You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. शरद पवारांच्या वारसदार सुप्रिया सुळे होतील का?
शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून पडला होता. जेव्हा अजित पवार अगोदर राजकारणात आले तेव्हा त्यांच्याकडे हा वारसदार म्हणून पाहिलं जाऊ लागलं. पण 2006 मध्ये जेव्हा सुप्रिया सुळे राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्या तेव्हा या वारसदारीवर त्यांचाही हक्क आला.
2019 मध्ये निवडणुकीदरम्यान सुप्रिया सुळेंनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की 'शरद पवारांचा वारसदार कोण हे काळ ठरवेल'.
हा प्रश्न शरद पवारांनाही सतत विचारला गेला आहे. पण तेही कायम सुप्रिया सुळेंना दिल्लीच्या राजकारणात आणि अजित पवारांना राज्यात रस आहे असं उत्तर कायम देत आले आहेत. अजित पवारांनीही कधी नेमकं उत्तर दिलं नाही. परिणामी इतकी वर्षं प्रश्नचिन्ह कायम राहिलं.
2. कोकणातला बारसू रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?
गेल्या काही दिवसांत कोकण पुन्हा धगधगतंय. त्यामागचं कारण आहे रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात झालेलं आंदोलन.
मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध सुरुवातीपासून विरोध केला आहे.
पण 25 एप्रिल 2023 रोजी पुन्हा भडका उडाला. प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यासाठी अधिकारी इथे आले, तेव्हा लोकांनी तीव्र आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला की नाही, यावरून आरोप प्रत्यारोपही झाले.
3. हॅकिंग होऊ नये म्हणून सुरक्षित पासवर्ड कसा निवडाल?
ईमेल्स आणि महत्त्वाची माहिती, पैशांच्या व्यवहारांचे तपशील हे सारं सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो तो पासवर्ड.
ईमेल, ऑनलाईन बँकिंग, फेसबुक - इन्स्टाग्राम - ट्विटरसारखा सोशल मीडिया किंवा मग अॅमेझॉन - मिंत्रा सारखी शॉपिंग अॅप्स.
यातल्या प्रत्येकासाठी आपल्याला एक पासवर्ड ठेवावा लागतो.
शिवाय, तो लक्षातही ठेवावा लागतो, म्हणून मग अनेकदा आपण शॉर्टकट्स मारतो. आणि याच गोष्टी धोकादायक ठरू शकतात.
4. नवीन उल हक कोण आहे, ज्याच्यावरून कोहली आणि गंभीर भिडले..
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लखनौ सुपरजायंट्स संघाचा मेन्टॉर गौतम गंभीर या दोन दिल्लीकरांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.
सोमवारी लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर या दोन संघांमध्ये झालेल्या मुकाबल्यात बंगळुरूने 18 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर हस्तांदोलनावेळी हा प्रकार घडला.
सामनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, दोघांच्याही या सामन्याच्या मानधनावर दंड ठोठावण्यात आला आहे.
5. रशियाचं स्वस्त तेल भारतामार्गे युरोपियन बाजारपेठेत, पण फायदा नेमका कोणाला?
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युरोपियन महासंघाने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्यास सुरुवात केली. पुढे रशियाने आपली कारवाई चालूच ठेवल्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात युरोपियन महासंघाने रशियाच्या कच्च्या तेलावर निर्बंध लादले.
त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात रशियाच्या शुद्ध तेल उत्पादनांवर निर्बंध लादण्यात आले. हे निर्बंध लादण्यापूर्वी युरोप त्यांच्या गरजेच्या 30 टक्के तेलाची खरेदी रशियाकडून करायचा.
असं म्हटलं जातंय की, रशियन तेलावर निर्बंध लादल्यामुळे युरोपियन महासंघासह संपूर्ण युरोपमध्ये पुरवठ्यात घट निर्माण होऊ शकते. आधीच युरोपमध्ये महागाई वाढली आहे, त्यात तेलाची घट युरोपसाठी चिंतेचं कारण ठरू शकते.
पण या निर्बंधांनंतरही युरोपला रशियन तेलाचा पुरवठा सुरूच आहे. आता हे तेल भारतामार्गे युरोपियन बाजारपेठेत पोहोचवलं जातंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)