'मी 40 मिनिटं मेलो होतो', थांबलेल्या हृदयाची धडधड परत सुरू झाल्यावर मी 'जगायला' शिकलो

    • Author, अ‍ॅलेक्स टेलर
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मृत्यू म्हणजे सगळं संपलंच. आयुष्याला पूर्णविरामच मिळतो. एकदा मरण आलं की तिथं स्वल्पविराम, अल्पविराम, जर-तर असं काही राहात नाही.

मृत्यूनं आयुष्य थांबतं हे सत्य असलं तरी एका माणसाला मात्र मृत्यूनं नवं आयुष्य मिळालं. त्याचं नाव आहे पॅट्रिक चार्ल्नी.

ते एक यशस्वी वकील होते. एकेकाळी त्यांना शांत काहीही न करता बसणं म्हणजे वेळ घालवणं असं वाटायचं. यश मिळावं यासाठी ते सतत अविश्रांत पळत होते.

कोरोना साथीच्या काळात ते भरपूर तास काम करायचे आणि वरवर फिटही दिसत होते. पण दोन मुलांचा बाप असणाऱ्या पॅट्रिक यांना वयाच्या 39 व्या वर्षी कार्डिॲक ॲरेस्ट आला.

(कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक थांबणे. हृदयाकडून रक्त पंप करणं बंद झाल्यामुळे शरीराला आणि मेंदूला रक्तपुरवठा थांबतो, आणि लगेच उपचार न मिळाल्यास ते जीवघेणं ठरू शकतं. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीत अडथळा आल्यानं हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे. कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे हृदय अचानक थांबून व्यक्ती बेशुद्ध पडणं आणि रक्तपुरवठा पूर्ण थांबणं)

त्या संध्याकाळी पॅट्रिक घरातल्या सोफ्यावर चिप्स आणि सॉसेज खात बसले होते. पण पुढच्या काही काळात अगदी होत्याचं नव्हतं झालं म्हणावं असा गोंधळ झाला.

त्यांना असलेल्या अनुवंशिक कारणांमुळे त्यांचं हृदय अचानक थांबलं. वैद्यकीयदृष्ट्या ते 40 मिनिटं मृत झाले होते. त्यांच्या पत्नीनं त्यांना सीपीआर दिला. (सीपीआर म्हणजे हृदय आणि श्वास थांबल्यावर केलेली छाती दाबून आणि कृत्रिम श्वास देऊन दिली जाणारी तातडीची जीव वाचवणारी प्रक्रिया.)

हे सगळं सुरू असताना त्यांची 9 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा मदत मिळावी यासाठी धडपड करत होते.

पॅरामेडिक्सनं डिफिब्रिलेशनचे प्रयत्न केले पण त्याला यश मिळालं नाही. त्याचा जीव हातातून निसटत असताना, त्यांनी ॲड्रेनलिनचे इंजेक्शन दिले. त्यांनी जणू शेवटचा फासाच टाकून पाहिला.

(डिफिब्रिलेशन म्हणजे हृदयाची धडधड अचानक बिघडल्यावर जसं की हृदय थरथरणं किंवा थांबणं. त्याला विद्युत शॉक देऊन पुन्हा सामान्य गतीने धडधडू लागण्यासाठी केले जाणारे उपचार.)

पॅट्रिक सांगतात, त्यांनी मला शॉकमागून शॉक दिले. मृत्यूच झालाय असं पत्नीला वाटू लागलं. पण अचानक त्यांचं हृदय धडधडू लागलं.

कोमात गेलेले पॅट्रिक आठवड्याभरानं जागे झाले तेव्हा ते एक वेगळाच माणूस म्हणून. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्यानं दृष्टिवर परिणाम झाला होता. स्मृतीवर आणि स्टॅमिनावरही परिणाम झाला होता.

त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांना पूर्वीसारखं काम करता येत नव्हतं. त्यांना वाटलं की, या सगळ्यामुळे त्यांच्या आयुष्यात आणि नातेसंबंधात ते अधिक शरीर-मनानं जगायला लागले आहेत.

"त्या घटनेमुळं जीवनविषयक सगळा दृष्टिकोनच बदलला. पुन्हा संधी मिळाली तरी मागच्या आयुष्यात परत जाणार नाही", असं ते एमा बार्नेट यांच्या रेडी टू टॉक या पॉडकास्टमध्ये म्हणाले.

'मी अंध म्हणून जागा झालो'

सध्या सगळं सुरळीत असलं, तरी हे नवं वास्तव स्वीकारणं फारच धक्कादायक होतं.

या घटनेनंतर पहिल्यांदा चालण्याची आठवण सांगताना ते म्हणतात, "मी अंध म्हणूनच उठलो. मी या गोष्टींचा अनुभव घेत होतो मात्र मला त्यांच्याशी जुळवून घेता येत नव्हतं."

दृष्टीच गेल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम होऊ लागले. त्याला 'चार्ल्स बॉने सिंड्रोम' असं म्हणतात.

यात अचानक नाहिशा झालेल्या दृश्य माहितीची कमतरता भरुन काढण्यासाठी मेंदू स्वतःच कृत्रिम प्रतिमा निर्माण करून दृश्य पटलाची पूर्तता करतो.

"यातले काही भ्रम भीतीदायक होते तर काही चांगले आणि अतिशय विचित्र म्हणावे लागतील असे सुंदर होते."

या भ्रमाचा एक अनुभव सांगायचा झाला तर त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली तेव्हा एका अमेरिकन नर्स आपल्या हत्येचा प्रयत्न करत आहे असं त्यांना वाटू लागलं होतं.

पण या भ्रमांमुळे त्यांना शांतता मिळवण्याचा मार्गही खुला झाला. ते आल्प्समध्ये एका सॅनिटोरियममध्ये राहायला गेले. तिथं त्यांनी हिमाच्छादित शिखरं पाहिली. या अनुभवामुळे त्यांना सुरक्षित वाटू लागलं.

हळूहळू त्यांची दृष्टी परत येऊ लागली तसं त्यांचा हा दृष्टीदोष त्यांच्या मेंदूला झालेल्या दुखापतीशी संबंधित होता हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांच्या दृष्टीवर थोडा परिणाम झालाच. दुर्बिणीतून पाहिल्यावर कसं दिसतं तसं त्यांना दिसत होतं.

सुरुवातीला घेतलेल्या आकलनाच्या चाचण्यांमध्ये त्यांची कामगिरी स्मरणशक्ती आणि माहिती प्रक्रिया वेग या दोन्ही बाबतीत फरक दिसून आला. आता भरपूर सुधारणा झाली असली तरी आताही त्यांना काही माहिती आठवण्यासाठी धडपड करावी लागते.

पण घरी परतल्यावर त्या जखमांचा खरा अर्थ त्यांना उमगला.

'कशातच रस उरला नाही'

या सगळ्यामुळे त्यांना तीव्र थकवा आलेला होता. 'तीव्र थकवा' म्हणजे अशा स्थितीत ऊर्जा जपून वापरावी लागते.

ते सांगतात," मला कधीच सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटत नाही. मी थकलेलाच जागा व्हायचो आणि मग पुढे दिवसभरात तो थकवा वाढत जायचा."

मानसिक पातळीवरही काही बदल झाले. हे बदल स्वीकारणं त्यांना कठीण गेलं. प्राथमिक पुनर्वसनानंतर पॅट्रिक यांना 'कशातच रस उरला नाही' असं वाटू लागलं.

हे नेमकं नैराश्य नव्हतं. पण उदासिनता ही एक वैद्यकीय स्थिती आहे. त्या स्थितीत गेले होते. पॅट्रिक सांगतात, "मी या काळात तरंगत आहे असं वाटायचं."

थेरपी आणि औषधोपचारांनी त्यांनी गमावलेली प्रेरणा मिळवली. त्यांनी गमावलेल्या आयुष्यामुळे झालेलं दुःख कमी करण्यासाठी एका मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांना मदत केली.

अजूनही पूर्वीची स्वयंस्फुर्तीची आठवण येते असं ते सांगतात. आपल्या अपेक्षेनुसार आपल्या वयाच्या माणसांबरोबर समाजात मिसळणं तसंच मुलांबरोबर खेळणं या बाबतीत अजूनही उणिव जाणवते असं ते सांगतात.

त्यांना आपल्या पत्नीबद्दलही वाईट वाटतं. आपली सगळी स्मृती आपण तिच्याकडे 'आऊटसोर्स'च केलीय असं ते सांगतात. ते सांगतात, "ती माझी खऱ्या अर्थानं काळजी घेणारी व्यक्ती आहे".

'मी कृतज्ञ आहे'

अनेक बदल झाले तरी हेच आयुष्य बरंय असं त्यांना वाटतं. त्यांनी करिअरचा मार्गही बदलला. ते आता लेखक आहेत. "आयुष्याचा आनंद घ्यायला आता भरपूर वेळ मिळतोय", असं ते सांगतात.

"आता आयुष्य संथ झालंय. ते माझ्या पसंतीनं नाही तर परिस्थितीमुळंच मला ते स्वीकारावं लागलं. पण मला खरंच याबद्दल आनंद वाटतो. मला पूर्वी जे सौंदर्य दिसायचं त्याहू जास्त सौंंदर्य आता दिसतं. संथ आयुष्यामुळे मला आपलं अस्तित्व अधिक समृद्ध झालंय असं वाटतं", असं ते म्हणतात.

"माझा दृष्टिकोन पूर्ण बदललाय. मी जिवंत आहे याबद्दल मी कृतज्ञ आहे."

कुटुंबाशीही त्यांचे संबंध बदलले आहेत.

आता ते मुक्तपणे हसू लागलेत. पूर्वीपेक्षा खरंच आमच्यातले बंध जास्त घट्ट झालेत असं वाटतंय. या बंधांनी आम्हाला अधिक जवळ आणलंय.

"पूर्वी मला फक्त कुटुंबच महत्त्वाचं वाटायचं पण आता मी स्वतःलाही काही द्यायला शिकलोय. पूर्वी फक्त हे सगळं वरवर होतं असं वाटतं."

या अनुभवामुळे पॅट्रिक यांची रोजच्या धबडग्यातून सुटका झालीय.

"मी फार व्यग्र जीवन जगतो असं लोकांना वाटायचं आणि त्यात कधीच बदल होणार नाही असं लोकांना वाटायचं", असं ते सांगतात.

पॅट्रिक म्हणतात, "काही मर्यादा असल्या तरी मला हे आताचं आयुष्य आवडतंय. मुलं शाळेतून घरी आल्यावर मी तिथं असणं मला आवडतंय. एक झालं की एक असं प्रत्येक गोष्टीमागे न पळणं मला आवडतंय."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.