ऑटोग्राफ मागायला आला आणि चाकूने विरोधी पक्षनेत्याची मान चिरली

    • Author, केली एनजी
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published

दक्षिण कोरियाचे विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग हे बुसान शहराच्या भेटीवर असताना त्यांच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला.

2022 सालच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभूत झालेल्या मिस्टर ली यांच्या मानेच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर खोल जखम झाल्याचं वैद्यकीय अहवालात म्हटलंय.

एअरलिफ्ट करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांना झालेली जखम जीवघेणी नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

मिस्टर ली यांना ठार मारण्याचा आपला हेतू होता, असं 66 वर्षीय हल्लेखोराने सांगितल्याचं योनहाप वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. हल्ल्यामागचा हेतू स्पष्ट झालेला नाही.

खुलेआमपणे दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेलाय आणि विद्यमान अध्यक्ष यून सुक येओल यांच्यासह राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून हल्ल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आलाय.

कोरियातील डेमोक्रॅटिक पक्षाचं नेतृत्व करणारे मिस्टर ली मंगळवारी सकाळी बुसान बंदरातील एका बांधकाम स्थळाच्या भेटीदरम्यान पत्रकार परिषदेत पत्रकारांसोबत संवाद साधत असताना हा हल्ला झाला.

सही मागण्यासाठी पुढे आलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक चाकूने वार केल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या चाकूची लांबी 18 सेंटीमीटर होती आणि तो हल्लेखोराने ऑनलाइन खरेदी केल्याचं पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हल्लेखोराला लगेचच पकडून ताब्यात घेण्यात आलं.

हल्लेखोरावर खुनाचा प्रयत्न केल्याचे आरोप लावण्याचं फिर्यादींनी ठरवलं असल्याचं योनहापनं म्हटलंय.

सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या हल्ल्याच्या व्हीडिओमध्ये मिस्टर ली सर्वप्रथम गर्दीत आणि नंतर जमिनीवर कोसळताना दिसतायत, तर अनेकजण हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करतायत.

घटनेनंतरच्या छायाचित्रांमध्ये मिस्टर ली डोळे मिटून जमिनीवर पडलेले दिसत असून कुणीतरी त्यांच्या मानेच्या बाजूला रुमाल दाबून धरलाय.

मिस्टर ली यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या गळ्याच्या शिरेला दुखापत झाल्याचा संशय आहे, ज्यातून डोक्यापासून हृदयापर्यंत रक्त वाहून नेलं जातं. अतिरिक्त रक्तस्राव होण्याचा धोका असल्याने मिस्टर ली यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असं प्रवक्ते क्वॉन चिल-संग यांनी सांगितलं.

"सेऊल नॅशनल विद्यापीठाच्या रूग्णालयात हलवल्यानंतर आम्ही ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलंय. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि हे लोकशाही संपवण्याचं कृत्य असल्याचं मानतो," असंही ते म्हणाले.

मिस्टर ली (वय वर्षे 59) सध्या दक्षिण कोरियाच्या विधीमंडळात इंचॉन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. एप्रिलमध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणूक ते लढवण्याची मोठी शक्यता आहे.

2022 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये केवळ 0.73% मतांच्या फरकाने त्यांना मिस्टर यून यांच्याकडून थोडक्यात पराभव पत्करावा लागलेला.

दक्षिण कोरियाच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी हा सर्वांत अटीतटीचा सामना ठरला होता. तसंच 2027 साली होणारी आगामी अध्यक्षपदाची निवडणूक ते लढवण्याची मोठी शक्यता आहे.

निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि फसवणूकीचे आरोप लावण्यात आले आहेत.

सेऊलच्या दक्षिणेकडील दहा लाख लोकसंख्येच्या सियान्गनाम शहराचे महापौर असताना खाजगी विकासकांना मालमत्ता प्रकल्पातून बेकायदेशीरपणे नफा मिळवण्याची परवानगी दिल्याचा आरोप सरकारी वकिलांनी त्यांच्यावर केलाय.

मिस्टर ली यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून ते त्यांना राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हटलंय.

आरोपांवरील खटल्याच्या प्रतीक्षेत असताना त्यांना कोठडीत ठेवण्याची सरकारी वकिलांची विनंती सप्टेंबरमध्ये न्यायालयाने फेटाळून लावलेली. पदावर असतानाच्या भ्रष्टाचाराशी निगडीत इतर अनेक प्रकरणी वकील अजूनही त्यांची चौकशी करत आहेत.

मिस्टर यून यांच्या परराष्ट्र आणि देशांतर्गत धोरणांचा निषेध करण्यासाठी मिस्टर ली यांनी उपोषण केल्याच्या तीन आठवड्यांनंतर न्यायालयाचा आदेश आला. 19 दिवस काहीही न खाल्ल्यामुळे मिस्टर ली यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलेलं.

दक्षिण कोरियाचा गुन्हेगारी दर साधारणपणे कमी आहे, मात्र गेल्या वर्षात देशामध्ये चाकू हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेय. देशात बंदुका आणि इतर शस्त्रे बाळगण्याबाबत कठोर नियम आहेत आणि बहुतेक महत्त्वाच्या व्यक्तींना सहसा कडक सुरक्षा संरक्षण नसतं.

दक्षिण कोरियाच्या राजकारण्यांवर शस्त्रांनी शारीरिक हल्ला केल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी घडली आहेत.

मार्च 2022 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे पूर्वीचे नेते सॉन्ग यंग-गिल यांच्यावर मिस्टर ली यांचा प्रचार करताना एका बोथट वस्तूने हल्ला करण्यात आलेला. त्यात ते जखमी झालेले.

2006 मध्ये हुजूर पक्षाच्या नेत्या पार्क ग्युन-हाय यांच्यावर अध्यक्ष होण्याआधी झालेल्या चाकूहल्ल्यात चेहऱ्यावर जखम झालेली.

16 वर्षे अध्यक्षपद भूषविलेले त्यांचे वडील पार्क चुंग-ही यांच्यावर 1979 मध्ये जेवणाच्या एका खाजगी कार्यक्रमात त्यांच्या गुप्तहेर प्रमुखाने त्यांना गोळ्या घालून ठार केलेलं.

(या वृत्तासाठी सेऊलमधील जेक क्वॉन यांनी मदत केली.)

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)