मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि...

Published

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि...

शासकीय कर्मचारी संपावर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावा, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. ते विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलत होते.

लोकसत्ताने ही बातमी झाली आहे.

एकनाथ शिंदे विधिमंडळाच्या सभागृहात सरकारची भूमिका मांडताना म्हणाले, “मध्यवर्ती संघटनेचे जे पदाधिकारी होते, त्यांच्याबरोबर आम्ही काल (14 मार्च) सविस्तर चर्चा केली. शासन म्हणून आपण जो काही राज्य कारभार चालवतो, त्यामध्ये या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाची भूमिका सकारात्मक आहे.

पण हा आर्थिक निर्णय घेतल्यानंतर जे परिणाम होणार आहेत, त्याचाही सारासार विचार होणं आवश्यक आहे. चर्चेदरम्यान कर्मचाऱ्यांकडून काही सूचना आल्या आणि आमच्याकडूनही काही सूचना आल्या. या सूचनांची पडताळणी व्हायला पाहिजे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.”

2. नोकरीच्या त्रासाला कंटाळून अकाऊंटटने गिळले 56 ब्लेड, डॉक्टरही हैराण

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात एका तरुणाने केलेल्या कृत्याने धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा तरुण एका सेठकडे कामाला होता. यादरम्यान या तरुणाने रागाच्या भरात 56 ब्लेड गिळले. कागदाच्या आवरणासह ब्लेड खाताना त्याला सुरुवातीला काहीही त्रास जाणवला नाही.

मात्र, तरी कागद निघाल्यानंतर त्याला त्रासाला सामोरे जावे लागले. वेदना वाढल्यानंतर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर त्याला तातडीने सांचोर येथील मेडिपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

मेडिपल्स हॉस्पिटलचे डॉ. नरसीराम यांनी सांगितले की, सांचोरजवळील एका गावातील हा 26 वर्षीय तरुण आहे. त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या शरीरात कापलेले ब्लेड दिसले.

यानंतर डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सुमारे ३ तास ही शस्त्रक्रिया चालली. या शस्त्रक्रियेत 56 ब्लेड काढण्यात आले आहेत. त्याची प्रकृती आता ठीक असून या तरुणाच्या शरीराला आतून दुखापत झाली आहे.

3. शासनाच्या घोषणेनंतरही महिलांना एसटीच्या तिकिटात सवलत का नाही? वादावादीने कर्मचारी त्रस्त

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.

या घोषणेमुळे सध्या एसटी कर्मचारी त्रस्त असून अनेक ठिकाणी महिला प्रवाशांसोबत वादावादी सुरू असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये एका वाहकाला महिला प्रवाशाच्या नातेवाईकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत एसटी वाहक जखमी झाले असून रक्तबंबाळ झाले आहेत. पोलिसांनी आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

4.भारत जगात आठव्या क्रमाकांचा प्रदूषित देश, दिल्ली जगात चौथ्या क्रमांकावर

2022 मध्ये भारत हा जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात PM 2.5 चं प्रमाण 53.3 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर असल्याचं आढळून आलं आहे.

2022 मध्ये वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 2021 मध्ये भारत पाचव्या क्रमांकाच सर्वांत जास्त प्रदूषित देश होता.

यावर्षीच्या सर्वेक्षणात दिल्ली शहराचं PM2.5 चं प्रमाण 92.6 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर असून ते जगातील चौथ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

5.भोपाळ गॅस दुर्घटनेच्या पीडितांना अतिरिक्त नुकसानभरपाई देण्यास नकार

युनियन कार्बाईड कंपनीने पीडितांना अतिरिक्त नुकसानभरपाई द्यावी ही सरकारची याचिका सुुुप्रीम कोर्टाने काल (14 मार्च) फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती संजय कौल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. एखाद्या घटनेनंतर नुकसानभरपाई हवी असेल तर ती त्या घटनेनंतर मिळवावी, तीस वर्षानंतर नाही असं निर्वाळा घटनापीठाने दिला आहे. तसंच याबाबतीत सरकारने निष्काळजीपणे दाखवला असल्याचं निरीक्षणही घटनापीठाने नोंदवलं.

3 डिसेंबर 1984 ला झालेल्या या घटनेत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

द हिंदूने बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)