You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेला अवैधरीत्या जाण्यासाठी 1.15 कोटी मोजले; फसवणूक, अपहरण आणि मानसिक धक्क्याची गोष्ट
- Author, जय शुक्ल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांचा हिरमोड झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहतो. या यादीत आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.
गुजरातमधून अमेरिकेला अवैधरित्या जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जोडप्याचा त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे.
शक्य ती सगळी खटाटोप करूनसुद्धा या जोडप्याला अमेरिकेत जाण्यास यश आलं नाही. तर उलट आगीतून फुफाट्यात अडकल्याचा प्रकार त्यांच्यासोबत घडल्याचं दिसून येतं.
या प्रकरणी नुकतीच एक पोलीस तक्रार अहमदाबादमध्ये दाखल झाली आहे. यानुसार येनकेन प्रकारे अमेरिकेला पोहोचण्याच्या प्रयत्नात पंकज पटेल आणि त्याची पत्नी निशाबेन पटेल इराणमध्ये जाऊन उडकले होते.
अखेर गुजरात सरकार आणि इराणमधील भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीने या जोडप्याची सुटका करण्यात यश आलं. यानंतर जोडपं टर्की भारतात दाखल झालं असून सध्या त्यांच्यावर गांधीनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यामध्ये पंकजची तब्येत गंभीर असून त्याला या प्रकाराचा जबर मानसिक धक्का बसलेला आहे. याशिवाय त्याच्या शरीरावर जखमा आहेत आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्याच्यावर त्याबाबत उपचार करण्यात येत आहेत.
तर पंकजची गरोदर पत्नी निशाबेन पटेल हिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जोडपं हे अनधिकृत मार्गाने अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करत होतं.
अमेरिकेपर्यंत पोहोचवण्याचा दावा करणाऱ्या एका एजंटने त्यांची फसवणूक करून इराणमध्ये अपहरण केलं. सोडण्यासाठी जोडप्याकडे खंडणी मागण्यात आली. तसंच यादरम्यान त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले.
गुजरात सरकारचं गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या क्राईम ब्रांचने याप्रकरणी ईराणमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने तपास सुरू केल्याचं म्हटलं आहे.
या प्रकरणातील पोलीस तक्रारीनुसार, पंकजच्या पाठीवर ब्लेडने वार करतानाचा एक व्हीडिओ त्यांच्या कुटुंबीयांना पाठवण्यात आला होता. यानंतर कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी करम्यात आली. याशिवाय पत्नीचा आक्षेपार्ह व्हीडिओ बनवण्याची धमकीही यावेळी देण्यात आली.
सव्वा कोटींमध्ये अमेरिका
पोलीस तक्रारीनुसार, अहमदाबादचे रहिवासी असलेल्या पंकज पटेल आणि निशाबेन पटेल या पती-पत्नीची अमेरिकेला जाण्याची इच्छा होती.
दोघांनी गांधीनगरमधील अभय रावल नामक एका एजंटाच्या माध्यमातून हैदराबादच्या शकील नामक एजंटाशी संपर्क साधला. त्यावेळी शकीलने सांगितलं की सुरुवातीला येथून इराणला जावं लागेल आणि तिथून दोघांनाही अमेरिकेला जाता येईल. याबाबतचा व्यवहार 1 कोटी 15 लाख रुपयांचा ठरला.
त्यानुसार, हैदराबादच्या एजंटने दोघांची इराणला जाण्याची व्यवस्था केली. 7 जून रोजी पंकज आणि निशा हे हैदराबादच्या ईराणी दूतावासात व्हिसासंबंधित अर्ज करण्यासाठी गेले.
व्हीसाबाबत संध्याकाळपर्यंत कळवण्यात येईल, असं दूतावास कार्यालयाने सांगितलं. नंतर एजंट शकीलचा फोन आला. त्याने म्हटलं की ईराणचं विमान 12 जून रोजीचं आहे. या प्रवासात मुनिरुद्दीन सिद्दीकी नामक आणखी एक एजंट त्यांच्यासोबत राहील, असं त्याने सांगितलं.
पंकज-निशा ज्या विमानातून इराणला जाणार होते, ते चार तास दुबईमध्ये थांबणार होतं.
दुबईला पोहोचल्यानंतर पटेल दांपत्याने त्यांच्या भावाला तिथले फोटोही पाठवले. पण नंतर त्यांच्याशी कुटुंबीयांचा संपर्क तुटला.
योजनेनुसार, सर्वात आधी जोडप्याला इराणची राजधानी तेहरानला पोहोचायचं होतं. त्यानंतर एजंटच्या सूचनेनुसार पुढील कृती ते करणार होते.
दरम्यान, अहमदाबादमधील एजंट अभय रावल याला एक कॉल आला. पंकज आणि निशा मेक्सिकोला पोहोचले आहेत. पैसे तयार ठेवा, असं कॉलवर सांगण्यात आलं.
पण, कुटुंबीयांच्या माहितीनुसार पंकज-निशा हे संपर्कातच नव्हते. त्यामुळे पैसे देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
पंकज आणि निशा यांचं लोकेशन समजत नव्हतं. त्यातही निशा चार महिन्यांची गरोदर असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आता काळजी वाटू लागली.
व्हीडिओ आणि मेसेजमधून कुटुंबीयांना धमकावलं
यानंतर काही वेळाने पटेल कुटुंबीयांना व्हॉट्सअपवर एक व्हीडिओ प्राप्त झाला. यामध्ये एजंट पंकजला नग्न करून धमकावत आहेत, पैसे दिले नाहीत तर त्याचे नग्न फोटो आणि व्हीडिओ व्हायरल केले जातील, अशी धमकी देण्यात येत होती.
हे पाहून पंकजचा भाऊ संकेत अभय रावलच्या कार्यालयात गेला. अभयने म्हटलं, “काळजी करू नका. फक्त पैसे मिळवण्यासाठी हे एजंट त्यांना धमकावत आहेत.”
यानंतर अभय रावलने त्यांचा एक माणूस इराणला पाठवला. मात्र पंकज आणि निशा यांना ताब्यात ठेवलेल्या एजंटने म्हटलं की पैसे मिळाल्यानंतरच पंकजला सोडण्यात येईल.
सुरुवातीला त्यांना 6 लाख रुपये पाठवून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आणखी 5 लाखांची मागणी केली. संकेतने त्यानंतर पुन्हा 4 लाख रुपये दिले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अपहरणकर्त्यांना 15 लाख रुपये दिले.
यानंतर एजंट्सनी पंकज आणि निशा यांना तेहरानला सोडलं. पण त्यांचे पासपोर्ट त्यांना देण्यात आले नव्हते.
यानंतर संकेत पटेल याने गुजरातचे गृह मंत्री हर्ष संघवी यांच्याशी संपर्क साधून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची मदत मिळवली.
इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकारी पंकज-निशा यांचं लोकेशन मिळवून त्यांच्यापर्यंत पोहोचले.
पंकजला जबर मारहाण करण्यात आली होती. त्याच्या पाठीवर ब्लेडने वार करण्यात आलेले होते. पंकजवर प्रथमोपचार करून दोघांनाही भारताकडे रवाना करण्यात आलं.
यानंतर संकेत पटेल याने अहमदाबादचा एजंट अभय रावल आणि हैदराबादचा एजंट शकील याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पंकजची प्रकृती सध्या कशी?
गांधीनगरमध्ये डॉ. उत्सव पटेल यांच्या रुग्णालयात पंकजवर उपचार सुरू आहेत.
डॉ. पटेल यांनी जोडप्याच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटलं, “पंकजच्या पाठीवर 20-25 वार आढळून आले आहेत. तसंच त्याला इन्फेक्शन आणि डिहायड्रेशनही झालेलं आहे. सध्या त्याची मानसिक स्थितीही गंभीर असून त्याला मोठा धक्का बसलेला आहे.”
डॉक्टरांनी सांगितलं, “पंकज रुग्णालयात आला तेव्हा तो खूप घाबरलेला होता. तो इतर सगळ्यांनाच खूप घाबरत होता. तो अजूनही त्याच ठिकाणी आहे, असं त्याला वाटत होतं. त्याला ठिक होण्यास काही वेळ लागू शकतो.”
तर, पंकजची पत्नी निशा हिचीही तपासणी डॉक्टरांनी केली. आई आणि बाळ यांची प्रकृती ठिक असल्याचं त्यांनी सांगितलं.
ईराणमधील ‘तो’ व्हीडिओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज आणि निशा तेहरानला पोहोचले, त्यानंतर एजंटने त्यांना एका हॉटेलात नेलं. या एजंटची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तो पाकिस्तानी असल्याचं कटुबीयांचं म्हणणं आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शकील ज्या मार्गाने दोघांना अमेरिकेला पोहोचवणार होता, तो मार्ग सध्या सक्रिय नाही. त्यामुळे त्यांना वेगळ्या मार्गाने अमेरिकेला पाठवावं लागणार होतं.
या नव्या मार्गाने अमेरिकेला पोहोचवणारे जवळपास सगळे एजंट पाकिस्तानी आहेत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या कामात वसीम नावाचा एजंट त्यांची मदत करत होता. जोडप्याला ईराणमार्गे पाठवलं तर जास्त पैसे मिळू शकतात असं वसीमला वाटलं. त्यामुळे त्याने अवैधरित्या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांना धमकावणं सुरू केलं होतं.
दुसरीकडे, पंकज आणि निशा यांना अमेरिकेला पोहोचवण्याचं स्वप्न दाखवणारा अहमदाबादमधील एजंट आता फरार झाला आहे.
कृष्णानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. जे. चौहान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “सध्या त्या एजंटच्या कार्यालयाला कुलूप आहे. आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विशेष पथक रवाना झालं आहे.”
पोलीस हैदराबादला जाऊनही या प्रकरणाचा तपास करणार आहेत. पोलिसांनी अहमदाबादचा पिंटू गोस्वामी, गांधीनगरचा अभय रावल आणि एका अज्ञात एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)