ड्राय आईस म्हणजे काय? हा पदार्थ खाल्ल्यानंतर गुरुग्राममधील लोकांच्या तोंडातून रक्त का आलं?

dry ice ड्राय आईस बीबीसी मराठी गुरुग्राम गुरगाव

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published

सध्या सोशल मीडियावर दिल्लीजवळच्या गुरूग्राममधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात हॉटेलमध्ये आलेल्या काही जणांना रक्ताच्या उलट्या होत असल्याचं दिसून आलं आहे.

या प्रकरणी एफआयआरची नोंद करण्यात आली असून यात म्हटलंय की, 2 मार्च रोजी गुरुग्राममधील एका खासगी रेस्टॉरंटमध्ये संध्याकाळी सहा जण जेवायला गेले होते.

जेवणानंतर रेस्टॉरंटच्या वेटरने त्यांना माऊथ फ्रेशनरसाठी (मुखवास) विचारणा केली. यातील पाच जणांनी हे माऊथ फ्रेशनर खाल्लं.

माऊथ फ्रेशनरचं सेवन केल्यानंतर पाच जणांच्या तोंडात जळजळ होऊन रक्तस्त्राव सुरू झाला.

एफआयआरमध्ये असं म्हटलंय की, सहाव्या व्यक्तीने माऊथ फ्रेशनर खाल्लं नाही कारण त्यांच्या मांडीवर एक लहान मूल होतं. या लोकांना काय खाऊ घातलं अशी विचारणा या व्यक्तीने केली तेव्हा वेटरने एका पॉलिथिनकडे बोट दाखवलं.

या लोकांनी पॉलिथिनचं पॅकेट आपल्या ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या मदतीसाठी 100 क्रमांकावर फोन केला.

माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती खालावल्याचं पाहून त्यांना गुरुग्राममधील खासगी आर्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील तपासणीसाठी डॉक्टरांना पॉलिथिनमधील माऊथ फ्रेशनर दाखवण्यात आलं.

एफआयआरनुसार, रुग्णालयातील डॉक्टरांनी पॉलिथिनमध्ये असलेली वस्तू ड्राय आईस असल्याचं सांगितलं.

या प्रकरणातील पीडित अंकित यांच्याशी बीबीसीने बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची तब्येत बरी नसल्याचं सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि प्रसारमाध्यमांमध्ये सर्व माहिती उपलब्ध असल्याचं सांगितलं.

याप्रकरणी तपास सुरू असून, मालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय रेस्टॉरंट मधील व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेचे कलम 328, 120 ब अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

या कलमांचे स्पष्टीकरण देताना वकील सोनाली कडवासरा म्हणतात, "आयपीसीचे कलम 328 हे विषप्रयोग आदीसाठी वापरले जाते. तर कलम 120 ब हे कोणत्याही गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे."

त्यांनी सांगितलं की, "गुरुग्रामच्या या प्रकरणात निष्काळजीपणा दिसून येतो. पण त्यांचा हेतू काय होता हे सांगणं कठीण होऊ शकतं. पोलिसांना या प्रकरणाची संबंधित व्यक्तींकडे चौकशी करावी लागणार आहे."

ड्राय आईस म्हणजे काय?

दिल्ली स्थित सीके बिर्ला हॉस्पिटलचे औषध संचालक डॉ. राजीव स्पष्ट करतात की, ड्राय आईस म्हणजेच कोरडा बर्फ हा कार्बन डायऑक्साइडचे घनरूप आहे. त्याचे किमान तापमान -78 अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवले जाते.

हा बर्फ एखादा द्रव पदार्थ गोठवण्यासाठी किंवा थंड करण्यासाठी वापरला जातो. मात्र हा बर्फ सामान्य बर्फासारखा ओला नसतो.

BBC
''भारतीय दंडविधान संहितेचं कलम 328 हे विष किंवा तत्सम पदार्थांनी हानी करण्यासंदर्भातील गुन्ह्यांबद्दल आहे.''
सोनाली कड़वासरा
वकील

डॉ. राजीव गुप्ता सांगतात, "सामान्यत: ड्राय आईस हा वापरासाठी सुरक्षित असतो. परंतु त्याचं तापमान कमी असल्याने तो त्वचेच्या संपर्कात आला तर फ्रॉस्टबाइट किंवा कोल्ड बर्न सारख्या समस्या निर्माण करू शकतो."

भूलतज्ज्ञ डॉ. सचिन मित्तल स्पष्ट करतात की, ड्राय आईस सामान्य बर्फासारखा पांढरा दिसतो. मात्र सामान्य बर्फ हा पाणी (H2O) गोठवून तयार केला जातो. तर ड्राय आईस हा कार्बन डायऑक्साइडचे घनरूप असतो आणि हवेशी संपर्क होऊन यातून धूर बाहेर पडतो.

मॅक्स हॉस्पिटलचे अंतर्गत औषध वैद्यकीय सल्लागार डॉ. आशुतोष शुक्ला सांगतात, "जेव्हा सामान्य बर्फ वितळतो तेव्हा त्याचं पाण्यात रुपांतर होतं. आणि पाण्याला उष्णता दिली की त्याचं वायूत रूपांतर होतं. पण जेव्हा ड्राय आईस वितळतो तेव्हा त्याचं रूपांतर थेट वायूत होतं. जर हा बर्फ जास्त दिवसांसाठी बंद कपाटात किंवा बंद डब्यात ठेवला तर ते हानिकारक ठरू शकतं.

रेस्टॉरंटमध्ये ड्राय आईस घेतल्यावर काय झालं?

डॉक्टर आशुतोष शुक्ला सांगतात की, जेव्हा या पाच जणांनी ड्राय आईसचे तुकडे खाल्ले तेव्हा अतिरिक्त थंडाव्यामुळे त्यांच्या तोंडात अल्सर निर्माण झाला आणि त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला.

डॉक्टर म्हणाले की, हातमोजे घातल्याशिवाय ड्राय आईस हातात घेता येत नाही कारण त्यामुळे त्वचा जळू शकते.

BBC
''ड्राय आईस अतिशय थंड असतो, तो पोटात गेल्यामुळे छिद्र पडू शकतं, हे जीवावर बेतू शकतं''
डॉक्टर सचिन मित्तल
यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

डॉक्टर सचिन मित्तल सांगतात, "ड्राय आईस खूप थंड असतो, त्यामुळे तो पोटात गेल्यावर तिथे छिद्र तयार होतात. जे खूप घातक ठरू शकतं. मात्र, त्यातून तयार झालेला वायू फुफ्फुसात गेल्यास व्यक्ती बेशुद्ध पडू शकतो."

डॉक्टर सचिन मित्तल म्हणतात की, ड्राय आईसमुळे शरीराचं किती नुकसान होतं हे सांगणं कठीण आहे. परंतु जर आपण उदाहरणाद्वारे समजून घेतलं तर एखाद्या मुलाने 30 ग्रॅमचा तुकडा खाल्ला तर त्यातून शरीराला हानी पोहोचू शकते कारण हा बर्फ त्वचेवर जरी फिरवला तरी त्वचा जळते.

ड्राय आईसचा वापर कशासाठी होतो?

डॉ. सचिन मित्तल सांगतात की, आजकाल ड्राय आईसचा ट्रेंड सुरू झाला आहे.

रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी धूर दाखवला जातो. लग्न किंवा समारंभात वधू-वरांच्या प्रवेशाच्या वेळी फॉग तयार केला जातो. हे सगळं ड्राय आईसमुळे शक्य झालं आहे.

परंतु ड्राय आईसचा धूर बंद खोलीत वापरल्यास शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढते. यामुळे लोक बेशुद्ध पडू शकतात.

dry ice ड्राय आईस बीबीसी मराठी गुरुग्राम गुरगाव

फोटो स्रोत, Getty Images

वस्तू दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी देखील ड्राय आईस वापरला जातो.

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ड्राय आईस औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कारण हा चांगला कूलिंग एजंट आहे.

याचा वापर अन्नपदार्थ टिकवून ठेवण्यासाठी देखील होऊ लागलाय. कारण याद्वारे तापमान -30 अंश सेंटीग्रेडपर्यंत खाली नेता येते.

लिक्विड (द्रवरुप) नायट्रोजन आणि ड्राय आईस

2017 साली दिल्लीतील एका व्यक्तीने चुकून बारमध्ये लिक्विड नायट्रोजन असलेल्या पेयाचं सेवन केलं होतं.

खरं तर या व्यक्तीच्या पेयातून धूर निघत होता. हा धूर संपल्यानंतर त्याने हे पेय घेणं अपेक्षित होतं. मात्र या व्यक्तीने धुरासहित या पेयाचं सेवन केलं.

त्यानंतर या व्यक्तीला पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

dry ice ड्राय आईस बीबीसी मराठी गुरुग्राम गुरगाव

फोटो स्रोत, Getty Images

या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली ज्यामध्ये त्याच्या पोटात मोठं छिद्र तयार झाल्याचं आढळलं.

डॉक्टर सांगतात, पेयांमधून किंवा खाद्यपदार्थांमधून निघणारा धूर पाहून लोक त्याकडे आकर्षित होतात. याचा वापर खाद्यपदार्थ थंड करण्यासाठी देखील केला जातो.

dry ice ड्राय आईस बीबीसी मराठी गुरुग्राम गुरगाव

डॉक्टर सचिन मित्तल सांगतात की, नायट्रोजन हा ड्राय आईस इतका धोकादायक नसला तरी तो शरीरात लवकर शोषून घेतला जातो.

सोनाली कडवसरा सांगतात की, ही घटना ग्राहकांना धोकादायक उत्पादनांबद्दल जागरूक करण्याचं महत्त्व दर्शवते.

त्याचबरोबर खाद्यपदार्थ आकर्षक बनवण्यासाठी ड्राय आईस किंवा लिक्विड नायट्रोजनचा वापर केला जातोय. मात्र त्याचा वापर पेय किंवा खाद्यपदार्थांमध्ये केला जाऊ नये असं डॉक्टर सांगतात.