You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माझ्या कुटुंबाला 22 वर्षांपूर्वी जिवंत जाळलं', 2002 नंतर पहिल्यांदाच झगमगली गुलबर्ग सोसायटी
- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
गुलबर्ग सोसायटीच्या आसपासचा परिसर कायम लोकांनी गजबजलेला असायचा. पण आता भर पावसातही याठिकाणी दुष्काळासारखी स्थिती असते.
22 वर्षांपूर्वी याठिकाणची सर्व घरं जाळण्यात आली. फक्त मन्सुरी कुटुंबाचं एक घर त्यातून बचावलं होतं. हे घर आजही अगदी त्याच अवस्थेत आहे.
काही घरांमध्ये झाडं उगवली आहेत. तर कुठं रानटी झाडांवर वाळलेल्या वेली दिसत आहेत. 22 वर्षांनंतरही आगीमुळं काळे झालेली घरांची छतं आणि भिंती आजही तशाच काळ्या आहेत.
जी सोसायटी 22 वर्षांपूर्वी कायम गजबजलेली असायची तिथं आता भग्न अवशेषांसारख्या वास्तू दिसतात. आजूबाजूच्या सोसायटींमधले लोक आता तिथं गाड्या पार्क करतात.
पण अनेक वर्षांनंतर यंदा 4 मार्च रोजी या सोसायटीमध्ये नवा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. ढोल-ताशांचे आवाज आणि आनंदी चेहरे लक्ष वेधून घेत होते.
सोसायटीत 22 वर्षांनंतर सेलिब्रेशन
या सोसायटीत राहणाऱ्या 19 वर्षांच्या मिस्बाह यांच्या लग्नाच्या निमित्ताने हळद आणि मेंदीचे कार्यक्रम याठिकाणी झाले. 22 वर्षांनी गुलबर्ग सोसायटीमध्ये असा आनंद सोहळा झाला.
2002 नंतर गुलबर्ग सोसायटी सोडून गेलेले अनेकजण खास या सोहळ्याच्या निमित्ताने याठिकाणी एकत्र जमले होते.
मिस्बाह यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ जेतुनबानो यांनी त्यांच्या हातावरची मेंदी दाखवत बीबीसीला सांगितलं की, "मिस्बाह माझी नात आहे. मी वयाची ऐशी ओलांडली आहे."
"एवढ्या वर्षांनी घरात आनंद सोहळा साजरा होत असताना आजी किंवा कोणाचेही हात मेंदीशिवाय रिकामे राहता कामा नये, असं माझ्या नाती म्हणाल्या. आमच्या कुटंबातील महिलांनी 22 वर्षांनी हातावर मेंदी लावली."
गोध्रा कांडानंतर 2002 मध्ये अहमदाबादेत भडकलेल्या दंगलींमध्ये चमनपुरा परिसरातील गुलबर्ग सोसायटीमधली घरं जाळण्यात आली होती. त्यात अनेक लोकांना जिवंत जाळण्यात आलं होतं.
ज्या मिस्बाह मन्सुरी यांच्या घरी हा कार्यक्रम होत आहे, त्यांच्या कुटुंबातील 19 जणांचा या घटनेत जीव गेला.
"मुलीचा कार्यक्रम ही फक्त सुरुवात"
बीबीसीबरोबर बोलण्याआधी मिस्बाहचे वडील रफीक मन्सुरी हे गुलबर्ग सोसायटीतील घरी मंडप आणि इतर गोष्टींचा हिशेब करत बसले होते.
"यापूर्वी 2001 मध्ये गुलबर्ग सोसायटीत अखेरचा विवाह सोहळा झाला होता. त्यानंतर धार्मिक दंगली झाल्या आणि सोसायटी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली."
"अनेक वर्षांनंतर या भग्न पडलेल्या वास्तूमध्ये आनंद आला आहे. माझ्या मुलीच्या सोहळ्यात सुमारे 500 लोक सहभागी झाले. मेजवानी झाली."
"दुधीचा हलवा, दहिवडा, मांस, रोटी असे अनेक पदार्थ होते. आमच्या मुलीच्या सोहळ्याच्या नमित्तानं सोसायटीत अशा कार्यक्रमांची सुरुवात व्हावा, यासाठी हा पुढाकार आहे."
गुलबर्ग सोसायटीत रफीकभाई मन्सूरी यांच्यासारखं एखाद-दुसरंच कुटुंब राहतं. 2002 मध्ये या सोसायटीमध्ये जे घडलं त्यानंतर बहुतांश लोक इतर ठिकाणी निघून गेले.
"आम्ही आमच्या कुटुंबातील मारल्या गेलेल्या 19 जणांच्या स्मरणार्थ हा सोहळा आयोजित केला. त्यांच्या आत्म्याला शांतता मिळावी म्हणून आम्ही गुलबर्ग सोसायटीत आमच्या मुलीचा सोहळा आयोजित केला," असं जेतुनबानो यांनी सांगितलं.
मिस्बाह यांचे काका असलमभाई मन्सूरी यांनीही जेतुनबानो यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. "आम्ही ठरवलं असतं तर कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये आयोजित करू शकलो असतो. पण आम्ही याठिकाणी कार्यक्रम केला. कारण या सोसायटीशी आमच्या आठवणी जोडलेल्या आहेत. चमनपुरामधील आमच्या काही हिंदू कुटुंबांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला," असं ते म्हणाले.
"2002 पूर्वी गजबजलेला होता गुलबर्ग परिसर"
मिस्बाह यांचा निकाह मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये एका सार्वजनिक सोहळ्यात 6 मार्च रोजी झाला. पण निकाहच्या पूर्वीचे विविध कार्यक्रम गुलबर्ग सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
मन्सुरी कुटुंबीयांनी मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं घराची रंगरंगोटीही केली होती. तसंच आसपासच्या काही भग्न अवस्थेतील घरांच्या बाहेरही चांगलं दिसण्यासाठी चुन्यानं रंग दिला होता.
या निमित्ताने मुंबईहून अहमदाबादला आलेल्या गुलाबबानो इस्लाम सोलंकी काही दिवसांसाठी गुलबर्ग सोसायटीत राहिल्या.
"मिस्बाह माझ्या पुतण्याची मुलगी आहे. 2002 पूर्वी हा परिसर पक्षाच्या घरट्याप्रमाणं चिवचिवणारा होता. आम्ही इथं आलो तर जायची इच्छा होत नव्हती. पण आता इथं यायची इच्छा होत नाही. या निमित्तानं आम्ही एवढ्या वर्षांनी हातावर मेंदी लावली आणि याठिकाणी सजावटही झाली याचा आम्हाला आनंद आहे," असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.
"गुलबर्ग सोसायटी सोडून अहमदाबादच्या जुहापुरा, बापूनगर, सरखेज, वटवा, शाह आलम, नरोदा पाटिया या परिसरात राहायला गेलेल्या लोकांना आम्हीआमंत्रित केलं. अनेक वर्षांनी सोसायटीत असा सोहळा पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. सगळ्यांनी मनापासून आमच्या मुलीला आशीर्वाद दिले," असं असलम भाई म्हणाले.
"2002 पूर्वी जे लोक याठिकाणी राहत होते त्यांना पाहून आम्ही एवढे आनंदी झालो की आवाक् झाल्यानं आमचे डोळेही पाणावले."
गुलबर्ग सोसायटीत मन्सुरी कुटुंबाची दोन घरं आहेत. त्यांचं कुटुंब घर क्रमांक 2 आणि 13 मध्ये राहतं.
"माझी पत्नी यास्मीनबानो, पाच महिन्याचं बाळ, लहान भाऊ, आई, मोठ्या भावाचं कुटुंब सर्वांना जिवंत जाळण्यात आलं. आमची दोन्ही घरं जाळण्यात आली होती," असं रफीकभाई म्हणाले.
त्यानंतर रफीकभाई यांनी तस्नीम यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांच्यापासून रफीकभाईंना एका मुलीसह एकूण तीन अपत्ये होती. त्यापैकी सर्वात मोठी मुलगी मिस्बाहचं लग्न होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे या सोहळ्यात मिस्बाह यांना दोन मामेरा आले. (मुलीसाठी आईच्या माहेरुन येणारी भेट) म्हणजे त्यापैकी एक रफीकभाई यांच्या पहिली पत्नी यास्मिनबानो यांच्या माहेरून आला होता.
यास्मीन यांचे भाऊ मोहम्मद इरफान यांनी याबाबत बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "माझ्या बहिणीच्या मृत्यूनंतर रफीकभाई यांची दुसरी पत्नी तस्नीमही माझी बहीण आहे. त्यामुळं आम्ही मामेरा आणला."
मन्सुरी यांच्या कुटुंबाशी आमचं नातं अत्यंत चांगलं आहे, असं मोहम्मद इरफान यांच्या पत्नी फिरोजबानो यांनी सांगितलं.
"आम्ही रफीकभाई यांचा दुसरा निकाहदेखील आनंदाने केला. आम्ही मिस्बाहला आमची मुलगीच समजतो."
"मामेरा मध्ये आम्ही नवरा-नवरीचे कपडे, दागिने, सूटकेस, बूट हे देऊन आनंद व्यक्त केला."
"परिसरात हिंदू-मुस्लीम ऐक्य, तेही आमच्या दुःखात सहभागी होते"
गुलबर्ग सोसायटीवर 28 फेब्रुवारी 2002 ला झालेल्या हल्ल्यामध्ये मन्सुरी कुटुंबाची घरंही नष्ट झाली होती. तेही हे घर सोडून जाणारच होते.
घटनेच्या सहा महिन्यांनी ते पुन्हा सोसायटीमध्ये राहायला आले. सरकारकडून त्यांना मदत मिळाली. त्यातून त्यांनी घराची दुरुस्ती केली.
मन्सुरी कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालेलं आहे. आठवड्यातून दोन वेळा सीआयएसएफ सुरक्षेची खात्री करण्यासाठी त्यांच्याकडं सह्या घ्यायला यायचे. पण आता गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्याकडं सुरक्षा नाही.
"आता मला त्याची गरजही नाही. आमची सोसायटी 2002 मध्ये काही मूठभर कट्टरतावाद्यांनी जाळली होती. पण इतर परिसरात हिंदू-मुस्लिमांत फार काही वाद नाही. तेही आमच्या दुःखात सहभागी झाले होते," असं रफीकभाई म्हणाले.
निकाह असलेल्या मिस्बाह यांनी त्यांचं बालपण आणि तारुण्यही गुलबर्ग सोसायटीमध्येच घालवलं.
मिस्बाहचे काका असलमभाई म्हणाले, "सोसायटी सोडून जाताना ती खूप रडली आणि आम्हीही रडलो." हे सांगताना त्यांचे डोळेही भरुन आले होते.
22 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
27 फेब्रुवारी 2002 ला गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये आग लागली होती. त्यात 59 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातच्या अनेक परिसरांमध्ये अत्यंत भयावह दंगली पेटल्या.
अहमदाबादच्या मुस्लीमबहुल चमनपुरा भागातील गुलबर्ग सोसायटीवर 28 फेब्रुवारी 2002 ला गर्दीनं हल्ला केला होता. त्यात 69 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात काँग्रेसचे खासदार एहसान जाफरी यांचाही समावेश होता.
संतप्त जमावाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अनेक मुस्लिमांनी एहसान जाफरी यांच्या घरी शरणागती पत्करली होती. पण गर्दीनं संपूर्ण सोसायटीला चारही बाजूंनी घेरलं आणि लोकांना जिवंत जाळलं होतं.
एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या पतींनी पोलीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही मदत केली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. या प्रकरणी एसआयटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांना दंगलींबाबत क्लीनचीट दिली होती. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं.
पण सुप्रीम कोर्टानं नरेंद्र मोदी आणि इतरांना दिलेल्या क्लीन चीटच्या विरोधातील झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळली होती.