काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू-मोतीबिंदूमध्ये नेमका काय फरक असतो? जाणून घ्या सोप्या भाषेत

    • Author, विजय तावडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आरोग्याविषयी अलीकडच्या काळात बरीचशी जागरुकता निर्माण झाली आहे. मात्र अनेकदा अनेक आजार किंवा आरोग्याच्या समस्यांविषयी गैरसमज किंवा गोंधळ दिसून येतात. काचबिंदू ही डोळ्यांची समस्या त्यातीलच एक आहे.

काचबिंदू कशाला म्हणतात, काचबिंदू का होतो, त्याची लक्षणं कोणती, काचबिंदूचे प्रकार कोणते, त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काचबिंदू आणि मोतीबिंदूमध्ये काय फरक असतो? याबद्दल या लेखात अतिशय सोप्या भाषेत जाणून घेऊया.

काचबिंदू (Glaucoma) म्हणजे काय?

डोळ्याला मेंदूशी जोडणारा मज्जातंतू किंवा ऑप्टिक नर्व्ह जेव्हा खराब होते किंवा त्याला काही अपाय होतो, तेव्हा डोळ्याच्या पुढच्या भागात द्रव पदार्थ साचल्यामुळे डोळ्यातील दाब वाढतो आणि त्यामुळे काचबिंदू होतो.

काचबिंदूचं जर निदान झालं नाही आणि वेळेवर उपचार झाले नाहीत, तर त्यामुळे दृष्टी कमी किंवा अधू होऊ लागते किंवा दृष्टी जाते.

काचबिंदू सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो. मात्र जे लोक त्यांच्या वयाच्या सत्तरीत किंवा ऐशीत आहेत, त्यांच्यामध्ये हा आजार सर्वाधिक आढळतो.

काचबिंदू होण्यामागची कारणं

डोळ्यातील अतिरिक्त द्रव पदार्थ आपोआप डोळ्याबाहेर टाकला जातो किंवा त्याचा निचरा होतो आणि त्यामुळे डोळ्यातील अंतर्गत दाबाचं नियमन होतं.

मात्र हा द्रव बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे डोळ्यातील दाब (intraocular pressure) वाढतो आणि त्यामुळे काचबिंदू होतो.

  • कुटुंबात जर काचबिंदूची पार्श्वभूमी असेल तरीदेखील तो होऊ शकतो.
  • मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांमुळे काचबिंदू होऊ शकतो.
  • डोळ्याला इजा झाली असल्यास किंवा डोळ्यांची शस्त्रक्रिया झाली असल्यावरदेखील काचबिंदू होण्याची शक्यता असते.
  • दीर्घकाळ जर स्टेरॉईडवर आधारित औषधं घेतली तर त्यामुळेसुद्धा काचबिंदू होतो.

डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे?

काचबिंदूसारखी लक्षणं दिसल्यावर डॉक्टरकडे कधी जायला हवं? हा प्रश्न आम्ही मुंबईतील डॉ. अगरवाल रुग्णालयाच्या आदित्य ज्योत आय युनिट विभागात कार्यरत असलेल्या मोतिबिंदू-काचबिंदू आणि लसिक सर्जन डॉ. स्मित बवेरिया यांना विचारला.

जर तुम्हाला हळूहळू दृष्टी अधू होत असल्याचं जाणवत असेल, डोळ्याच्या कडेला किंवा बाजूला दृष्टी अधू किंवा कमी झाल्याचं जाणवत असेल, डोळ्यात अचानक तीव्र वेदना होत असतील, दृष्टी धूसर झाली असेल किंवा अचानक डोकेदुखी होत असेल तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक ठरतं.

तसंच नियमितपणे डोळ्यांची तपासणी करणं योग्य ठरतं. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच डोळ्यातील विकार लक्षात येतात आणि त्यातून पुढील उपचार करणं सोपं होतं, असं डॉ. स्मित बवेरिया म्हणाले.

काचबिंदूची लक्षणं कोणती?

काचबिंदू बऱ्याचवेळा हळूहळू वाढत जातो आणि त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं लक्षात येत नाहीत. मात्र जसजसा काचबिंदू वाढत जातो, त्याची लक्षणं स्पष्टपणे दिसू लागतात. ती अशी असतात,

ओपन अँगल काचबिंदू (Open-angle glaucoma) (सर्वात सामान्य प्रकार): परिघावरील किंवा डोळ्याच्या कडेकडील दृष्टी हळूहळू कमी होत जातात, काचबिंदू वाढल्यानंतर बोगद्यात शिरल्यावर दिसतं त्याप्रमाणे दिसू लागतं, म्हणजे फक्त समोरच्याच गोष्टी दिसतात.

अॅक्युट अँगल-क्लोजर काचबिंदू (Acute angle-closure glaucoma): या प्रकारच्या काचबिंदू तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक असतं. यात दिसणारी लक्षणं म्हणजे,

  • डोळ्यात अचानक तीव्र वेदना होणं
  • धूसर किंवा अंधूक दृष्टी
  • डोकेदुखी
  • मळमळ होणं आणि उलट्या होणं
  • दिव्यांच्या अवतीभोवती चमकदार प्रकाश दिसणं
  • डोळे लाल होणं

सामान्य-ताण असलेला काचबिंदू (Normal-tension glaucoma):

यात डोळ्यांचा दाब सामान्य असूनही दृष्टी कमी किंवा अधू होते आणि काचबिंदू चांगला वाढेपर्यंत कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत

जन्मजात (बालरोग) काचबिंदू (Congenital (Pediatric) glaucoma):

  • धूसर किंवा मोठे डोळे
  • डोळ्याच्या लेन्सच्या पेशी तुटणं
  • प्रकाश गैरसोयीचा वाटणं, प्रकाश सहन न होणं

काचबिंदूचे प्रकार

प्राथमिक ओपन अँगल काचबिंदू (Primary Open-Angle Glaucoma) - हा काचबिंदूचा सर्वात सामान्य प्रकार आहे. तो हळूहळू वाढत जातो.

अॅक्युट अँगल-क्लोजर काचबिंदू (Acute angle-closure glaucoma) - यात डोळ्यातील द्रव पदार्थ अडकतो किंवा त्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे डोळ्यावरील ताण वाढतो. यात अचानक आणि तीव्र स्वरुपाच्या वेदना होतात. त्यामुळे तात्काळ उपचारांची आवश्यकता असते.

सामान्य दाब असलेला काचबिंदू (Normal-Tension Glaucoma) - यात डोळ्यातील दाब अगदी सामान्य असला तरी डोळ्यांचं नुकसान होतं.

जन्मजात काचबिंदू (Congenital Glaucoma) - डोळ्यांचा अनियमित विकास झाल्यामुळे बाळामध्ये या प्रकारचा काचबिंदू जन्मत: असतो.

इतर किंवा बाह्य कारणांमुळे होणारा काचबिंदू (Secondary Glaucoma) - हा काचबिंदू डोळ्यांना इजा झाल्यामुळे, औषधांमुले किंवा इतर बाह्य कारणांमुळे होतो.

डोळ्यात पिंगमेंट विखुरल्यामुळे होणारा काचबिंदू (Pigmentary Glaucoma) – डोळ्यात पिंगमेंट किंवा रंगद्रव्य जमा झाल्यामुळे डोळ्यातून पाणी किंवा द्रव बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो.

काचबिंदूसाठी उपलब्ध असलेले उपचार

काचबिंदूवर उपचार करताना डोळ्यातील अंतर्गत दाब कमी केला जातो आणि दृष्टी गमावणं रोखलं जातं.

कोणत्या प्रकारचा काचबिंदू आहे आणि त्याची तीव्रता किती आहे यानुसार, औषधं (आय ड्रॉप्स), लेझर थेरेपी, लेझर पेरिफेरल आरिडोटोमी, शस्त्रक्रिया, ट्रॅबेक्युलेक्टोमी, ग्लुकोमा ड्रेनेज इम्प्लांट इत्यादी उपचारांचा वापर केला जातो.

काचबिंदू आणि मोतीबिंदूमध्ये काय फरक असतो?

जगभरात डोळ्यांशी संबंधित आढळणाऱ्या दोन मुख्य समस्या म्हणजे काचबिंदू आणि मोतीबिंदू. या दोन्हीमुळे अंधत्व येतं किंवा दृष्टी अधू होते.

वरकरणी हे आजार जरी सारखेच वाटत असले तरी या दोघांमधील मुख्य फरक म्हणजे, जर मोतीबिंदूमुळे दृष्टी अधू झाली असेल तर ती बरी करता येते आणि दृष्टी पूर्ववत होते. मात्र जर काचबिंदू झाल्यामुळे दृष्टी अधू झाली किंवा गमवावी लागली तर ती बरी होत नाही.

मोतीबिंदू हा डोळ्यातील नैसर्गिक स्पष्ट लेन्समध्ये वयोमानामुळे होणाऱ्या बदलामुळे होणारा आजार आहे. तर डोळ्यातील ऑप्टिक नर्व्हचं म्हणजे मज्जातंतूचं डोळ्यातील अंतर्गत उच्च दाबामुळे नुकसान होतं किंवा त्याला हानी पोहोचते आणि त्यामुळे काचबिंदू होतो.

काचबिंदू आणि मोतीबिंदू एकाचवेळी देखील होऊ शकतात. अर्थात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्हीवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची आवश्यकता असते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)