्यमंत्री हा भाजपचाच असू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आतापर्यंत तरी असंच म्हटलं जात होतं की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले आहेत. मात्र, त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर चित्र स्पष्ट झालं असून आता मुख्यमंत्रिपदाबाबच्या निर्णयाचा चेंडू भाजपच्या कोर्टात टाकण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की, त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत लालसा नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप पक्ष जो निर्णय घेईल, तो त्यांना मंजूर असेल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र नवे मुख्यमंत्री पदावर येईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

27 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांची ठाण्यात पत्रकार परिषद झाली.

यावेळेस बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी मोदींना काल फोन केला. सरकार बनवताना निर्णय घेताना कुठलं काही अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे हे कधीही मनात आणू नका. तुम्ही अडिच वर्षं संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी अंतिम असतो तसा तो आमच्यासाठी अंतिम आहे. एकनाथ शिंदे अडचण नाही. शहांनाही फोन केला.”

उद्या दिल्लीत अमित शहांसोबत बैठक होणार आहे. तेथे वरिष्ठ निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“ही लँडस्लाईड व्हिक्टरी आहे. असा विजय यापूर्वी कधीही झालेला नाही. महायुतीने केलेलं काम, महायुतीवर दाखवलेला विश्वास. मविआने थांबवलेली कामं आम्ही सुरू केली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचंड काम केलं.

मी पहाटेपर्यंत काम करायचो. दोन तीन तास झोप घ्यायचो. परत सभेला जायचो. 80-90 सभा घेतल्या. प्रवास खूप केला. पायाला भिंगरी लावून काम केलं. कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री स्वतः समजलो नाही. काॅमन मॅन म्हणून काम केलं. अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला त्यांनी दिली. मी त्यांना धन्यवाद देतो”

“अडीच वर्षाच्या कारकीर्दीत मी समाधानी आहे. आम्ही घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आतापर्यंतच्या सरकारमध्ये एवढे निर्णय कोणीच घेतले नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “या निवडणुकीत मतांचा वर्षाव हा केवळ आणि केवळ आम्ही जे काम केलं, निर्णय घेतले आणि सकारात्मकता दाखवली यामुळे झालं. मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झालो ही ओळख निर्माण झाली. ही ओळख मला पदांपेक्षा मोठी वाटते. आम्ही नाराज होऊन रडणारे लोक नाही. काम करणारे लोक आहोत.”

भाजपा आणि नरेंद्र मोदींचा निर्णय आम्हाला मान्य असेल- एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही? अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

निकालातील जागांचा विचार करता महायुतीला या निवडणुकीत 230 जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 46 जागांवर समाधान मानावं लागलंय.

महायुतीच्या 230 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे.

महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत.

कोण असेल भाजपचा चेहरा?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 132 जागा मिळाल्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असणार, असे अंदाज वर्तवले जात होते. कारण, भाजपच्या जागा सर्वाधिक आहेत. शिवाय, सत्तेतील बहुमतासाठी एकटी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सोबतीला आहे.

23 नोव्हेंबर म्हणजेच निकालाच्या दिवशी भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं होतं की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढील मुख्यमंत्री व्हायला हवं.

जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, त्यांचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, या मुद्द्यावर ते अधिक जोर देताना दिसले.

यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, "असं काहीही ठरवलेलं नाही की, ज्याच्या जास्त जागा असतील, त्यांचाच मुख्यमंत्री असेल. अंतिम आकडे प्राप्त झाल्यानंतर महायुतीतील सगळे पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदासाठीचं नाव निश्चित करतील."

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील एकनाथ शिंदे यांच्याच म्हणण्याला दुजोरा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत कोणताही वाद होणार नाही. तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेतील.

निवडणुकीचे निकाल आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं, अशी मागणी शिवसैनिकांकडून गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. मात्र, आता या मागणीसाठीचा आवाज थोडा खालावला आहे.

त्यामुळेच, आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं जात आहे. देवेंद्र फडणवीस याआधी 2014 ते 2019 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

मात्र, भाजपसाठी मुख्यमंत्रिपदाची वाट मोकळी झाली आहे का, या प्रश्नावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटलं की, शिंदे यांची पत्रकार परिषद झाली असली तरीही भाजपचा मार्ग अद्याप पूर्णपणे सोपा झालेला नाही.

ते म्हणाले की, "वरकरणी पाहता असं वाटेल की, भाजपसाठी रस्ता मोकळा झाला आहे मात्र त्यामध्ये एक आव्हानही आहे. शिंदे यांच्यामुळे जो मराठा समाज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून त्यांच्यामागे आला होता, त्यांच्यामध्ये नाराजी पसरेल. कारण निवडणुकीत चेहरा तर एकनाथ शिंदेंचाच होता. कदाचित विरोधकही या मुद्द्यावरुन टीका करु शकतात. भाजपचा प्रादेशिक पक्षांसोबतचा इतिहास फारसा चांगला राहिलेला नाहीये. याचा परिणाम पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होऊ शकतो."

मात्र, राजकीय पत्रकार विनया देशपांडे याहून वेगळा मुद्दा मांडतात.

त्या म्हणतात की, "भाजपसाठी आता रस्ता फारच सोपा झाला आहे. महायुतीकडून आता भाजपचाच मुख्यमंत्री करण्यात येईल. आता कोणत्या फॉर्म्यूल्याने राज्यात पुढे जायचं आहे, ते मोदी आणि शहाच निश्चित करतील."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)