नखांमधील 'हे' बदल असू शकतात हृदयासह 'या' 5 गंभीर आजारांचे संकेत

    • Author, उपासना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हातांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नखांना 'डेड सेल' म्हटलं जातं. 'डेड सेल' म्हणजे जीव नसणाऱ्या पेशी. मात्र, जरी या नखांमध्ये जीव नसला, तरी तुमच्या-आमच्या आरोग्याबद्दल नखं बरंच काही सांगू शकतात.

'क्लिनिकल डर्मटोलॉजी रिव्ह्यू'च्या एका संशोधन अहवालानुसार, नखांवरून एखाद्याच्या शरीरातील हृदय आणि किडनीसह अनेक अवयवांशी संबंधित आजारांचा अंदाज बांधता येतो.

या अभ्यासात कर्नाटक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील 272 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. वेगवेगळ्या आजारांच्या रुग्णांच्या नखांमध्ये झालेले बदल पाहिले गेले.

या संशोधनात समाविष्ट रुग्णांपैकी 26 टक्के रुग्णांना श्वसनाशी संबंधित समस्या होत्या.

21 टक्के रुग्णांना रक्ताचे, 17 टक्क्यांना लिव्हर आणि जठरोगविषयक मार्ग (GIT) चे आजार होते, तर 12 टक्क्यांना हृदय आणि किडनीशी संबंधित समस्या होत्या.

म्हणजे, या संशोधनात दिसून आलं की, श्वसनसंस्थेच्या समस्या वाढल्या की नखांवर सर्वाधिक परिणाम दिसतो. त्याचप्रमाणे रक्त, यकृत, गॅस्ट्रो, हृदय किंवा किडनीशी संबंधित आजार झाले तरी नखांमध्ये बदल दिसून येतात.

एकूणच, जर नखांमध्ये काही नवीन बदल दिसू लागले, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता पाहूया नखांमधील कोणते बदल धोक्याचा इशारा देतात.

नखांमध्ये दिसणारे बदल

हात-पायांच्या नखांमुळे त्याखालील त्वचेला इजा होत नाही. शिवाय, नखं शरीराला खाजवणं किंवा काही वस्तू सोलणं यातही मदत करतात.

पण क्लिनिकल डर्मटोलॉजी रिव्ह्यूच्या संशोधनात नखांचा रंग आणि त्यांचा बदलता आकार हे अनेक आजारांशी जोडले गेले आहेत.

या संशोधनात प्रामुख्याने नखांमध्ये सूज (Clubbing), लांब रेषा (Longitudinal Ridging), नखं पिवळी होणं, रंग उडणं, नखं सपाट होणं असे अनेक लक्षणे नोंदली गेली. अनेकदा नखांमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त लक्षणेही दिसू शकतात.

हृदयाचे आजार आणि नखांमध्ये बदल

या संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये म्हटलंय की, हृदयाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांमध्ये क्लबिंग (नखं वाकडं होऊन खाली झुकणं) आणि नखांवर लांब रेषा दिसणं ही लक्षणं दिसली.

मेट्रो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. समीर गुप्ता सांगतात, "सामान्यपणे नखं किंचित गुलाबीसर असतात. त्यांचा रंग फिका दिसला तर ते रक्ताच्या कमतरतेचं लक्षण असतं.

जर नखं निळसर झाली तर ते सायनोसिस नावाच्या आजाराचं लक्षण असू शकतं. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजन कमी आहे आणि ही समस्या हृदय किंवा फुफ्फुसांच्या आजारामुळे होऊ शकते. हा आजार नेमका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मग विशेष चाचणी केली जाते."

सायनोसिस झाल्यानं म्हणजे नखं निळी झाल्यास हायपॉक्सिया (Hypoxia), दमा, पल्मोनरी हायपरटेन्शन (Pulmonary Hypertension) यांसारख्या आजारांची शक्यता वाढते.

फुफ्फुसांचे आजार

श्वसनसंस्थेच्या आजारांशी संबंधित रुग्णांमध्ये क्लबिंग (Clubbing) सर्वाधिक दिसलेलं लक्षण होतं.

त्यानंतर नखांवरील लांब रेषा, नखं तुटणं, रंग उडणं असे बदलही दिसले आहेत. म्हणजेच, कुणाच्या नखांमध्ये ही लक्षणं दिसली, तर त्यांनी तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

ग्रेटर नोएडाच्या गर्व्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (GIIMS) मध्ये मेडिसिन डिपार्टमेंटच्या प्रमुख असलेल्या डॉ. रश्मी उपाध्याय सांगतात की, "फुफ्फुसांच्या आजारांवेळी शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळी लक्षणं दिसतात.

त्वचेचा रंग फिका होतो, त्वचा पातळ आणि चमकदार होते. नखांमध्येही काही बदल दिसू लागतात, ज्यावरून आम्ही अंदाज बांधतो की, फुफ्फुसामध्ये काहीतरी समस्या आहे."

नखांशी संबंधित सर्वात पहिलं लक्षण म्हणजे क्लबिंग (Clubbing).

डॉ. उपाध्याय सांगतात की, "अलीकडे लंग फायब्रोसिसची (फुफ्फुसांच्या टिश्यूंवर परिणाम होतो आणि श्वासोच्छ्वासात त्रास होतो) प्रकरणं वाढली आहेत. रक्तात ऑक्सिजन कमी झाल्याने नखांपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या बारीक होतात आणि क्लबिंग दिसू लागतं."

त्याचसोबत, "येलो नेल सिंड्रोममध्ये नखं जाडसर, पिवळसर होतात आणि आजूबाजूला सूज दिसते. हे सिंड्रोम ब्रोंकायटिस (Bronchitis), लंग एब्सेस (Lung Abscess) आणि चायलोथोरॅक्सचे (Chylothorax) संकेत असू शकतात," असंही त्यांनी सांगितलं.

गॅस्ट्रो आणि लिव्हरचे आजार

याचप्रमाणे 'क्लिनिकल डर्मटोलॉजी रिव्ह्यू'च्या संशोधनात गॅस्ट्रिक आणि लिव्हरच्या 46 रुग्णांमध्ये सर्वाधिक पिवळी नखं, लांब रेषा, क्लबिंग आणि टेरीज नेल (नखाखालील भाग पांढरा होणं) ही लक्षणं दिसली. यामध्ये टेरीज नेल (Terry's Nail) हे सर्वात ठळक लक्षण होतं.

डॉ. समीर गुप्ता यांच्या मते, "क्लबिंग म्हणजे नखं वाकडी आणि खाली झुकलेली असतील तर ते जुनाट आजाराचं (क्रॉनिक डिसीज) लक्षण असू शकतं."

किडनीचे आजार

'क्लिनिकल डर्मटोलॉजी रिव्ह्यू'च्या अहवालानुसार, किडनीच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक पिवळी नखं, नखांवरील लांब रेषा (Longitudinal Ridging), हाफ अँड हाफ नेल, ऑब्लिटेरेड लुनुला (नखाच्या तळाशी अर्धचंद्रासारखा भाग गायब होणं) आणि ब्रिटल नेल (सुकलेली आणि भुरभुरीत नखं) ही लक्षणं दिसली.

गाझियाबादच्या यशोदा हॉस्पिटलमधील नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. प्रजीत मुझुमदार सांगतात की, "दीर्घकाळ किडनीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांमध्ये हाफ अँड हाफ नेल (Half and Half Nail) ही सर्वात सामान्य लक्षणं आहेत. यात नखं अर्धी पांढरी आणि अर्धी वेगळ्या रंगाची दिसतात."

हाफ अँड हाफ नेल म्हणजे नखांचा अर्धा भाग वेगळा आणि उर्वरीत भाग वेगळा दिसतो.

कधी कधी जखम झाल्यामुळे किंवा सौंदर्यवर्धनासाठी केलेल्या उपायांमुळेही नखांमध्ये बदल दिसू शकतात. त्यामुळे नखं पाहून लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)