You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात होतील 2024 च्या निवडणुका' - देवेंद्र फडणवीस
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवरून घेतलेल्या ताज्या बातम्यांचा आढावा
1. 'एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात होतील 2024 च्या निवडणुका' - देवेंद्र फडणवीस
हे सरकार पूर्णपणे स्थिर असून 2024 ची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवू असं उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिवसेना आणि भाजप मिळून आगामी निवडणुका लढवल्या जातील. लोकसभा असो की विधानसभा आम्हालाच पूर्ण बहुमत मिळेल आणि या निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात होतील.
बारसू प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याचं ते म्हणाले. बारसूत जे लोक आंदोलन करत आहेत ते सुपारीबाज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
2. राजाराम साखर कारखान्यावर महाडिक कुटुंबाची सत्ता, सतेज पाटील यांचा पराभव
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाला एकहाती विजय मिळाला.
ही बातमी पुढारीने दिली आहे.
21 पैकी 21 जागांवर महाडिक गट विजयी झाला आहे.
सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने चुरस पाहायला मिळाली.
या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झालं होतं. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात होते.
महाडिक गट 21 - पाटील गट - 0 अशी निवडणूक झाली.
3. बृजभूषण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस
भारतीय कुस्ती महासंघातील खेळाडूंवरून निर्माण झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
रविवारपासून कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरू केलं आहे.
या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. ही बातमी सकाळने दिली आहे.
दरम्यान आता विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा थेट आरोप खेळाडूंनी केला आहे. याविरोधात खेळाडूंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
4. 'सर्व्हे थांबवा, प्रोजेक्ट अडचणीत येईल...' - शरद पवार
कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलकांवर पोलिसांच्या बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोन करत सर्वे थांबवण्याबद्दल चर्चा केल्याचे समोर आले आहे.
ही बातमी साम टीव्हीने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोनवरुन चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये शरद पवार यांनी "हा सर्वे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर, प्रोजेक्ट अडचणीत येईल," अशी भूमिका मांडली आहे.
5. योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी, तरुणाला अटक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे.
ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.
आपल्या प्रेयसीच्या वडिलांचा मोबाईल चोरून त्याने त्यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पोलीस मुख्यालयात पाठवला.
आरोपीने कंट्रोल रुम 112 वर मेसेज पाठवून सीएम योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीला अटक झाली असली तरी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)