भाजपची सत्ता अहिंसक 'वॅगनर' मार्गाने उलथवली जाईल- सामनातून टीका

Published

आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या प्रमुथ बातम्यांचा थोडक्यात आढावा असा –

1. भाजपची सत्ता अहिंसक वॅगनर मार्गाने उलथवली जाईल- सामनातून टीका

"पुतिन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रुपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो. पुतीन असो वा मोदी, त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो." सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

यात म्हटलंय, "हिंदुस्तानातली सत्ता ही अहिंसक वॅगनर मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे. पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक वॅगनर ग्रुप एकत्र आला. हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचं."

पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल, पण लोकशाही मार्गाने. पाटण्यातील वॅगनर ग्रुपने तोच इशारा दिला. सामनाच्या अग्रलेखात पाटण्यात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या चमूला वॅगनर गट असं संबोधन देण्यात आलं आहे.

पाटण्यात शुक्रवारी 17 प्रमुख राजकीय पक्षांची बैठक झाली. या बैठकीला पाच विद्यमान मुख्यमंत्री आणि तितकेच माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. भाजपविरुद्ध एकास एक लढत देऊन 2024 सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या भाजपचा पराभव करण्याचे या बैठकीत ठरले. लोकशाहीच्या दृष्टीने ही आनंदवार्ता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटलंय, “पुतिन यांच्याप्रमाणेच मोदी-शहादेखील देशात एकाधिकारशाही आणू पाहत आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्या. आपल्या आजूबाजूला भाडोत्री लोक उभे केले. त्या भाडोत्र्यांना देशातली संपत्ती विकली.”

“आज पुतिन यांच्या देशात काय घडत आहे? हुकूमशहा आपल्या सोयीप्रमाणे देशद्रोहाची व्याख्या करत असतो. भाजपने सत्ता टिकवण्यासाठी अनेक बाजारबुणगे मिंधे रक्षक आपल्याभोवती उभे केले. उद्या हेच लोक सगळ्यात आधी मोदी शहांच्या पाठीत वार करुन रस्त्यावर उतरतील.”

2. दापोलीत भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

दापोली येथे रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. दापोलीसाठी हा रविवार, 25 जून काळदिवस ठरला आहे. या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. अपघातात एकूण 14 जखमी झाले आहेत.

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

सालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने हर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला जोरात धडक दिली. यात मॅजिक प्रवासी रिक्षेतील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने आणि या अपघाताची भीषणता वाढली. या भीषण अपघातात प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार उत्तर प्रदेश) याच्यावर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि ट्रक चालकाला अटकही केली आहे.

3. तुम्ही सहा मुस्लीम देशांवर बॉम्बहल्ले केले-निर्मला सीतारमण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'बराक ओबामांमुळे सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले.' ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हाच अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी (बराक ओबामा) भारतीय मुस्लिमांबद्दल वक्तव्य करणं, हे आश्चर्यकारक आहे.”

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलीकडेच भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चिंता व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असताना ओबामा यांनी हे वक्तव्य केलं होतं.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या, “मी अत्यंत जबाबदारपणे बोलत आहे. आम्हाला अमेरिकेशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण कदाचित त्यांच्यामुळेच (ओबामा) सहा मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बस्फोट झाले होते. तरीही ते भारतातील धार्मिक सहिष्णुतेवर टिप्पण्या करत आहेत.”

“ओबामांच्या कार्यकालात सीरिया ते येमेन आणि सौदी अरेबिया ते इराक अशा देशांवर बॉम्बस्फोट झाले नाहीत का? तेव्हा सात देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या देशांत सुमारे 26 हजार बॉम्ब टाकले होते. असे नेते (बराक ओबामा) जेव्हा भारताच्या धार्मिक सहिष्णुतेवर भाष्य करतात, तेव्हा त्यांना कोण गांभीर्यानं घेणार?”

4. स्वत: ला खोके, मुंबईकरांना धोके- आदित्य ठाकरे

‘‘मुंबईत जिथे कधी पावसाचे पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचूनही मुख्यमंत्र्यांना मुंबईकरांच्या तक्रारी म्हणजे बदनामी वाटत आहे. हे सरकार निर्लज्ज आहे, ’’ अशा शब्दांत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. सकाळमध्ये यासंबंधी वृत्त आलेले आहे.

‘स्वतःला खोके आणि मुंबईकरांना धोके’ हेच सरकारचे ध्येय असल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबईकरांचे पैसे या सरकारने जाहिरातबाजीत घातल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला.

मुंबईतील पावसामुळे शनिवारी काही भागांत पाणी साचून लोकांचे हाल झाले. पाणी साचल्याच्या मुद्यावरून ठाकरे यांनी शिंदे यांना लक्ष केले आणि नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. त्यावर मात्र, पावसाचे स्वागत करा, पाणी तुंबल्याची तक्रार काय करता त्यासाठी वेळ असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला.

मुंबईकरांच्या कामासाठी एक बैठक घेतली असती, तर ही वेळ आली नसती, असा चिमटाही त्यांनी शिंदे यांना काढला.

5. ‘ब्रृजभूषण यांच्याविरोधात न्यायालयात लढाई सुरू राहील’

भारतीय पैलवान विनेश फोगाट, बजरंग पूनिया आणि साक्षी मलिक यांनी स्पष्ट केलंय की कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवरून जी लढाई सुरूये ती आता रस्त्यावर नाही तर कोर्टात लढली जाईल.

ही बातमी 'नवभारत टाईम्स'ने दिली आहे.

तिन्ही पैलवानांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली, ज्यात म्हटलंय की त्यांना आता सरकारने दिलेली वचनं पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे.

त्यांनी लिहिलं, “7 जूनला सरकारसोबत आमची बातचीत झाली होती. यानंतर सरकारने त्यांचं वचन पूर्ण केलं आहे. पोलिसांनी तपास पूर्ण करून कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. या प्रकरणात जोवर न्याय मिळत नाही तोवर पैलवान न्यायाची लढाई आता रस्त्यावर नाही तर कोर्टात लढत राहातील.”

पुढे त्यांनी लिहिलं, “भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालीये आणि 11 जुलैला ही निवडणूक होणार आहे. आम्हाला या संबंधी सरकारने दिलेलं वचन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”

दरम्यान काही काळासाठी सोशल मीडियावरून विश्रांती घेत असल्याचं साक्षी मलिकने जाहीर केलं आहे. बजरंग पुनिया आणि योगेश्वर दत्त यांच्यात शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)