You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतले 'हे' रिक्षावाले खरंच महिन्याला 5 ते 8 लाख कमवतात? अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाचं काय कनेक्शन?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात एक रिक्षाचालक महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत असल्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळ लोकांच्या बॅगा आणि इतर साहित्य सांभाळण्याची सेवा देऊन रिक्षा चालक महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवत आहेत, अशा चर्चा आहेत.
दरम्यान सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत सुरू असलेल्या या प्रकाराकडं, एका सोशल मीडिया पोस्टमुळं प्रशासनासह सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
रिक्षाचालक आणि पोलिसांनी मात्र यात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
या संपूर्ण प्रकरणाविषयी वेगवेगळी मतं माडंली जात आहेत. पण प्रत्यक्षात खरंच हे असं होतंय का? याबाबत बीबीसी मराठीनं माहिती घेतली.
गरज पाहून कमाईचा फंडा?
मुंबईत अमेरिकन वाणिज्य दूतावासाचा परिसर अतिसंवेदनशील परिसर आहे. इथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक असते.
नेमून दिलेल्या पार्किंगशिवाय वाणिज्य दूतावासाजवळ गाडी पार्क करण्यास मनाई आहे. तसंच दूतावासामध्ये जाताना बॅग आत नेण्यास मनाई केली जाते.
इथे भेट देणाऱ्या अनेक लोकांना याबाबत माहिती नसते. त्यामुळे बॅग कुठे ठेवायची, असा त्यांच्यापुढे प्रश्न असतो.
ही समस्या ओळखून इथले रिक्षावाले आणि इतर लोक पैशाच्या मोबदल्यात बॅगा आणि इतर ऐवज सांभाळतात.
एवढंच नाही तर काही वर्षांपासून त्यांनी कुर्ला मोतीलाल नगर परिसरात एका लॉकर रुमध्ये किंवा रिक्षामध्ये बॅगा व साहित्य ठेवण्यास सुरुवात केल्याचंही काही स्थानिक दुकानदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ओळख लपवण्याच्या अटीवर सांगितलं.
वाणिज्य दूतावासामध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे हे रिक्षावाले आणि हा व्यवसाय सुरू करणाऱ्यांची चांगली कमाई आहे, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या अनेक वर्षांपासून या दूतावासाबाहेर लॉकरच नसल्याने येणाऱ्यांची गैरसोय होते. एका मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आलेल्या अनुभवामुळं ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.
कशामुळे सुरू झाली चर्चा?
राहुल रुपाणी हे लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड आहेत.
त्यांनी Linkedinवर एका रिक्षावाल्याबाबत 'नो अँप, नो फंडिंग आणि नो टेक' असं म्हणत कौतुक करणारी माहिती दोन आठवड्यापूर्वी शेअर केली होती.
रुपाणी त्यांच्या व्हिसाच्या कामासंदर्भात अमेरिकन दूतावासात गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी त्यातून शेअर केला होता.
"मी व्हिसा अपॉइंटमेंटसाठी अमेरिकन वाणिज्य दूतावासात गेलो होतो. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी मला बॅग आत नेता येणार नाही असं सांगितलं. बॅग ठेवण्यासाठी तिथं लॉकरही नव्हतं.
मी पर्याय शोधत फूटपाथवर उभा होतो. त्यावेळी एक ऑटो ड्रायव्हर आला आणि त्याने 1000 रुपये द्या, मी तुमची बॅग सुरक्षित ठेवतो अशी ऑफर दिली. सुरुवातीला मी घाबरलो पण नंतर बॅग त्याच्याकडे ठेवली," असं रुपाणी यांनी पोस्टमध्ये सांगितलं.
पुढे त्यांनी म्हटलं की, "या व्यक्तीच्या व्यवसायाची मी माहिती घेतली. तो एका दिवसात 20-30 ग्राहकांच्या बॅगा सांभाळतो. प्रत्येकाकडून 1000 रुपये घेतो. दरमहा असे 5-8 लाख रुपये कमवतो."
रिक्षावाल्यांना मनस्ताप
रुपाणी यांनी शेअर केलेल्या पोस्टबाबत चांगलीच चर्चा झाली. त्यांनी सांगितलेल्या माहितीवर बराच उहापोह झाला.
पण त्याचा फटका वांद्र्यातील रिक्षावाल्यांना बसला. यामुळं परिसरातील रिक्षावाले स्थानिक पोलिसांच्या रडारवर आले. पोलिसांकडून चौकशी सुरू झाल्याचं रिक्षाचालक सांगत आहेत.
रुपाणी यांनी आदिल शेख या रिक्षा चालकाचा फोटोही शेअर केला. त्यामुळं आदिल यांनाही गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस तपासासह इतरांच्या प्रश्नांचाही सामना करावा लागत आहे.
त्यामुळं आदिल सध्या खूप तणावात आहेत, अशी माहिती वांद्रेतील भारत नगर परिसरामध्ये राहणाऱ्या सुलतान शेख यांनी दिली.
सुलतान शेख हेही वांद्रे परिसरातील रिक्षाचालकच आहेत. ते म्हणाले की, " पाच ते आठ लाख रुपयांच्या कमाईची बातमी खोटी आहे. काही रिक्षावाले लोकांची मदत करतात, पण तो त्यांचा व्यवसाय नाही.
दूतावासात येणाऱ्यांना सामान ठेवण्यासाठी रिक्षाचालकांसह इतर काही लोक लॉकरपर्यंत जाण्यासाठी मदत करतात. त्यासाठी नियमाप्रमाणे भाडे घेतात. सोशल मीडियावरच्या चर्चा चुकीच्या आहेत."
कुणाच्या तरी सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी रिक्षावाल्यांना अशाप्रकारे मनस्ताप होत असल्याचं दुसरे एक रिक्षाचालक रशीद कुरेशी म्हणाले.
रिक्षावाल्यांना पाच ते आठ लाख रुपये महिना कमाई मिळाली असती तर ते झोपडपट्टीत राहिले नसते, त्यांची परिस्थिती हलाखीची नसती. त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका, असं रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर अशा प्रकारे लॉकर सेवा चालणाऱ्या संबंधित रिक्षाचालकासह इतर 12 जणांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
त्यावेळी त्यांच्यापैकी कुणाकडेही लॉकर सेवा चालवण्याची किंवा जवळच्या दुकानांमध्ये वस्तू ठेवण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसल्याचं समोर आलं.
"लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने रिक्षाचालक आणि इतर काहीजण नियमबाह्य पद्धतीने सामान सांभाळत होते," असं बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितलं.
याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून समज देण्यात आली आहे. रिक्षाचालकांना परवाने रिक्षा चालवण्यासाठी दिले आहेत, इतर कामांसाठी नाही, असं समजावल्याचं ते म्हणाले.
पुन्हा अशाप्रकारे कोणी अवैधपणे सामान किंवा बॅगा सांभाळताना आढळलं किंवा तक्रार मिळाली तर कारवाई करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.
अशाप्रकारे बॅगा किंवा साहित्य ठेवण्यासाठी लोकांची होणारी गैरसोय आणि संबंधित प्रकाराबाबत बीबीसी मराठीनं अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला. पण त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
प्रामाणिकपणासाठी केली होती पोस्ट-रुपाणी
रुपाणी यांच्या एका पोस्टमुळं हा सर्व प्रकार घडला. रिक्षाचालक आणि पोलिसांवरही प्रश्न उपस्थित झाले. त्यामुळं राहुल रुपाणी यांनी आणखी एक पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली.
"ही पोस्ट केवळ एका रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, मदत याचं कौतुक करण्यासाठी केली होती. कारण कोणी मदतीला आलं नाही तेव्हा त्यानं मदत केली होती. दूतावासाबाहेरील लोकांना अत्यंत गरजेची सेवा त्यानं दिली," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
तसंच, आपण लिहिलेली सर्व माहिती वैयक्तिक अनुभवांवर आणि एकदा झालेल्या चर्चेवरून लिहिली होती. त्याची कुठेही सत्यता पडताळलेली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यामागचा हेतू अत्यंत सकारात्मक होता. कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्यासाठी माहिती उघड करण्याचा किंवा खळबळ निर्माण करण्याचा हेतू नव्हता.
या पोस्टचा चुकीचा अर्थ काढू नये आणि त्यामुळं स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी पोस्टमध्ये केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)