इराणमधील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 51 जणांचा मृत्यू, नेमकं काय झालं?

फोटो स्रोत, EPA
- Author, थॉमस मॅकिंटॉश
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
इराणच्या पूर्व भागात असणाऱ्या एका कोळसा खाणीत स्फोट होऊन किमान 51 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी रविवारी या घटनेबाबत माहिती दिली.
दक्षिण खोरासान प्रांतात झालेल्या या स्फोटात किमान 51 लोकांचा मृत्यू झाला तर 20 लोक जखमी झाले आहेत.
कोळसा खाणींच्या दोन ब्लॉक्समध्ये मिथेन वायूची गळती झाल्यामुळे हा स्फोट झाला आहे.
इराणची राजधानी तेहरानपासून ही कोळसा खाण सुमारे 540 किलोमीटर अंतरावर आहे.
स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता) हा स्फोट झाला.
दक्षिण खोरासानचे गव्हर्नर जवाद घेनातजादेह म्हणाले की, "स्फोटाच्या वेळी या ब्लॉक्समध्ये 69 कामगार काम करत होते."
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गव्हर्नर जवाद घेनातजादेह म्हणाले की, "मदानजू खाणीत एक स्फोट झाला आणि दुर्दैवाने या खाणीच्या बी आणि सी ब्लॉकमध्ये 69 लोक काम करत होते. बी ब्लॉकमध्ये 22 लोक काम करत होते, तर सी ब्लॉकमध्ये 47 लोक काम करत होते."
सध्या या खाणीत आणखी किती लोक अजूनही अडकले आहेत किंवा जिवंत आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.
इराणची अधिकृत वृत्तसंस्था असणाऱ्या आयआरएनए (IRNA) ने दिलेल्या माहितीनुसार, "या स्फोटात मृत पावलेल्या लोकांचा संख्या 51 आहे, आणि एकूण 20 लोक जखमी झाले आहेत."


रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला.
पेझेश्कियान म्हणाले की, "मी मंत्र्यांशी बोललो आहे आणि या प्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करू."
सुमारे 30,000 चौरस किलोमीटर (जवळपास 11,600 चौरस मैल) पेक्षा जास्त क्षेत्रावर ही खाण पसरलेली आहे. आणि आयआरएनए (IRNA) नुसार या खाणीत कोकिंग आणि थर्मल कोळशाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे.
आयआरएनएने सांगितलं की, "इराणच्या सगळ्यांत मोठ्या आणि समृद्ध कोळसा क्षेत्रांमध्ये या भागाची गणना होते."
राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वकील अली नेसाई म्हणाले की, "खाणीमध्ये गॅस साठल्याने ही शोध मोहीम कठीण झाली आहे."
नेसाई म्हणाले की, "सध्या जखमींना मदत करणे ही सगळ्यांत मोठी प्राथमिकता आहे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत."
ते म्हणाले की, "या घटनेत दुर्लक्ष केलेल्या आणि दोषी असलेल्या संस्थांवर नंतर कारवाई केली जाईल."

फोटो स्रोत, EPA
गेल्या वर्षी, इराणच्या उत्तरेकडील दामघन शहरातील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात सहा लोकांचा मृत्यू झाला होता, स्थानिक माध्यमांनुसार मिथेन गळतीमुळे हा स्फोट झाला होता.
मे 2021 मध्ये, त्याच ठिकाणी दोन खाण कामगार मरण पावल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली होती. 2017 मध्ये झालेल्या स्फोटात उत्तर इराणमधील आझाद शहर शहरात 43 खाण कामगार ठार झाले होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























