मुनव्वर फारुकी : 'मुलाला 25 हजारांचं इंजेक्शन द्यायचं होतं, खिशात फक्त 800 रुपये होते'

कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे काय?

फोटो स्रोत, Munawar Faruqui/FACEBOOK

फोटो कॅप्शन, कॉमेडियन मुनव्वर फारुकी
    • Author, सुमंत सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत आपल्या मुलाला कावासाकी नावाचा आजार झाला असल्याचं स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने सांगितलं.

युट्यूबवरच्या 'सोशल मीडिया स्टार विद जेनिस' या पॉडकास्टवर बोलत असताना मुनव्वरने ही माहिती दिली होती.

या आजाराबद्दल डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्याच्याकडे फक्त सातशे-आठशे रूपये असल्याचं मुनव्वरने मुलाखतीत सांगितलं. पण उपाचारासाठी वापरल्या जाणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत 25 हजार रुपये होती.

मुनव्वरने कावासाकी आजाराबद्दल सांगितल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत आणि आजाराबद्दल उलट-सुलट प्रश्नही विचारत आहेत.

कावासाकी आजार आहे काय?

दिल्लीच्या अटल बिहारी वाजपेयी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड आरएमएल हॉस्पिटलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. दिनेश कुमार यांनी बीबीसीला या आजाराबद्दल माहिती दिली.

"कावासाकी हा ज्वरसूचक म्हणजे तापाचा आजार आहे. पण त्याचा त्रास हृदयाला होतो," ते सांगतात.

एक वर्षांपेक्षा लहान किंवा एक ते दोन वर्षांच्या मुलांना बहुतेक करून हा आजार होतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये हा आजार दिसून येतो.

"या आजाराचं कारण माहीत नाही. जपान, चीन आणि कोरियामध्ये हा आजार सुरू झाला आणि हळूहळू जगभरात याचे रुग्ण दिसू लागले," डॉ. दिनेश सांगतात.

भारतात आतापर्यंत किती मुलांना हा आजार झाला याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.

अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशन' या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, कावासाकी आजार मध्यम आणि लहान आकाराच्या धमन्यांना म्हणजे हृदयातल्या रक्तवाहिन्यांना सूज येते.

त्याला म्यूकोक्यूटेनियस लिम्फ नोड सिंड्रोम असंही म्हटलं जातं.

गेल्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असं पुढे आलं आहे की काही खास अनुवंशिक लक्षणं किंवा आजारांमुळेही कावासाकी होण्याची शक्यता वाढते.

कॉमेडियन मुन्नवर फारुकी यांच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे काय?

फोटो स्रोत, Getty Images

सहसा पाच वर्षांच्या मुलांमध्ये हा आजार दिसत असला तरी कोणत्याही वयात तो उद्भवू शकतो. अगदी तरुण वयातही. आजार झाला तर ताप येणं हे मुख्य लक्षणं असतं.

या आजाराबद्दलचा पहिला अहवाल 1967 मध्ये जपानमधले बालरोगतज्ज्ञ तोमिसाकु कावासाकी यांनी प्रकाशित केला होता.

कावासाकी आजाराची लक्षणं

"कावासाकी आजारात मुलांना ताप येतो. तो चार ते पाच दिवस येत राहतो," डॉ. दिनेश कुमार सांगतात.

तापासोबत तोंडात अल्सर येणे, नाकाच्या आतली त्वचा लाल पडणे, ओठ फाटणे, ओठांवर क्रस्ट तयार होणे, हात-पाय सुजणे, त्वचेचे पापुद्रे निघणे, गालावर गाठ येणे, डोळे लाल होणे अशी लक्षणं दिसत असतील तर कावासाकी आजार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

यातली काहीच लक्षणं दिसत असतील तर त्याला 'एटिपिकल कावासाकी' असं म्हटलं जातं.

कॉमेडियन मुन्नवर फारुकी यांच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे काय?

फोटो स्रोत, Getty Images

"अनेक मुलांना इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन (आयव्हीआयजी) इंजेक्शनचा एकच डोस पुरत नाही. पुन्हा एक डोस द्यावा लागतो. अशावेळी त्याला 'रेजिस्टंट कावासाकी' म्हटलं जातं," डॉ. दिनेश सांगतात.

आयव्हीआयजी माणसाच्या रक्तातल्या एका पातळ पदार्थापासून बनवलं जातं. अनेक आजारांशी लढण्याची क्षमता असलेल्या माणसाच्या रक्तातला एक भाग हे सिरम बनवण्यासाठी वेगळा केला जातो.

"या आजारात 20 टक्के रुग्णांमध्ये धमन्यांना सूज आलेली दिसते. त्यामुळे रक्त गोठून रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. ते टाळण्यासाठी आयव्हीआयजी दिलं जातं," डॉ. दिनेश सांगतात.

"या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. किंवा हृदयाच्या त्रासामुळे त्यांच्या चालण्या फिरण्यावर मर्यादा येऊ शकतात," दिनेश सांगतात.

"या 20 टक्के मुलांमुळे कावासाकी आजार असलेल्या सगळ्याच मुलांना आयव्हीआयजी दिलं जातं. कारण हे 20 टक्के रुग्ण शोधण्याची कोणतीही पद्धत अजून आपल्याकडे विकसित झालेली नाही," डॉ. दिनेश सांगतात.

उपचार काय?

"हा आजार फार धोकादायक असतो. अनेकदा डॉक्टर साध्या तापाचेच उपचार सुरू करतात. तापासोबतची लक्षणं दिसली तरी पहिले मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड अशा आजारांची शंका घेतली जाते. ते सगळं खोटं ठरल्यावर चार पाच दिवसांनी आणखी लक्षणं दिसतात तेव्हा कावासाकी आजाराचं निदान केलं जातं," डॉ. दिनेश सांगतात.

या आजाराचे उपचार सोपे असले तरी महागडे आहेत, असं ते म्हणतात. आयव्हीआयजी इंजेक्शन फार महाग असतं. एक ग्रॅम इंजेक्शनला दहा ते पंधरा हजार रुपये मोजावे लागतात.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

"शरीराचं वजन किती त्यानुसार इंजेक्शन दिलं जातं. लहान मुलांचं वजन कमी असतं त्यामुळे तसा खर्च कमी येतो. पण थोड्या मोठ्या मुलांसाठी खर्च वाढतो," डॉ. दिनेश सांगतात.

अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनने दिलेल्या माहितीनुसार कावासाकीचे उपचार करताना धमन्यांवरची सूज कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

आजाराच्या दोन तीन आठवड्यांनंतर कोरोनरी आर्टरी एन्युरिझम म्हणजे धमन्यांची आवाजावी वाढ होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यात धमन्यांचा आकार दीड पट वाढतो.

आजाराची लक्षणं दिसू लागल्यानंतर दहा ते बारा तासांत आयव्हीआयजी आणि ॲस्पिरिनचा तीव्र डोस दिला जातो.

मुनव्वरने काय सांगितलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"माझा मुलगा दीड वर्षांचा होता तेव्हा तीन चार दिवस आजारी पडला. तेव्हा मी मुंबईत विरारला रहात होतो. डॉक्टरांनी औषध देऊनही त्याला बरं वाटलं नाही."

"पाच दिवसांनी त्यांच्या मुलाला रुग्णालयात घेऊन गेले. तपासण्या वगैरे केल्यानंतर कावासाकी आजार असल्याचं नक्की झालं. या आजारात हृदयाजवळ सूज येते.

"त्यानंतर आजाराबद्दल मी गुगलवर सगळं काही वाचलं. हा फार दुर्मिळ आजार आहे. दहा लाख मुलांपैकी एकालाच होतो," मुनव्वरने सांगितलं.

या आजारावर उपचार म्हणून एक औषध इंजेक्शनमधून दिलं जातं असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. अशी तीन इंजेक्शन्स द्यावी लागणार होती. ती देण्यासाठी लागणारं मशीनही त्यांच्याजवळ नव्हतं.

"एक इंजेक्शन 25 हजार रुपयांना होतं. त्यावेळी माझ्या खिशात सातशे आठशे रुपये होते आणि बँक अकाऊंटमध्ये काहीही नव्हतं," मुनव्वरने सांगितले.

"मी हसून साधी प्रतिक्रिया दिली. डॉक्टरांसमोर मला माझी केविलवाणी अवस्था दाखवायची नव्हती. तेव्हा मी आत्ता लगेच 75 हजार आणून देतो असं सहज म्हणालो."

"मी नेहमीप्रमाणे सावकाश पायऱ्या उतरत आलो आणि रुग्णालयाच्या समोर अर्धा तास एकाच जागी उभा राहिलो. या दरम्यान मला काहीही विचार करता येत नव्हता. मी एकदम ब्लँक झालो होतो."

"आयुष्यात मला कधी भीती वाटली असेल तर ती तेव्हाच. इतके पैसे जमावणं शक्य नाही हे मला तेव्हाच कळालं होतं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यांत अवघड काळ होता."

"मी आधी जिथं काम करत होतो त्यांच्याशी बोललो. त्यांना सारं काही सांगितलं. त्यांनी मदतीची तयारी दाखवली. विरारवरून मुंबई सेंट्रलला लोकलने गेलो आणि तीन तासात पैसे आणि इंजेक्शन घेऊन जसा हसत हॉस्पिटलबाहेर पडलेलो तसाच परत आलो."

"पण मी कोणत्या अवस्थेत बाहेर पडलो आणि पैसे घेऊन परत आलो तेव्हा स्वतःची किती लाज वाटत होती ते माझं मलाच माहीत. त्यादिवशी हाच विचार केला की आयुष्यात परत कधीही पैसे कमी पडू देणार नाही," मुनव्वरने पॉडकास्टमध्ये सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.