You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे: 'सारखा विरोध झाला तर शिवाजी महाराजांवर कुणीच चित्रपट काढणार नाही'
जर शिवाजी महाराजांवरील प्रत्येक चित्रपटाला विरोध होत राहिला तर लोक शिवाजी महाराजांवर चित्रपट काढणार नाहीत, असं मत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
"कोणीही उठावं आणि इतिहासावर बोलावं असं होऊ नये, जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी कागद तपासावीत. माझं म्हणणं आहे की जो कुणी लेखक जो कुणी चित्रपट तयार करतोय एकदा त्यांच्याशी तुम्ही बोला तर. की तुम्ही जे चित्रपट करता त्यात कसलं संशोधन तुम्ही केलं आहे. हे संदर्भ कुठून घेतले आहेत. मुळात ही पहिली गोष्ट केली पाहिजे की नाही?
"असल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत आणि विरोध करायचा याला काय अर्थ आहे? उद्या लोक म्हणतील शिवाजी महाराजांवरील चित्रपटच करणे नको, इतिहासावरील चित्रपट दाखवायलाच नको. कुणीही उठतंय आणि इतिहासाबद्दल बोलायला लागलं आहे. आपल्याला त्याबद्दल माहिती नसेल तर, आपल्याला गंध नसेल, वाचन नसेल, जे इतिहासतज्ज्ञ बसलेले आहेत, ज्यांनी आपली हयात घालवली, एकदा विचारा त्यांना."
रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "जर चित्रपटावर काही हरकत असेल तर त्या निर्मात्या, लेखकाशी संवाद साधायला हवा आणि त्यांची बाजू समजून घ्यायला हवी," असंही ते म्हणाले.
सध्या ऐतिहासिक चित्रपटांना अनेक स्तरातून विरोध होताना दिसत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रदर्शनाला विरोध केला आहे. याबाबत विचारले असता राज ठाकरेंनी हे उत्तर दिले.
"इतिहास हा मुळात रूक्ष विषय असतो. त्यात थोडंस रंजन करून ते लोकापर्यंत पोहोचवावे लागते. पूर्वीच्या काळी पोवाडे असायचे आता चित्रपट आहेत. जगभर हे असंच चालतं पण अर्थातच त्यामुळे त्या व्यक्तिरेखेला आणि इतिहासाला धक्का लागता कामा नये याची जबाबदारी देखील घ्यायला हवी," असं राज ठाकरे म्हणाले.
तसा चित्रपट तुम्ही तरी पाहिला असता का?
"तानाजी मालुसरे यांची कथा आपण ऐकली असते. घोरपडीने ते वर चढले असं कथा सांगते, आता प्रत्यक्षात इतिहासात घोरपड कशी असेल पण जर तसं पोवाड्यात सांगितलं नाही तर ते कुणी ऐकलं असतं. तानाजी चित्रपटात जे दाखवलं तसंच इतिहासात होतं का, पण जर तसं दाखवलं नसतं तर तुम्ही तर असा चित्रपट पाहिला असता का?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित पत्रकारांना केला.
फक्त त्यामुळे मूळ पात्राच्या प्रतिमेला धक्का लागला कामा नये. जर कुणाचा चित्रपटावर विरोध असेल तर तो विरोध का आहे हे तपासायला हवं, नुसता विरोध म्हणून विरोध करण्याला काय अर्थ आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना स्फूर्ती मिळावी हा उद्देश असला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. सध्या ऐतिहासिक चित्रपटांना अनेक स्तरातून विरोध होताना दिसत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हर हर महादेव चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रदर्शनाला विरोध केला आहे. याबाबत विचारले असता राज ठाकरेंनी हे उत्तर दिले.
निसर्गसंपन्न कोकणात प्रकल्प नको पण...
कोकणात अनेक प्रकल्प येतात. त्यांना विरोध होताना दिसतो त्यावर राज ठाकरे म्हणाले की निसर्गसंपन्न कोकणात औद्योगिक प्रकल्प नसावेत असं मला देखील वाटतं पण महाराष्ट्रातून आता प्रकल्प जात राहिले तर आपल्याला ते परवडणार नाही असं राज ठाकरे म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)