‘आमची कसलीच लायकी नाही, हीच आमची लढाई आहे, सर...’

पप्पू अहिरवार

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI

फोटो कॅप्शन, पप्पू अहिरवार
    • Author, शुरैह नियाझी
    • Role, बीबीसी हिंदी
    • Reporting from, भोपाळ
  • Published

मध्य प्रदेशातील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांंसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आलेले ट्रक चालक पप्पू अहिरवार यांनी म्हटलंय की, ते ट्रक चालकांना येणाऱ्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करत होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप पप्पू अहिरवार यांच्यावर आहेत, बीबीसीशी बोलताना हे आरोप त्यांनी फेटाळून लावले.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 18 सेकंदांचा एक व्हीडिओ व्हायरल झालेला, ज्यामध्ये मध्य प्रदेशातील शाजापूरचे जिल्हाधिकारी किशोर कन्याल ट्रक चालकांशी बोलत असताना त्यांनी एका ड्रायव्हरला विचारलं, "तुझी लायकी काय आहे?"

'हिट अँड रन' प्रकरणांमध्ये शिक्षेच्या नव्या तरतुदींबाबत ट्रक, टॅक्सी चालक आणि बसचालकांच्या संघटनांनी देशभरात संप पुकारला होता.

याचदरम्यान ट्रकचालकांचा एक गट चर्चेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे गेलेला, तिथे चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी संतप्त झाले.

वाद चिघळल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हाधिकार्‍यांना पदावरून बडतर्फ केलं असून ‘अधिकाऱ्यांनी त्यांची भाषा आणि वागणूकीवर लक्ष द्यायला हवं’, असं म्हटलंय.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले जिल्हाधिकारी किशोर कन्याल म्हणाले की, आपण जे काही बोललो ते कुणालाही दुखावण्याच्या उद्देशाने बोललो नव्हतो तर चालकाला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो.

ट्रक चालक पप्पू अहिरवार काय म्हणाले?

पप्पू अहिरवार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, जिल्हाधिकारी बोलत असताना ते कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करत नव्हते, तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर प्रशासनातर्फे यावर काहीतरी तोडगा काढला जाईल या अपेक्षेने आपलं मत मांडत होते.

पप्पू म्हणाले, "मी आधी ते (जिल्हाधिकारी साहेब) जे काही बोलतायत ते समजून घेत होतो आणि आणि नंतर माझं मत मांडत होतो. मी प्रत्येक ट्रक चालकाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल बोलत होतो."

ते असंसुद्धा म्हणाले की, "रस्त्यावर पोलीस किंवा आरटीओ अधिकारी ट्रकचालकांशी ज्या पद्धतीने वागतात, त्याबद्दल मी बोलत होतो. याशिवाय कधी कधी सामान्य लोकंही ट्रकचालकांसोबत गैरवर्तन करतात, तर कधी त्यांच्यावर चोरीचा आरोप करतात."

"मी या गोष्टींबद्दल बोलत होतो आणि सांगत होतो की अशा घटनांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणताही कायदा नाही."

ट्रक

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI

मला आशा आहे की आमची मतं विचारात घेतली जातील आणि प्रशासन यावर तोडगा काढेल, असंही ते म्हणाले.

मात्र यादरम्यान पप्पूच्या बोलण्याने नाराज झालेले जिल्हाधिकारी किशोर कन्याल व्हीडीओमध्ये ‘तुझी लायकी काय आहे?’ असं बोलताना दिसले.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हीडिओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना पप्पू म्हणतात, "आमची कसलीच लायकी नाही, हीच आमची लढाई आहे. आम्ही हात जोडून तुम्हाला विनंती करतोय."

मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ केलं.

त्यावर ते म्हणाले, ट्रकचालक आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील बैठकीत जी भाषा वापरली गेली ती अधिकाऱ्याला शोभणारी नसल्याचं माझ्या निदर्शनास आणून देण्यात आलं.

मोहन यादव

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI

फोटो कॅप्शन, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

"अधिकारी कितीही मोठा असला तरी त्याने गरीबांच्या कामाचा तसेच त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. माणूस म्हणून ही भाषा आपल्या सरकारमध्ये खपवून घेतली जाणार नाही."

ते म्हणाले, "मी स्वत: एका मजूर कुटुंबातील मुलगा आहे. माझ्या मते, आतापासून कोणताही अधिकारी अशी भाषा वापरत असेल, तर त्याला प्रशासनात राहण्याचा अधिकार नाही. मला आशा आहे की ज्या अधिकाऱ्याची या पदावर वर्णी लागेल तो भाषा आणि वागणुकीची काळजी घेईल."

जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांचा खुलासा

पदावरून बडतर्फ होण्यापूर्वी किशोर कन्याल यांनीही याबाबत खुलासा केला.

जिल्हाधिकारी शाजापूर या हँडलवरून पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये ते म्हणाले, "कोणतीही व्यक्ती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार नाही, हे स्पष्ट करणं हा आमचा उद्देश होता. जर तुम्हाला तुमचं आंदोलन शांततेत करायचं असेल तर त्यात कोणतीही अडचण नाही. जर कोणताही ट्रकवाला सामान घेऊन येत असेल तर त्याला कुणीही अडवणार नाही."

कन्याल म्हणाले, "त्याच गोष्टीवरून एक व्यक्ती वारंवार म्हणू लागला की, जर तीन तारखेनंतर आमचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. या गोष्टीवरून मला राग आला. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत अशी परिस्थिती उद्भवू देणार नाही."

जिल्हाधिकार्‍यांवर झालेल्या कारवाईबाबत पप्पू अहिरवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “जे काही केलंय ते सरकारने केलंय, यावर मी काय बोलू.”

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

पप्पू अहिरवार असंसुद्धा म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात देशभरातील ट्रक चालकांनी कामाच्या प्रती दाखवलेल्या निष्ठेबाबत लोक चर्चा करत नाहीत.

ते म्हणाले, "आम्ही अनेक महिने आमच्या कुटुंबापासून लांब राहिलो पण आमचा कुणी साधा उल्लेखही केला नाही. या विचाराने मन दु:खी होतं.”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

पप्पू अहिरवार कोण आहेत?

26 वर्षीय पप्पू अहिरवार हे शाजापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बामोरी गावचे रहिवासी आहेत.

वयाच्या 18 व्या वर्षापासून ते ट्रक चालवत आहेत. ट्रक चालवण्यापूर्वी त्यांनी तीन वर्ष कंडक्टर म्हणून काम केलंय.

पप्पू यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलांव्यतिरिक्त त्यांचे आई-वडिलदेखील आहेत, जे त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत.

ट्रक

फोटो स्रोत, ANI

पप्पू सांगतात की, त्याच्या कुटुंबाकडे थोडी शेतजमीन आहे पण उदर्निर्वाहासाठी ती पुरेशी नाही. सरकारने संवेदनशील वृत्तीने ट्रकचालकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर कायदा केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे.

पप्पू अहिरवार यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. यावर ते म्हणाले, "मला प्रसिद्धीमध्ये काडीमात्रही रस नाही. आमची मतं ऐकली जावीत आणि आमच्या समस्येवर तोडगा निघावा, अशी माझी इच्छा आहे."

सरकारने जरूर कडक कायदे बनवावेत, असं पप्पू यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "जे मद्यपान करून ट्रक चालवतात किंवा कायद्याचे पालन करत नाहीत त्यांच्यासाठी कडक कायदे केले पाहिजेत. परंतु कायद्याचं पालन करणाऱ्यांना विनाकारण त्रास दिला जाऊ नये."

संपूर्ण प्रकरण काय आहे?

नुकत्याच संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्याय संहितेतील 'हिट अँड रन' प्रकरणांमध्ये शिक्षेच्या नवीन तरतुदींविरोधात ट्रक, टॅक्सी आणि बस ऑपरेटर्सच्या संघटनांनी 1 जानेवारीपासून देशभरात तीन दिवसांचा संप पुकारलेला.

संपूर्ण देशभराबरोबरच मध्य प्रदेशसारख्या राज्यातही संपाचा परिणाम दिसून आला.

'हिट अँड रन' प्रकरणात (कलम 106/2) कायद्यानुसार, निष्काळजीपणामुळे अपघात होऊन घटनास्थळावरून पळून जाणाऱ्या वाहनचालकांना दहा वर्षे कारावास आणि 7 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

आतापर्यंत लागू असलेल्या कायद्यानुसार, वाहनांनी चिरडून झालेल्या मृत्यूच्या घटनांमध्ये निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप केला जात होता आणि अशा प्रकरणांमध्ये चालकाला सहज जामीन मिळत होता.

दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची त्यात तरतूद होती.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 3

मात्र सरकारने नवा कायदा खूपच कडक केल्याने ट्रकचालकांसह टॅक्सी आणि बसचालकही रस्त्यावर उतरले.

पकडले गेलो तर लोक बेदम मारहाण करून जीव घेतील, या भीतीने वाहनचालक अपघातस्थळावरून पळून जातात, असं वाहनचालकांचं म्हणणं आहे.

अशा कडक तरतुदींमुळे त्यांना ट्रक चालवणं कठीण होऊन जाईल आणि त्यांच्या रोजगारावर गदा येईल, असं बहुतांश ट्रक चालकांचं मत आहे.

देशभरात विरोध झाल्यानंतर मंगळवारी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस आणि सरकार यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. कायद्याची आता अंमलबजावणी केली जाणार नाही, असं आश्वासन केंद्र सरकारतर्फे देण्यात आल्यानंतर संप मागे घेण्यात आला.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला म्हणाले, "चालकांच्या चिंतेची दखल घेत सरकारने ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसशी चर्चा केली आहे. नवीन कायदे आणि तरतुदी लागू करण्यात आलेल्या नाहीत, हे आम्ही निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेससोबत चर्चा करण्यात येईल."

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)