ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, काही गाड्यांचे स्फोट

Published

आज विविध वर्तनमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1.ठाण्यातील बिझनेस पार्कला भीषण आग, काही गाड्यांचे स्फोट

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील सिनेवंडर मॉलजवळ ओरियन बिझनेस पार्कला मंगळवारी 18 एप्रिलला रात्री वाजल्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की पार्कच्या तळ मजल्यावरुन चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली.

या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. या घटनेदरम्यान काही जण अडकले होते. त्यांची सुटका अग्निशमन दलाने केली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

या आगीत काहीजण अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे पार्किंग झोनमध्ये काही गाड्यांचा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.

त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे कार्य अद्याप सुरू आहे.

2. बिल्किस बानो प्रकरणात कारणे देण्यास सरकारची टाळाटाळ

बिल्किस बानोप्रकरणी आरोपींची मुदतपूर्व सुटका केल्याच्या प्रकरणात फाईल सादर करण्यात गुजरात आणि केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचे संकेत मिळाले.

ही फाईल सादर करण्याच्या निर्णयाला सरकारने आव्हान देण्याचा मानस सरकारने जाहीर केला. यावर फाईल सादर न केल्यास आम्हाला हवे ते निष्कर्ष काढू असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

बिल्किस बानो यांच्यावरील बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात जणांच्या हत्येप्रकरणी 11 गुन्हेगारांना शिक्षा झाली होती. त्यांची मुदतपूर्व सुटका करण्यात आली.

या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती . न्या. के.एम. जोसेफ आणि न्या. बी.व्ही.नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आरोपींनी घेतलेल्या पॅरोलवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

3. प्रत्येक आयआयटीत आता एक मानसिक आरोग्य समुपदेशक नेमणार

देशातील आयआयटीमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक आयआयटीमध्ये एक समुपदेशक नेमण्याचा निर्णय आयआयटी भुवनेश्वर येथे झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान या बैठकीला उपस्थित होते.

त्यांच्यासाह देशातल्या 23 आयआयटीचे संचालक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली.

इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

सर्व आयआयटीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये यासाठी एक धोरण विकसित करण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं.

ड्रॉप आऊटचं प्रमाण, तसंच मानसिक आरोग्याच्या समस्या का निर्माण होताहेत याबद्दल एक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

4. भारतात उष्णतेची मोठी लाट, प्रयागराजमध्ये पारा 44.2 अंशांवर

भारतात उष्णतेची मोठी लाट आली असून बहुतांश शहरात पारा 40 डिग्रीच्या वर गेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील हमीदपूर भागात पारा 44.2 अंशावर गेला आहे.

दिल्लीतही तापमान 40 डिग्रीच्यावर नोंदवण्यात आलं. बुधवारी दिल्लीत ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात पुण्यात तापमान चाळीस अंशांच्यावर जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

5. पुरुष किंवा स्त्री अशी संकल्पनाच पूर्णपणे अस्तित्वात नाही- सरन्यायाधीश

पुरुष किंवा स्त्री अशी संकल्पनाच पूर्णपणे अस्तित्वात नसते अशी टिप्पणी सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी केली आहे. फक्त लैंगिक अवयवर वेगळे आहे म्हणून स्त्री पुरुष वेगळे असू शकत नाही. ही संकल्पना मोठी आणि गुंतागुंतीची आहे.

त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कडक शब्दात आक्षेप नोंदवला.

टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

तुमचं मत लक्षात घेतलं तर अनेक कायद्यांचं काही अस्तित्वच उरणार नाही असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी केला. यावर पाच न्यायाधीश आणि सरकारच्या बाजूने वेगवेगळी मतं मांडली गेली. मुळातच लग्नाबाबतचे कायदे हे शासनाने तयार करायचे असतात. कोर्ट त्यासाठी योग्य ठिकाण आहे का हाच प्रश्न निर्माण होतो असंही तुषार मेहता म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)