बृजभूषण यांच्याविरोधातील पॉक्सो रद्द करा, दिल्ली पोलिसांची कोर्टात मागणी

ब्रिजभूषण शरण सिंह

फोटो स्रोत, ANI

Published

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरुद्ध महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपासंदर्भात दिल्ली पोलिसांनी गुरुवारी 15 जून रोजी राऊस एव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यावर आता 22 जूनरोजी सुनावणी होणार आहे.

15 जूनपर्यंत बृजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होईल, असं आश्वासन केंद्र सरकारनं कुस्तीपटूंना दिलं होतं. आज 15 जून म्हणजेच शेवटच्या दिवशी सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झालं आहे.

बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक पॉक्सो कायद्यांंतर्गत नोंद करण्यात आली होती. मात्र पॉक्सो प्रकरणात ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी कॅन्सलेशन रिपोर्ट म्हणजेच आरोप रद्द करण्याची मागणी करताना दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांना दिलासा दिला आहे.

सिंह यांच्यावर अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

अल्पवयीन कुस्तीपटूच्या कुटुंबीयांनी त्यांचा खटला मागे घेतला होता, मात्र इतर कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंगच्या अटकेवर ठाम आहेत.

दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं की, कुस्तीपटूंच्या वतीने दाखल केलेल्या एफआयआरची तपासणी केल्यानंतर बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात आयपीसी कलम 354 354 ए, 354 डी, 506 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपांमध्ये किती शिक्षा होते?

कलम 354- महिलांच्या विनयाचा भंग होण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला किंवा बळाचा वापर करणे. यासाठी 1 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

कलम- 354 अ- लैंगिक अत्याचार- तीन वर्षांपर्यंत शिक्षा शक्य

कलम 354 ड- पाठलाग करणे. पहिल्यांदा दोषी आढळल्यावर तीन वर्षांपर्यंत शिक्षेची शक्यता

कलम 506 (1)- धमकी- 2 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद

या सर्व कलमांच्या बाबतीतील गुन्ह्यांत पोलीस संबंधित व्यक्तीला वॉरंटविना अटक करू शकतात पण या सर्व प्रकऱणांत जामीन मिळवण्याचा त्या व्यक्तीला अधिकार आहे.

दिल्ली पोलिसांनी आपल्या अहवालात पॉक्सो तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं.

अशा परिस्थितीत पोलिसांनी बृजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे.

तक्रारदार म्हणजेच पीडितेचे वडील आणि पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

या संदर्भातली पुढची सुनावणी आता 4 जुलैला पटीयाला हाऊस कोर्टात होणार आहे.

बजरंग पुनिया

फोटो स्रोत, ANI

बृजभूषण शरण सिंह या प्रकरणात निर्दोष असल्याचं त्यांचे वकील ए. पी. सिंह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. तसंच त्यांच्या विरोधात राजकीय कट रचला जात असल्याचं सिंग यांचं मत आहे.

सिंग यांनी पुढे सांगितलं की, "दिल्ली पोलिसांना पॉक्सो तक्रारीबाबत कोणताही पुरावा सापडला नसून बृजभूषण यांच्यावरील पॉक्सो अंतर्गत दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याची शिफारस न्यायालयात केली आहे. त्यांच्याविरोधात राजकीय कट रचला जातोय. आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे. सत्य काय आहे ते लवकरच समोर येईल आणि बृजभूषण सिंह निर्दोष सुटतील."

आतापर्यंत काय काय झालं?

  • यावर्षी 18 जानेवारीला महिला कुस्तीपटूंनी पहिल्यांदा याविरोधात आवाज उठवला.
  • विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियासारख्या कुस्तीपटूंनी दिल्लीतल्या जंतर-मंतरवरून आवाज उठवला.
  • त्यांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
  • बृजभूषण सिंह आणि प्रशिक्षक नॅशनल कॅम्पमध्ये महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात, हे सांगतान विनेश फोगाटला अश्रू अनावर झाले होते.
  • बृजभूषण सिंह यांनी कोणत्याही कुस्तीपटूचं शोषण झालं नसल्याचं म्हटलं होतं. जर हे आरोप सिद्ध झाले, तर आपण फासावर जायला तयार आहोत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
  • केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली आणि 23 जानेवारीला आरोपांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय निरीक्षण समिती स्थापन केली.
  • 21 एप्रिल- महिला कुस्तीपटूंनी दिल्लीतील कनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये बृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही.
  • 23 एप्रिल- कुस्तीपटूंनी दुसऱ्यांदा जंतर-मंतरवर धरणं आंदोलन सुरू केलं.
  • 24 एप्रिल- पालम 360 खापचे प्रमुख चौधरी सुरेंद्र सोलंकी या खेळाडूंना समर्थन देण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनी दुसऱ्या खाप पंचायतींकडेही समर्थनासाठी अपील केलं.
  • 25 एप्रिल- विनेश फोगाटसह इतर 6 महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
  • दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केल्या. ज्यांपैकी एक एफआयआर ही पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आली होती.
  • नंतर अल्पवयीन कुस्तीपटूंच्या वडिलांनी बृजभूषण सिंहांविरोधातलं आपलं वक्तव्य मागे घेतलं.
  • तीन कुस्तीपटूंनी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
  • त्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी तिन्ही कुस्तीपटूंची भेट घेतली.
  • आता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे.
साक्षी मलिक

‘या’ कारणामुळे उठवला लैंगिक शोषणाविरोधात आवाज

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ज्या दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये कुस्ती महासंघाच्या प्रशासनात गेल्या 12 वर्षांपासून अध्यक्ष असल्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांचं वाढलेलं प्रभुत्व आणि ताकद यांचा वारंवार उल्लेख आहे.

कुस्तीपटूंच्या मते, लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रस्ताव मान्य न केल्यास त्यांना प्रशासनातील कायद्यांचा वापर करून अनेक पद्धतीने त्रास देण्यात आला. लैंगिक शोषणाविरोधात तातडीने तक्रार न करण्याचं कारणही हेच असल्याचं कुस्तीपटूंचं म्हणणं होतं.

त्यांच्यासोबत हे प्रकार करिअरच्या सुरुवातीलाच घडले होते. त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्याचं धाडस त्यांना एकवटता आलं नाही, असं अनेक तक्रारदारांनी म्हटलं.

गेल्या वर्षी जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्यावेळी समोर आलेल्या माहितीमुळे यावर्षी जानेवारी महिन्यात कुस्तीपटूंनी आवाज उठविण्याचं ठरवलं, असं साक्षीने स्पष्ट केलं.

“2022 मध्ये एक-दोन महिला कुस्तीपटूंनी आम्हाला जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धेच्या दरम्यान घडलेल्या लैंगिक शोषणाच्या काही घटना सांगितल्या. तेव्हा आम्ही सगळेजण एकत्र बसलो आणि काहीतरी करायला हवं, असं आम्हाला वाटलं,” साक्षीने सांगितलं.

तेव्हा विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी गृह मंत्र्यांची भेटही घेतली होती. पण पुढे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, असं साक्षीने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)