You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमचं छोटंसं कुटुंब आता पूर्ण झालं', तीन जणांचा DNA वापरून बाळं कशी जन्माला आली?
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
तीन व्यक्तींचे जनुकीय घटक वापरून युकेमध्ये 8 बाळं जन्माला आली आहेत. अनुवांशिक, जीवघेणे आजार टाळण्यासाठी हे करण्यात आल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.
युकेतल्या संशोधकांनी शोधलेल्या या पद्धतीमध्ये आई-वडिलांची स्त्रीबीजं आणि शुक्राणू यांच्यासोबतच डोनर महिलेच्या दुसऱ्या स्रीबीजाचा वापर करण्यात आला.
युकेमध्ये हे तंत्रज्ञान गेल्या दशकभरापासून कायदेशीर आहे. पण याच्या वापरातून जन्माला आलेली बाळं पेशींमधल्या सूक्ष्मरचनेच्या (Mitochondrial - मायटोकाँड्रियल) DNA - RNA शी संबंधित दुर्धर आजारांपासून मुक्त असल्याचा पुरावा पहिल्यांदाच समोर आला आहे.
आईकडून बाळाकडे हे आजार येतात आणि परिणामी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. यातून दुर्धर अपंगत्वं येऊ शकतं तर काही बाळांचा जन्माच्या काही दिवसांतच मृत्यू होतो.
कुटुंबातल्या कुणाला, आईला किंवा बाळाच्या मोठ्या भावंडांपैकी कुणाला असा आजार असेल, तर होणाऱ्या बाळालाही हा दुर्धर आजार असण्याची शक्यता असू शकते.
तीन व्यक्तींचा DNA वापरून जन्माला आलेल्या बाळांमध्ये आईवडिलांची बहुतेक जनुकं आणि DNA येतात. पण सोबतच अगदी थोड्याप्रमाणात, म्हणजे साधारण 0.1% गुण हे दुसऱ्या डोनर महिलेचेही येतात. आणि हे बदल पुढच्या पिढ्यांकडेही हस्तांतरित होतात.
या प्रक्रियेत सहभागी झालेली कोणतीही कुटुंब जाहीरपणे बोलायला तयार नाहीत. पण जिथे ही प्रक्रिया झाली, त्या न्यूकासल फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून त्यांनी एक निनावी निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
"अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर या उपचारांनी आम्हाला आशा दिली आणि नंतर आम्हाला बाळही दिलं.
या आनंदी बाळांकडे पाहिल्यावर आमच्या भावना दाटून येतात. आम्ही ऋणी आहोत," असं मुलगी झालेल्या एका आईने म्हटलंय.
मुलगा झालेली दुसरी एक आई म्हणते, "या अत्याधुनिक शोधामुळेच आमचं छोटंसं कुटुंब आता पूर्ण झालंय. मायटोकाँड्रियल आजारांचं दडपण आता आमच्यावर नाही. त्याची जागा आता आशा, आनंद आणि कृतज्ञतेने घेतली आहे."
मायटोकाँड्रिया म्हणजे आपल्या जवळपास प्रत्येक पेशींमध्ये असणारी सूक्ष्म रचना. याच रचनांमुळे आपण श्वास घेऊ शकतो. कारण याच रचना ऑक्सिजनचा वापर करून अन्नाचं रूपांतर एकप्रकारच्या ऊर्जेत करतात. आणि हीच ऊर्जा शरीर इंधन म्हणून वापरतं.
पेशींमधल्या या सूक्ष्म रचनेत बिघाड असेल तर परिणामी शरीराला हृदयाचे ठोके सुरू ठेवण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळत नाही. यासोबतच यामुळे मेंदूची हानी होणं, आकडी येणं (Seizures), अंधत्व, स्नायूंची दुर्बलता, अवयव निकामी होणं (Organ Failure) या गोष्टी होऊ शकतात.
जन्माला येणाऱ्या 5000 बाळांपैकी एकाला असा मायटोकाँड्रियल विकार असतो. दरवर्षी 20 ते 30 बाळं अशा प्रकारे तीन व्यक्तींचा डीएनए वापरून जन्माला घालण्याची मागणी येऊ शकते, असं न्यूकासलमधल्या टीमला वाटतंय. कारण काही बाळं या आजारांमुळे मरण पावलेली आहेत.
मायटोकाँड्रिया हा म्हणजे पेशींमधल्या सूक्ष्म रचनेतला दोष फक्त आईकडून बाळाकडे जाऊ शकतो. म्हणूनच गर्भधारणेच्या या अत्याधुनिक तंत्रामध्ये आईवडिलांसोबतच निरोगी पेशी दान करणाऱ्या महिलेचाही समावेश असतो.
न्यूकासल विद्यापीठामध्ये आणि NHS फाऊंडेशन ट्रस्टच्या न्यूकासल अपॉन टायन हॉस्पिटलमध्ये दशकभरापूर्वी हे तंत्र विकसित करण्यात आलं. त्यासाठी 2017 साली NHS मध्येच विशेष सेवा सुरू करण्यात आली.
यामध्ये आई आणि डोनर महिलेची स्त्रीबीजं प्रयोगशाळेत वडिलांच्या शुक्राणूबरोबर फलित केली जातात.
स्पर्म आणि स्त्रीबीजपासून Pro-nuclei नावाची रचना तयार होत DNA तयार होईपर्यंत भ्रूणाचा (Embryo) चा विकास केला जातो. यामध्ये मानवी शरीरासाठीची सगळी संरचना (Blueprint) म्हणजे केसांचा रंग - उंची - असते.
त्यानंतर दोन्ही भ्रूणांमधून pro-nuclei काढले जातात आणि निरोगी पेशी रचना असणाऱ्या भ्रूणामध्ये पालकांचे DNA सोडले जातात.
यामुळे जन्माला येणारं बाळ हे त्याच्या पालकांशी जनुकीय संबंध असणार असतं, पण त्याच्यामध्ये पेशी रचनेचे दोष - विकार नसतात.
न्यूकासलमधल्या फर्टिलिटी सेंटरमध्ये 22 कुटुंबांनी ही प्रक्रिया केल्याचं न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या काही अहवालांमध्ये म्हटलं आहे. याद्वारे 4 मुलं आणि 4 मुलींचा जन्म झाला. यामध्ये एक जुळं आहे आणि एक बाळ जन्माला यायचं आहे.
NHS च्या दुर्मिळ पेशीजन्य आजारांसाठीच्या विशेष सेवेचे संचालक प्रा. बॉबी मॅकफार्लंड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर, काय होईल याचं दडपण सोसल्यानंतर ही बाळं पाहिल्यावर या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं, त्यांना चिंतामुक्त पाहणं, या बाळांना जिवंत, मोठं होत, नॉर्मल वाढ होताना पाहणं आनंददायी आहे"
जन्माला आलेली ही सगळी बाळं पेशीजन्य दुर्धर आजारांपासून मुक्त आहेत आणि वाढीचे सगळे अपेक्षित टप्पे योग्यरीतीने गाठत आहेत.
एका बाळात एपिलेप्सीची लक्षणं होती, पण ती स्वतःच दूर झाली. तर दुसऱ्या एका बाळाचे हृदयाचे ठोके योग्य पडत नसल्याने त्यावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले.
पण यांचा पेशीजन्य आजारांशी संबंध नाही. ही IVF दरम्यानची गुंतागुंत होती की 3 व्यक्तींचा DNA वापरल्याने झालं वा या बाळांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याने या गोष्टी लक्षात आल्या, हे अजून स्पष्ट नाही.
शिवाय निरोगी भ्रूणामध्ये समजा रचनादोष असणाऱ्या पेशी टाकण्यात आल्या, तर काय होईल, हे अजून स्पष्ट नाही.
न्यूकासल आणि मोनाश विद्यापीठाच्या प्रा. मेरी हर्बर्ट सांगतात, "संशोधनातले हे निष्कर्ष आशादायी आहेत.
पण पेशीरचना डोनेशनच्या या तंत्रज्ञानाच्या मर्यादा काय आहेत हे जाणून घेणारं संशोधन करणं महत्त्वाचं असेल. त्यानेच भविष्यात या उपचारांच्या वापरात सुधारणा करता येतील."
कुंटुंबांसाठी आशेचा किरण
या संशोधनामुळे किटो कुटुंबाला आशा मिळालीय. केट यांच्या सगळ्यात लहान मुलीला, 14 वर्षांच्या पॉपीला हा पेशीजन्य आजार आहे.
व्हीलचेअर वापरणाऱ्या पॉपीला बोलता येत नाही आणि नळीद्वारे अन्न द्यावं लागतं. तर केट यांच्या सोळा वर्षांच्या मोठ्या मुलीकडून हा दोष कदाचित तिच्या बाळांच्या शरीरातही जाऊ शकतो.
केट सांगतात, "याचा मोठा परिणाम तिच्या आयुष्यावर झालाय. ती जशी आहे, तशी आम्हाला आवडतेच. पण असे काही क्षण असतात जेव्हा पेशीच्या रचनेचा हा दुर्धर आजार किती भयानक आहे, याची तुम्हाला जाणीव होते.
या तंत्रज्ञानामुळे माझ्या पुढच्या मुलांच्या वा भावंडांच्या पिढ्या नॉर्मल आयुष्य जगण्याचं स्वप्न पाहू शकतील."
अशा प्रकारे तीन व्यक्तींच्या मदतीने बाळं जन्माला घालण्याचं तंत्रज्ञान युकेमध्ये विकसित करण्यात तर आलंच पण अशी बाळं जन्माला घालण्याची परवानगी देणारा कायदा युकेच्या संसदेत 2015 मध्ये मंजूर करण्यात आला. असं करणारा हा पहिला देश आहे.
पण यावरून वादही झाला होता. कारण अशा पद्धतीतून जन्माला येणाऱ्या बाळांकडे त्यांच्या आईवडिलांचा DNA तर असेलच पण सोबतच डोनर महिलेचाही 0.1% DNA या बाळांकडे येईल.
परिणामी अशा तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या मुलींद्वारे ही गोष्ट त्यांच्या बाळांकडे अनुवंशिकरित्या जाईल आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणाऱ्या जनुकांमध्ये (human genetic inheritance) कायमचा बदल होईल.
याचाच वापर होत जनुकीय सुधारणा करण्यात आलेल्या डिझायनेर बेबीज जन्माला येण्याची भीतीही काहींनी व्यक्त केली होती.
न्यूकासल विद्यापीठाचे प्रा. सर डग टर्नबुल यांनी बीबीसीशी बोलताना सांगतिलं की, "जगातली ही एकमेव जागा आहे, जिथं हे होऊ शकतं. अति-उत्तम विज्ञानाच्या मदतीने आपण इथवर आलोय.
याला क्लिनिकल ट्रीटमेंट म्हणून परवानगी देणारे कायदे आहेत, मदत करायला NHS आहे. आता आपल्याकडे अशी 8 बाळं आहेत जी पेशीजन्य आजारांपासून मुक्त आहेत, हे किती सुंदर आहे."
लिली फाऊंडेशन चॅरिटीच्या लिझ कर्टिस यांनी सांगितलं की, "या तंत्रज्ञानातून जन्माला आलेल्या आठ बाळांमध्ये पेशीरचनेचे दोष नाहीत हे अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपल्याला समजलेलं आहे.
या विकारांचा परिणाम झालेल्या अनेक कुटुंबांसाठी हे अनुवांशिक चक्र भेदण्यासाठीचा हा पहिला आशेचा किरण आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)