ए 1 आणि ए 2 तुपात काय फरक असतो? ए 2 तूप खरोखरंच आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं का?

ए2 तूप साध्या तुपापेक्षा अधिक चांगलं असण्याच्या मुद्द्यावरून होतोय वाद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ए2 तूप साध्या तुपापेक्षा अधिक चांगलं असण्याच्या मुद्द्यावरून होतोय वाद
    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

भारतातील बाजारांमध्ये सध्या ए 1 आणि ए 2 लेबलिंग असलेलं दूध, तूप, लोणी यांची जोरदार विक्री होते आहे.

विशेषकरून साध्या तुपापेक्षा 'ए 2' तूप अधिक आरोग्यदायी असल्याचं मार्केटिंग केलं जातं आहे.

बाजारात साधं तूप जर 1,000 रुपये प्रति किलो दरानं विकलं जात असेल तर 'ए 2' तूप 3,000 रुपये प्रति किलोपर्यंत विकलं जातं आहे.

डेअरी प्रॉडक्ट किंवा दुग्धउत्पादनं विकणाऱ्या कंपन्यांचा दावा आहे की ए 2 तूप देशी गाईच्या दूधापासून तयार केलं जातं. त्यामुळे ते आरोग्याला अधिक फायदेशीर असतं.

या कंपन्या दावा करतात की ए 2 तुपात नैसर्गिकरित्या ए 2 बीटा-कॅसीन प्रोटीन असतं. हे प्रोटीन साध्या दूधातील ए1 प्रोटीनपेक्षा पचायला हलकं असतं. तसंच त्यामुळे शरीरातील इन्फ्लेमेशनदेखील कमी होतं.

असाही दावा केला जातो आहे की ए 2 तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कंज्युगेटेड लिनोलिक ॲसिड (सीएलए) आणि व्हिटामिन ए, डी, ई आणि के सारखे आवश्यक पोषक घटक असतात.

ए 2 तुपासंदर्भात असादेखील दावा केला जातो आहे की यामुळे पचनशक्ती सुधारते. रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्वचा तजेलदार होते.

हृदयविकाराच्या आजारांसाठीदेखील ए 2 तूप फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं आहे. डेअरी कंपन्या असादेखील दावा करतात की या तुपाचं सेवन केल्यामुळे जखमा लवकर भरून निघतात.

डेअरी उत्पादनं विकणाऱ्या कंपन्या ए 2 तुपाची विक्री एक नवीन सुपरफूड म्हणून करत आहेत.

ए 1 आणि ए 2 च्या नावानं डेअरी उत्पादनं विकणं कितपय योग्य?

'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया'नं (एफएसएसएआय) कंपन्यांना याप्रकारच्या लेबलिंगनं दूध, तूप आणि बटर विकण्यास मनाई केली आहे. एफएसएसएआयचं म्हणणं आहे की ए 2 लेबलनं तुपाची विक्री करणं दिशाभूल करणारं आहे.

गेल्या वर्षी एफएसएसएआयनं एक परिपत्रक (सर्क्युलर) जारी करून सांगितलं होतं की दूध किंवा दुग्धजन्य उत्पादनांची ए 1 आणि ए 2 लेबलिंग करून विक्री करणं दिशाभूल करणारं तर आहेच, त्याचबरोबर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अधिनियम, 2006 आणि त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन देखील करणारं आहे.

ए1 आणि ए2 च्या नावानं डेअरी उत्पादनं विकणं कितपय योग्य

फोटो स्रोत, FSSAI

एफएसएसएआयनं कंपन्यांना ए 1 आणि ए 2 लेबल असलेली त्यांची सध्याची उत्पादनं सहा महिन्यात संपवण्यास सांगितलं होतं.

अर्थात एफएसएसएआयनं एक आठवड्याच्या आतच त्यांची ही अधिसूचना मागेदेखील घेतली होती.

आता प्रश्न आहे की ए 1 आणि ए 2 लेबल असलेली ही दुग्धजन्य उत्पादनं आरोग्यासाठी खरोखरंच फायदेशीर आहेत का?

साध्या तुपापेक्षा ए 2 तूप शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं का आणि त्यात अधिक औषधी गुणधर्म असतात का?

ए 1 आणि ए 2 दूध किंवा तूप काय असतं?

ए 1 आणि ए 2 मधील फरक बीटा-कॅसीन प्रोटीनवर आधारित असतो. हे दुधात आढळणारं एक प्रमुख प्रोटीन असतं. हा फरक मुख्यत: गाईच्या प्रजातीवर अवलंबून असतो.

नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चरल सायन्सेसच्या (एनएएएस) शोधनिबंधात (रिसर्च पेपर) म्हटलं आहे की बीटा-कॅसीन हे दुधात आढळणाऱ्या प्रमुख प्रोटीनपैकी एक असतं.

गाईच्या दुधात प्रोटीनचा 95 टक्के भाग कॅसीन आणि व्हे प्रोटीनपासून तयार होतो. बीटा-कॅसीनमध्ये अमिनो ॲसिडचं संतुलन खूप चांगलं असतं.

ए1 आणि ए2 मधील फरक बीटा-कॅसीन प्रोटीनवर आधारित आहे. हे दुधात आढळणारं एक प्रमुख प्रोटीन असतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ए 1 आणि ए 2 मधील फरक बीटा-कॅसीन प्रोटीनवर आधारित आहे. हे दुधात आढळणारं एक प्रमुख प्रोटीन असतं

बीटा-कॅसीन दोन प्रकारचं असतं. युरोपियन जातीच्या गाईंच्या दुधात ए 1 बीटा कॅसीन अधिक प्रमाणात आढळतं. तर ए 2 बीटा कॅसीन भारतीय, देशी गाईच्या दुधात नैसर्गिकरीत्या आढळतं.

अमिनो ॲसिडच्या प्रमाणाचा विचार करता ए 1 आणि ए 2 बीटा-कॅसीन प्रोटीनमध्ये फरक असतो. यामुळे प्रोटीन पचण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

काही अभ्यासातून असं आढळलं आहे की ए 2 दूध पचायला हलकं असू शकतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. मात्र यावर आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. अपुऱ्या संशोधनामुळे, हे दूध आरोग्याला फायदेशीरच असतं, ही बाब अद्याप सिद्ध झालेली नाही.

ए 2 दुधाबद्दल डेअरी तज्ज्ञांचं काय मत आहे?

ए 2 तूप, साध्या तुपापेक्षा खरोखरंच फायदेशीर असतं का की याबद्दल फक्त वाढवून दावे केले जात आहेत, ही बाब काही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.

या प्रश्नावर अमूलचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि आता इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या आर एस सोढी म्हणाले, "मी हा मार्केटिंग तमाशा पाहतो आहे. विशेषकरून ऑनलाईन मार्केट प्लेसवर. तिथे प्रसिद्ध सहकारी संस्था आणि कंपन्या त्यांचं चांगल्यात चांगलं तूप 600 ते 1000 रुपये प्रति किलो दरानं विकत आहेत."

"तर ए 2 लेबल लावून तसंच तूप 2,000 ते 3,000 रुपये प्रति किलो दरानं विकलं जातं आहे. याचा वेगवेगळा प्रचार होतो आहे. कोणी याला लोणकढे तूप म्हणून विकत आहेत. तर काहीजण देशी गाईच्या दुधापासून तयार करण्यात आलेलं आरोग्यदायी तूप म्हणून विकत आहेत."

ते म्हणतात, "सर्वात आधी मी हे स्पष्ट करतो की ए 1 आणि ए 2 हे एक प्रकारचं प्रोटीन असतं, जे फॅटी ॲसिडच्या साखळीशी जोडलेलं असतं. आता या गोष्टीवर वाद होतो आहे की यातील कोणतं तूप चांगलं आहे."

तज्ज्ञांनी ए2 संदर्भात केल्या जात असणाऱ्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांनी ए2 संदर्भात केल्या जात असणाऱ्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी सांगू इच्छितो की यातील नेमकं कोणतं तूप चांगलं आहे या गोष्टीचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. हा वादाचा विषयच नाही. मात्र ए 2 तूप चांगलं असल्याचं सांगितलं जातं आहे. ते चुकीचं आहे."

"बीटा-कॅसीन प्रोटीनचे दोन प्रकार असतात. प्रोटीन साखळीतील 67 व्या अमिनो ॲसिडमध्ये फरक असल्यामुळे या दोन प्रकारात फरक असतो."

आर एस लोढी म्हणतात की ए 2 तुपाचा पौष्टिकपणा आणि तथाकथित औषधी गुणधर्मांबद्दल अतिशयोक्तीनं दावे केले जात आहेत.

ते पुढे म्हणतात, "हे लक्षात घेतलं पाहिजे की तुपामध्ये चरबीव्यतिरिक्त काही नाही. यात 99.5 टक्के चरबी असते आणि मग उर्वरित घटक. यात प्रोटीन नसतं. त्यामुळे हा दावा तुम्ही कसा काय करू शकता की आमच्या दुधात ए 2 प्रोटीन असतं आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतं."

त्यांच्या दृष्टीनं हे लोकांना मूर्ख बनवण्याव्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारची मार्केटिंग करून लोकांची फसवणूक केली जाते आहे.

अर्थात ते असंही सांगतात की ए 2 तूप विकणारे अनेक ब्रँड आले आणि गेले देखील. त्यांच्यासाठी मार्केटमध्ये तग धरणं कठीण आहे. कारण या कंपन्या मार्केटिंगवर खूप जास्त खर्च करतात आणि त्यामुळे त्या बाजारातून बाहेर फेकल्या जातात.

आरोग्यतज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?

आरोग्यतज्ज्ञ देखील ए 2 तुपाच्या नावानं विकलं जाणारं तूप, साध्या तुपापेक्षा अधिक आरोग्यादायी असल्याच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

डॉ. विभूति रस्तोगी, दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलाईड सायन्सेसच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ (डाएटिशियन) आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "ए 2 तुपाच्या नावाखाली विकलं जाणारं तूप साध्या तुपापेक्षा अधिक आरोग्यदायी होण्याच्या दाव्याची जोपर्यंत वैज्ञानिकदृष्ट्या खातरजमा केली जात नाही, तोपर्यंत ते तूप अधिक चांगलं असल्याचं कसं काय म्हटलं जाऊ शकतं."

ए2 तूप म्हणजे मार्केटिंगचा तमाशा असल्याचं बहुतांश जण म्हणत आहेत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ए2 तूप म्हणजे मार्केटिंगचा तमाशा असल्याचं बहुतांश जण म्हणत आहेत

"दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही दावा करत असाल की या प्रकारचं तूप मशीनद्वारे बनवलं जात नाही. तर मग प्रश्न उद्भवतो की दुधातून ए 2 प्रोटीन कसं काढलं जातं आहे. असं करणं शक्य नाही."

"खरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत ए 2 तूप साध्या तुपापेक्षा अधिक फायदेशीर आहे, हे वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे सिद्ध होत नाही, तोपर्यंत याला मार्केटिंगचा तमाशाच म्हणावं लागेल. ए 2 प्रोटीन चांगलं असल्याचा सध्या कोणताही पुरावा नाही."

डॉ. रस्तोगी यांनी असंही सांगितलं की तुपाचं सेवन प्रोटीनसाठी केलंच जात नाही. असं असतानाही ए 2 नावानं तुपाची विक्री प्रोटीनच्या नावाखाली केली जाते आहे. तुपामध्ये प्रोटीनचं प्रमाण नाममात्र असतं.

त्या म्हणतात की कंपन्या दावा करत आहेत की आयुर्वेदानुसार ए 2 तूप आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. प्रत्यक्षात, तथाकथित ए 2 तुपाचं सेवन करणं आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं, असा कोणताही दावा आयुर्वेदात केलेला नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)