खुदा बक्ष : कणकेच्या गोळ्यांनी झाकलेले डोळे, वर कापडाच्या पट्ट्या आणि युरोपच्या रस्त्यावर चालवायचे सायकल

खुदा बक्ष

फोटो स्रोत, BRITISH PATHE

    • Author, चेरीलॅन मोलान द्वारे
    • Role, बीबीसी न्यूज, मुंबई
  • Published

गर्दी असलेल्या रस्त्यावरून सायकल चालवत जाणाऱ्या माणसाकडं पाहिलं तर, तसं फार काही विशेष वाटणार नाही.

पण त्याचे डोळे जर कणकेच्या गोळ्यांनी झाकलेले असतील, त्यावर कापूस आणि वर कापडाच्या अनेक पट्ट्या केवळ नाकपुड्या मोकळ्या राहतील अशा पद्धतीने घट्ट बांधलेल्या असतील तर?

काश्मीरमध्ये 1905 मध्ये जन्मलेले खुदा बक्ष हे 1930 आणि 40 च्या दशकात इंग्लंड आणि युरोपातील रस्त्यांवर अशा प्रकारे डोळे बांधून सायकल चालवण्याच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध होते.

डोळ्याशिवायही ते पाहू शकत होते आणि त्यामुळंच असं करणं शक्य होत असल्याचा खुदा बक्ष यांचा दावा होता.

त्यांनी त्यांच्या जादूच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाला "द मॅन विथ एक्स-रे आइज" (एक्स-रे सारखे डोळे असलेला माणूस) असं नाव दिलं होतं.

या कार्यक्रमात ते अनेक चक्रावून सोडणारी कृत्ये करताना दिसायचे. त्यात डोळे बंद करून किंवा झाकलेले असताना पुस्तकातील उतारे वाचणे, सुईत दोरा ओवणे अशा सादरीकरणांचा समावेश असायचा.

खुदा बक्ष यांनी त्यांच्या या अविश्वसनीय क्षमतेच्या जोरावर अनेक पिढ्यांना भुरळ घातली. रोआल्ड डल यांची 1977 मधील 'द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर' या लघुकथेमागे बक्ष यांचीच प्रेरणा असल्याचंही म्हटलं जातं. या लघुकथेचं आता वेस अँडरसन नावाच्या एका चित्रपटात रुपांतर झालं आहे.

खुदा बक्ष यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. प्रोफेसर मूर नावाच्या एका भारतीय जादूगाराचं सादरीकरण पाहून प्रभावित झाल्याचं, बक्ष यांनी 1952 मध्ये आर्गोसी मॅगझिनसाठी दिलेल्या मुलाखतीत डल यांना सांगितलं होतं.

हे सादरीकरण पाहिल्यानंतर दोन दिवसांनी बक्ष घरातून पळून गेले. प्रोफेसर मूर यांचा असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी ते त्यांच्या मागे लाहोरपर्यंत गेले. त्यावेळी त्यांचं वय होतं 13 वर्ष.

नंतरच्या वर्षांत त्यांनी बर्मा (म्यानमार), सिलोन (श्रीलंका) आणि बॉम्बे (मुंबई) असा प्रवास केला. या दरम्यान त्यांनी वेगवेगळे जादूगर, योगी आणि थिएटरमधील कलाकारांकडून काही ट्रिक्स आणि इतर कौशल्ये आत्मसात केली.

त्यांनी त्यांचं नावही बदलून केबू ड्युक आणि नंतर कुडा बक्स केल्याचं लेखक जॉन झुब्रीकी यांनी त्यांचं पुस्तक 'एम्पायर ऑफ एनहान्समेंट द स्टोरी ऑफ इंडियन मॅजिक' यात लिहिलं आहे.

जेनी मॅजिक मासिक

फोटो स्रोत, CAITLYN RENEE MILLER

फोटो कॅप्शन, जेनी मॅजिक मासिकाच्या मुखपृष्ठावर खुदा बक्ष
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मे 1935 मध्ये ते इंग्लंडला गेले. त्याठिकाणी पूर्वेकडील देशांमधील जादूगारांबाबत प्रचंड आकर्षण होतं, आणि त्यांना प्रचंड मागणीही होती.

"भारताकडे 'तेव्हा जादूची भूमी' म्हणून पाहिलं जात होतं. हे मत भारतात येणारे प्रवासी, मिशनरी, व्यापारी आणि इतिहासकार यांच्या लेखनातून तयार झालेलं होतं.

त्या सर्वांनी रस्त्यावरील किंवा शोमध्ये असलेल्या जादूगारांविषयीचे रंजक पण अधिक रंगवून मांडलेले असे हे अनुभव होते, असं झुब्रीकी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पाश्चिमात्य देशांना जादूगारांविषयी असलेल्या या आकर्षणाचा अनेक जादूगारांनी फायदा उचलला. बक्ष हेदेखील त्यापैकी एक होते. ते इंग्लिश लोकांसारखे कपडे परिधान करत असले तरी, त्यांच्या जादूचे संदर्भ कायम पूर्वेकडील गूढवादाशी जोडायचे.

जादूविषयक 'मॅगझिन द लिंकिंग रिंग'मध्ये खुदा बक्ष यांच्याबाबत लिहिताना इतिहासकार जॉन बूथ यांनी त्यांचं वर्णन "पॅरिसमध्ये डोळे झाकून सायकल चालवणारा आणि गूढ क्षमता असलेला भारतीय उपखंडातील गूढ व्यक्ती", असं केलं होतं.

इंग्लंडमध्ये बक्ष यांनी त्यांच्या प्रसिद्ध 'एक्स रे व्हिजन'च्या सादरीकरणाने कमी काळात प्रसिद्धी मिळवली. पण त्यामुळं काही संशयी लोकांचंही लक्ष त्यांच्याकडं वेधलं गेलं.

त्यांनी बक्ष यांच्या क्षमता तपासण्यासाठी काही चाचण्याही केल्या.

जुलै 1935 मध्ये ब्रिटनमधील "घोस्ट हंटर" म्हणून प्रसिद्ध असलेले हॅरी प्रिन्स आणि काही डॉक्टरांनी बक्ष यांच्या एक्स रे सारखी दृष्टी असलेल्या दाव्याची तपासणी केली.

"प्रिन्स सर्जिकल बँडेज, चिकटपट्टी, कापूस आणि वुलनचे पॅड, एक खास मास्क अशा तयारीनिशी आले होते. हे मास्क जाड अशा काळ्या कापडाच्या दुहेरी आवरणाचे तयार केलेलं होतं," असं झुब्रीकी यांनी पुस्तकात लिहिलं आहे.

फायर वॉक करताना खुदा बक्ष

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1935 मध्ये फायर वॉक करताना खुदा बक्ष

बक्ष यांनी डोळे बँडेजने पूर्णपणे झाकलेले असतानाही पुस्तक वाचून दाखवले त्यावेळी डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांचे बँडेज काढून बांधले.

तरीही बक्ष यांना वाचता येत होतं. त्यांच्या पाठिमागे एका टेबलवर ठेवलेली हाताने लिहिलेली चिठ्ठी ते वाचत होते.

सप्टेंबर 1935 मध्ये बक्ष यांची आणखी एक चाचणी घेण्यात आली. यावेळीही प्रिन्स यांनीच ही चाचणी घेतली. पण त्यामुळं बक्ष यांना इंग्लंड आणि युरोपच्या मोठ्या भागात आणखी प्रसिद्धी मिळाली.

सरेच्या ग्रामीण भागात बक्ष यांनी आगीवर चालण्याचा कारनामा करून दाखवला. इंग्लंडमध्ये याचं प्रथमच सादरीकरण करण्यात आलं होतं.

याठिकाणी डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि पत्रकार यांचा समावेश होता. या सादरीकरणाच्या आधी आणि नंतर निरीक्षक बारकाईने तपासणी करत होते. आगीवर चालण्याआधी आणि नंतर बक्ष यांचे पाय आणि इतर सर्व गोष्टी तपासल्या गेल्या. या ट्रिकमध्ये फसवणुकीचा तर प्रकार नाही, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात होता.

यासाठी एक खड्डा तयार करण्यात आला. त्यात लाकूड, कोळसा, पॅराफिन आणि वृत्तपत्रं टाकून आग लावण्यात आली. जवळपास दोन तासांनंतर बक्ष यांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळा या निखाऱ्यांवरून चालण्याची किमया करून दाखवली.

"त्यांच्या तळपायांवर फोड येण्यासारखी काहीही स्थिती किंवा संशय नव्हता," असं स्वतः प्रिन्स यांनी त्यांच्या कन्फेशन्स ऑफ घोस्ट हंटर या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.

नऊ दिवसांनंतर आणि आणखी जास्त निरीक्षकांच्या उपस्थितीत बक्ष यांनी पुन्हा दोन वेळा निखाऱ्यांवरून चालून दाखवलं. हे निखारे एवढे गरम होते की, त्यावर स्टीलही वितळू शकत होतं. तसं असलं तरी यावेळीही बक्ष यांच्या तळपायांना काहीही झालेलं नव्हतं.

यावरून प्रिन्स यांनी असा अंदाज लावला की, "बक्ष यांच्या मानसिक आणि शारीरिक शक्तींमध्ये काहीतरी संबंध असल्यामुळे त्यांना काहीही इजा होत नाही," असं झुब्रीकी यांनी लिहिलं आहे.

डल यांच्याबरोबरच्या मुलाखतीत बक्ष यांनी दावा केला की, "त्यांनी अशा पातळीपर्यंत मन एकाग्र केलं की, त्यांना आगीशिवाय काहीही दिसत नव्हतं, आग थंड होत होती."

"एक्स रे व्हिजन" चे सादरीकरण करण्यासाठी अंतर्गत दृष्टीची मदत झाल्याचा दावाही बक्ष यांनी केला. अगदी कमी वयात योगींकडून घेतलेल्या प्रशिक्षणामुळं त्यांना मन एकाग्र करण्याचं तंत्र अवगत झाल्याचं ते म्हणाले.

हे तंत्र शिकताना त्यांना मेणबत्तीच्या ज्योतीकडे इतर सर्व काही दिसणं बंद होईपर्यंत टक लावून पाहावं लागायचं.

मग त्यात पाहणाऱ्याला त्यांच्या सर्वात प्रिय व्यक्तीचा चेहरा त्यात दिसू लागायचा. बक्ष यांना त्यांच्या भावाचा चेहरा यात दिसायचा.

अनेक वर्ष रोज रात्री अशाप्रकारे सराव केल्यानंतर बक्ष यांना 24 व्या वर्षी असं लक्षात आलं की, त्यांनी डोळे बंद केले आणि प्रचंड एकाग्रतेनं पाहिलं तर, ज्या वस्तूकडं पाहत असेल त्याची अस्पष्ट अंधूक अशी प्रतिमा त्यांना सहज पाहता येत होती.

अशाप्रकारे वयाच्या 28 व्या वर्षी ते डोळे पूर्णपणे झाकलेले असताना पुस्तक वाचू लागले होते, असा दावा त्यांनी केला आहे.

बक्षच्या चेहऱ्याभोवती पट्टी बांधताना डॉक्टर

फोटो स्रोत, BRITISH PATHE

फोटो कॅप्शन, बक्षच्या चेहऱ्याभोवती पट्टी बांधताना डॉक्टर

बक्ष यांच्या दाव्यांना विरोधही करण्यात आला. त्यांच्या एक्स रे व्हिजन अॅक्टचा अभ्यास करणाऱ्या काहींनी असा निष्कर्ष काढला की, बक्ष हे नाकाच्या बाजूला तयार होणाऱ्या फटीतून खाली पाहतात.

कॅटलिन रेनी मिलर यांनी बक्ष यांच्यावर एक शोधनिबंध लिहिला होता, त्यात त्यांनी हा दावा केला होता. पण त्याने बक्ष यांच्या प्रसिद्धीवर फारसा काही परिणाम झाला नाही.

त्यांच्या कार्यक्रमांसाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी व्हायची. माध्यमांनी त्यांना "शतकातील आश्चर्य" आणि "जगातील आठवे आश्चर्य" असंही संबोधलं. जिनी या जादूविषयक मॅगझिनमध्ये जादूगर बिल लार्सन यांनी याबाबत उल्लेख केला आहे.

रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट या प्रसिद्ध टीव्ही शोच्या पहिल्या भागात बक्ष यांचा समावेश होता. शिवाय त्यांचा स्वतःचा "कुडा बक्स, हिंदु मिस्टिक" नावाचा टीव्ही शोदेखील होता.

बक्ष यांचे सादरीकरण एवढे विश्वसनीय असायचे की, त्यामुळं लोकांना ते डोळे झाकलेले असताना पाहू शकतात यावर विश्वास बसला.

बूथ यांनी याबाबतच्या बक्ष यांच्या एका दाव्याचा उल्लेखही केला. कार्यक्रमात सादरीकरणासाठी आलेल्या तीन महिलांना बक्ष यांच्या या ट्रिकची किती भीती होती, हे त्यातून समोर येतं.

बक्ष यांनी दावा केला की, ते भिंतींच्या पलिकडचं पाहण्याचा सराव करत होते त्यामुळं महिलांनी बक्ष यांच्यापासून दूर अंतरावर ड्रेसिंग रूम देण्याची मागणी केली होती.

"आमच्यात आणि खुदा बक्ष यांच्यामध्ये फक्त विटांची एक भिंत आहे," अशी तक्रार या महिलांनी केली होती.

नंतर बक्ष यांनी लंडन सोडले आणि ते अमेरिकेला गेले. त्याठिकाणीही त्यांनी शो सुरू ठेवले. त्यात हॉलिवूडमधील प्रसिद्ध क्लब मॅजिक कॅसलचाही समावेश होता.

बक्ष यांचं 1981 मध्ये लॉज एंजल्समध्ये निधन झालं. त्यांनी अखेरचे दिवस मॅजिक कॅसलमध्ये जादूगारांबरोबर पत्ते खेळत घालवले.

त्या जादूगारांचं असं म्हणणं होतं की, बक्ष यांनी डोळ्यावर पट्टी बांधली नाही, तरच त्यांना हरवणं शक्य होतं.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)