टेक्नोक्रॅट आंदोलकाचं जग : आठवड्यात 16 तास काम, पैशाला महत्त्व नाही, 45 व्या वर्षी निवृत्ती

    • Author, पॉला रोजास
    • Role, बीबीसी मुंडो प्रतिनिधी
  • Published

काम करण्यासाठी आठवड्यात फक्त 16 तास निर्धारित असतील. सगळ्यांनी काम करणं अनिवार्य नाही. पण जे कोणी काम करतील ते वयाच्या 25 वर्षांपासून काम सुरू करतील आणि त्यांना 45 व्या वर्षी रिटायर व्हावं लागेल.

इतरांना घाबरण्याची गरज नाही.  त्याच्या आरोग्य, शिक्षण, अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची काळजी घेतली जाईल.

पैशाला महत्त्व राहाणार नाही. या ऐवजी ऊर्जा प्रमाणपत्रं दिली जातील. वस्तूंची किंमत त्या बनवण्यासाठी जेवढी उर्जा खर्च होते त्यानुसार ठरेल.

या बदल्यात लोकशाहीचा बळी द्यावा लागेल. लोकांना आपला नेता, प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार राहाणार नाही. कोणी व्यावसायिक किंवा राजकीय नेता नसेल. महत्त्वाचे सगळे निर्णय इंजिनिअर आणि वैज्ञानिक घेतील.

अमेरिकेत जेव्हा महामंदीने हैदोस घातला होता तेव्हा टेक्नाटो नावाचा एक समुदाय आपल्या स्वप्नात रममाण झाला होता. या समुहाने एका काल्पनिक जगाचं स्वप्न पाहिलं होतं. त्याचे पडसाद आजही सिलिकॉन व्हॅलीसारख्या जागांमध्ये कानावर पडतात.

अर्थात टेक्नाटोची काल्पनिक दुनिया कधी अस्तित्वात आली नाही. पण ज्या आंदोलनाने ही संकल्पना मांडली त्या आंदोलनाबद्दल जाणून घेऊ.

टेक्नोक्रॅट आंदोलन म्हणजे 1930 आणि 1940 च्या दशकात एकत्र आलेले वैज्ञानिक आणि बुद्धीजीवी. त्यांनीच एका ‘जगावेगळ्या जगाचं’ स्वप्न पाहिलं होतं. त्यावेळी या आंदोलनाशी जोडल्या गेलेल्या लोकांची संख्या पाच लाखांहून जास्त होती.

त्यांनी आपल्या आंदोलनादरम्यान असे काही प्रश्न विचारले हे आजही लागू होतात.

कॅनडापर्यंत पसरलं आंदोलन

या टेक्नोक्रॅट्सचं म्हणणं होतं की आधुनिकता आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने नव्या संधी निर्माण केल्यात. पण या विकासाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या नादात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, पर्यावरणीय ऱ्हास, लोकसंख्या वाढ आणि असमानता यासारखे अनेक नवे प्रश्न जन्माला घातले आहेत.

या आंदोलनाचे संस्थापक होते गुढ स्वभावाचे पण तरीही दुसऱ्यावर आपली छाप सोडणारे हार्वर्ड स्कॉट. त्यांना वाटायचं की या जगाला औद्योगिक क्रांतींच्या नियमांनी चालवणं एक मोठी चूक होती.

त्यांचं मत होतं की लोकशाहीने नालायक लोकांना सत्तास्थानी बसवलं आहे. अशा लोकांनी चुकीचे निर्णय घेतले आणि सामाजिक ऱ्हासासाठी कारणीभूत ठरले.

त्यांना वाटायचं की समाजातल्या प्रश्नांचं उत्तर विज्ञानात आहे. तंत्रज्ञानाने चालणाऱ्या जगावर इंजिनिअर आणि वैज्ञानिकांनी राज्य केलं पाहिजे. रोजच्या आयुष्यातल्या समस्यांसाठी वैज्ञानिक सिद्धात लागू केले पाहिजेत आणि त्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे.

या आंदोलनाचे सदस्य करड्या रंगाचे कपडे घालायचे. त्यांनी आपल्या गाड्याही ग्रे रंगाने रंगवल्या होत्या. काहींनी स्वतःची ओळख म्हणून 1x1809x56 असे नंबर दिले होते.

ते एकमेकांना सैनिकी सॅल्यूट करायचे. सायन्स फिक्शन लिहिणारे प्रसिद्ध लेखक एचजी वेल्सही या आंदोलनाच्या समर्थकांपैकी एक होते.

या आंदोलनाचं एक अधिकृत चिन्हही होतं. त्याला ‘मोनाद’ असं म्हटलं जायचं. यिंग आणि यांगसारखं दिसणारं हे लाल आणि पांढऱ्या रंगाचं गोलाकृती चिन्ह उत्पादन आणि मागणी यातल्या समतोलाचं प्रतीक होतं.

टेक्नोक्रॅट आंदोलनाचा प्रभाव अमेरिकेपासून कॅनडापर्यंत पोचला होता. कॅनडात जोशुआ हडलरमॅन नावाच्या व्यक्तीने या आंदोलनाचं प्रतिनिधित्व केलं.

पण शेवटी ते निराश होऊन दक्षिण आफ्रिकेत निघून गेले. त्यांचा 1971 साली जन्मलेला नातू आजही मंगळ ग्रहावर टेक्नोक्रसी वसवण्याचं स्वप्न बघतोय.

त्याने आपल्या एका बाळाचं नावही 'X Æ A-12' असं ठेवलंय. त्यांचं नाव इलॉन मस्क. आज ते अमेरिकन टेक्नोलॉजी कंपनी टेस्ला, स्पेस कंपनी स्पेसएक्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे मालक आहेत.

या आंदोलनाची सुरुवात

टेक्नोक्रॅट आंदोलनाच्या मागे असणारी विचारसरणी समजण्यासाठी त्या आंदोलनाचा ऐतिहासिक संदर्भ समजणं फार गरजेचं आहे.

पहिल्या महायुद्धानंतर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये धक्क्यांचं जग सुरू केलं, ज्याचा शेवट1929 च्या महामंदीत झाला. अर्ध्या जगाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली, लोक रस्त्यावर आले आणि लाखो लोक बेरोजगार झाले.

आंतरराष्ट्रीय टेक्नोक्रसीचे तज्ज्ञ जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डार्मस्टेडचे प्राध्यापक जेन्स स्टीफेख यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, “एक सर्वसामान्य भावना अशी होती की भांडवलशाही व्यवस्था संपुष्टात आली आहे.”

या काळात यूरोपमध्ये कम्युनिझम आणि फॅसिस्ट विचारसरणीचा प्रसार होत होता. या विचारांनी अमेरिकेतही मूळ धरलं होतं.

‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशल अॅज टेक्नोक्रॅटित यूटोपिया’ हे पुस्तक स्टीफेख यांनी लिहिलं आहे. ते म्हणतात, “टेक्नोक्रॅटिक आंदोलन एक प्रतिक्रिया म्हणून समोर आलं. त्या लोकांना वाटत होतं की टेक्नोक्रसी भांडवलशाही आणि राजकारणावर नियंत्रण ठेवू शकते, याला संपवू शकते.”

याचे काही सुरुवातीचे उल्लेख मार्क्सवादी विचारसरणीत दिसतात. पण या आंदोलनाने म्हटलं की, आम्ही साम्यवाद, समाजवाद, नाझीवाद, उदारमतवाद, पुराणमतवाद आणि भांडवलशाही या सगळ्या विचारसरणींच्या विरोधात आहोत.

या आंदोलनातल्या सदस्यांना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवायला मनाई होती. टेक्नोक्रसी आंदोलनाचे नेते हावर्ड स्कॉट यांचं म्हणणं होतं की, “विज्ञान सार्वभौम, सर्वशक्तीशाली ठरेल.”

हावर्ड स्कॉट

हावर्ड स्कॉट यांनी 1919 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स यांना एकत्र करून एका ‘तंत्रज्ञान युतीची’ स्थापन केली होती. पण ही संघटना काही काळच चालली आणि नंतर बंद पडली. पण नंतर त्यांनी टेक्नोक्रॅट आंदोलनाची सुरुवात केली.

या आंदोलनाची सुरुवात अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल आणण्यासाठी स्थापन झालेली वैचारिक आणि संशोधनात्मक संस्था या रूपात झाली होती.

या आंदोलनच्या स्थापनेपासून 1970 साली झालेल्या त्यांच्या मृत्यूपर्यंत हार्वडच या आंदोलनाचे नेते होते.

ते स्वतः इंजिनिअर होते. अर्थात काही लोकांनी त्यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह लावलं होतं पण ते आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते एवढं खरं.

जवळपास 6 फूट उंच आणि भारदस्त आवाज ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्टं होती.

टेक्नोक्रसी एनकॉर्पोरेशनचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्मी गिलक्रेस यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की हावर्ड बुद्धीजीवी नसणाऱ्या लोकांना कमी समजायचे आणि त्यांचं ठाम मत होतं की महिला पुरुषांपेक्षा कमी दर्जाच्या आहेत.

पण जे लोक त्यांना ओळखतात त्यांना वाटतं की हार्वड दुसऱ्यांना प्रेरणा देणारे, हुशार आणि प्रचारची खास नजर असणारे होते.

जगाला आपल्या आंदोलनाची ताकद दाखवण्यासाठी ‘टोकन’ व्यवस्था आणली. त्यांच्या मोठ्या सभांना शेकडो लोग शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सहभागी होत.

यातलं प्रसिद्ध म्हणजे ऑपरेशन कोलंबिया. 1947 साली शेकडो ग्रे वाहनं अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रवास करायला लागली. या वाहनांनी लॉस एजेंसिस ते व्हॅनकुव्हर एवढा पट्टा कापला

टेक्नोक्रॅट आंदोलनाचं काय म्हणणं होतं?

आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी स्कॉट यांनी ‘मुल्याधारित व्यवस्थेला’ नाकारण्याचा प्रस्ताव मांडला. टेक्नोक्रॅट आंदोलनाचं म्हणणं होतं की ही व्यवस्था भांडवलशाही व्यवस्थेचं अविभाज्य अंग होती.

स्कॉट यांचं म्हणणं होतं की औद्योगिक क्राती येईपर्यंत अर्थव्यवस्था ‘संकटावर’ आधारित होती. वस्तू बनवण्यासाठी खूप मेहनत लागायची. त्यासाठी लागणारी साधनं पुरेशी नव्हती.

पण यानंतर तंत्रज्ञानाने जगात बहुउत्पादनाचं सत्र सुरू झालं. यामुळे जगात वस्तूंचा पूर आला. एका नव्या जगाची रचना तयार झाली. या जगात मशिनमुळे सगळ्या गोष्टी स्वस्तात बनायला लागल्या.

टेक्नोक्रॅट आंदोलन ‘पैसा’ संपवू पाहात होता. त्यांचं म्हणणं होतं की तो ‘लालचीपणा, गुन्हेगारी आणि संकटांचं’ मूळ होता.

त्यांनी म्हटलं की आम्ही पैशाऐवजी ‘उर्जा प्रमाणपत्र’ आणू. याची किंमत एखादी वस्तू बनवण्यासाठी किती उर्जा लागलीये यावर ठरेल.

टेक्नोक्रॅट आंदोलनाचं म्हणणं होतं की तुम्ही लोकांना ऊर्जा प्रमाणपत्रं देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करताय तर लोकांची पैसा जमा करण्याची इच्छा संपून जाईल. त्यामुळे गुन्हेगारीही नष्ट होईल.

कम्युनिझमचा प्रभाव?

हे आंदोलन कम्युनिझमसारखं वरकरणी वाटतं. पण टेक्नोक्रसीत राजकीय विचारसरणीला फार कमी वाव आहे.

या आंदोलनाने वर्गसंघर्ष आणि सगळ्या ‘अनावश्यक’ व्यवसांना संपवून टाकण्याची घोषणा केली होती ज्याने इतकी वर्षं माणसाचं शोषण केलं.

हावर्ड स्कॉट यांनी स्वतः भावनेच्या भरात मान्य केलं होतं की, ‘टेक्नोक्रसी विचार इतके डावे आहेत की आम्ही साम्यवादालाही म्हातारं आणि पुराणमतवादी ठरवू.’

कॅनडाच्या एक पत्रकार इरा बीसन यांनी सीबीसी रेडियोसाठी याविषयावर एक डॉक्युमेंट्री बनवली होती.

त्यात त्या म्हणतात, “टेक्नोक्रसीचं प्रत्यक्षात काय उदिष्ट होतं तर तंत्रज्ञानाने लोकांसाठी काम करावं, लोकांनी तंत्रज्ञानासाठी नाही. आपल्याला जगायचं कसं हे शिकायचं होतं. रोजगार कसा कमवायचा हे नाही.”

टेक्नोक्रॅट आंदोलनाने सरकारचं प्रारूप तयार केलं होतं. त्यात म्हटलं होतं की सेवांचं व्यवस्थापन तज्ज्ञांकडून केलं जाईल. जे आपले संचालक निवडतील. या संचालकांचं एक कॅबिनेट बनले जे एका खंडात एक अध्यक्ष निवडतील.

ज्या ‘नॉक्थ अमेरिकन टेक्टोनिक्स’वर त्यांनी आपल्या धोरणांचा पाया रचला होता तो भाग मध्य अमेरिका ते अलास्कापर्यंत पसरला होता.

स्टीफेख म्हणतात की, “आंदोलनाचं मूळ या विचारसरणीवर आधारित होतं की लोक परोपकारी असतील आणि त्यांना स्वतःला व्यक्तिगत महत्त्वकांक्षा नसतील.”

आंदोलनाचं पतन

या काल्पनिक जगाची विचारसरणी 1930 च्या दशकात शिखरावर पोचली होती. पण 1940 च्या दशकात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्य यांच्या नव्या आर्थिक धोरणांमुळे पुन्हा लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला लागले तेव्हा टेक्नोक्रॅट आंदोलनाचा पाया ढासाळायला लागला.

अर्थव्यवस्था सुधारली आणि पैसा पुन्हा बाजारात खेळायला लागला. टेक्नोक्रॅट आंदोलनाची स्वप्न पाहाणारे आता फार कमी लोक शिल्लक राहिले होते.

पण अनंत अडचणींना तोंड देत टेक्नोक्रसी इनकॉर्पोरेशन ही संस्था अजूनही अस्तित्वात आहे. पण या संस्थेचे मोजकेच सदस्य आता शिल्लक राहिलेत. एकेकाळी या आंदोलनाशी संबंधित लोकांची संख्या होती पाच लाख.

टेक्नाटो विचारसरणी आता संपलीये. पण त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही अजूनही गेलात तर तुम्हाला दिसेल एक संदेश, ज्यात लिहिलंय – ‘आमच्याकडे एक योजना आहे आणि ती प्रत्यक्षात येऊ शकते.’

 सन 2015 मध्ये त्यांनी सध्याची मुल्याधारित व्यवस्था बदलून तिला ऊर्जा-आधारित अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी एक ट्रान्झिशन प्लॅन बनवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी तीन इंटर्नही कामाला ठेवले.

त्यांच्या एका प्रदर्शनात तिन्ही इंटर्ननी ग्रे रंगाचा पोलो टी-शर्ट घातला होता आणि त्यावर ‘मोनाद’ चा लोगो होता.  

बीबीसी मुंडोशी ऑनलाईन बातचित करताना टेक्नोक्रसी इनकॉर्पोरेशनच्या मुख्याधिकारी चार्मी गिलक्रेस यांनी त्यांच्या ऑफिसातल्या फाईल्सचा ढीग दाखवला.

अमेरिकच्या टेनेसी राज्यातल्या ग्रामीण भागात स्थित असणाऱ्या या ऑफिसातल्या कर्मचाऱ्यांचं मुख्य काम आता या सगळ्या कागदपत्रांचं डिजिटायझेशन करणं हे आहे. अनेक दशकं चाललेल्या या आंदोलनात काय झालं याची नोंद करणं सध्या इथे चालू आहे.

चार्मी म्हणतात, “इथे लाखो कागदपत्रं आहेत, फोटो आणि मुळ कल्पनांचे आराखडे आहेत. त्याकाळात काय काय घडलं, त्यांनी कसे रस्ते शोधले हे जाणून घेणं रंजक आहे.”

टेक्नोक्रसी इनकॉर्पोरेशनच्या कार्यकारी निर्देशकांनुसार काही वर्षांपूर्वीपर्यंत ते आपल्या सदस्यांना एक न्यूज लेटर पाठवायचे. हे न्यूज लेटर कॅनडा आणि अमेरिकाच नाही तर रशिया, ब्राझील, युक्रेन आणि व्हेनेझुएला अशा देशांमध्ये जायचं.

आता टेक्नोक्रॅट आंदोलन हे सांगत नाही की त्यांचं नक्की किती सदस्य आहेत पण चार्मी हे मान्य करतात की सदस्य खूप कमी आहेत.

त्या म्हणतात की त्यांच्या सदस्यांमध्ये इंजिनिअर आणि वैज्ञानिक प्रवृत्तीचे लोक आहेत पण काही असेही अर्धवट लोक आहेत जे म्हणतात की टेक्नोक्रसीने आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि हत्यारं हातात घेतली पाहिजेत.

मग एक निश्वास सोडून त्या म्हणतात, “आम्ही असं करत नाही कारण आम्ही अराजकीय लोक आहोत.”

या आंदोलनाने कोणता वारसा मागे ठेवला?

चार्मी गिलक्रिस यांना वाटतं की आपण गेली अनेक वर्षं कोणत्या ना कोणत्या प्रकारे टेक्नोटोसारखंच जगत आहोत.

त्या म्हणतात की या आंदोलनाच्या संस्थापकांनी 1930 च्या दशकात ज्या भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यातल्या अनेक आता खऱ्या होताना दिसत आहेत.

“अमेझॉनसारख्या कंपन्यांचं उदाहरण घ्या. त्यांच्याकडे एक सेंट्रलाईज्ड ऑर्डरिंग सिस्टिम आहे. या सिस्टिमला माहितेय की तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि कोणत्या गोष्टीची गरज नाही.

मागणीप्रमाणे या गोष्टींचा स्टॉक आपोआप कमी जास्त होत राहातो. पण यात समस्या अशी आहे की याचा वापर फक्त नफा कमावण्यासाठी केला जातो आणि हा नफा फक्त एक-दोन लोकांमध्ये वाटला जातो.”

जे 1930 च्या दशकात झालं ते आता पुन्हा होणार. नवं तंत्रज्ञान मनुष्यबळाची जागा घेणार. कन्सलटन्सी ऑक्सफर्ड इकोनॉमिक्सनुसार 2030 पर्यंत मॅनिफॅक्चुरिंगसारख्या क्षेत्रात 2 कोटी लोकांचा रोजगार रोबोटमुळे जाणार आहे.

आपण जगाकडे कसं बघायचं, कसा विचार करायचा हे कॉम्प्युटर अल्गोरिदम आपल्याला सांगतात. इंजिनिअर आपल्या आयुष्यातले प्रश्न आणि परिस्थितींवर तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तर शोधतात.

कॅनेडियन टेक्नोक्रॅट नेते जोशुआ हडरलमॅन यांचे नातू इलॉन मस्क यांना वाटतं की, “भविष्यात अंगमेहनतीच्या कामाला पर्याय असेल त्यामुळे जागतिक स्तरावर सर्वांना किमान वेतन मिळणं ही एक गरज ठरेल.”

सिलिकॉन व्हॅली टायकून अँड्र्यू यांग यांनीही अशाच प्रकारच्या प्रस्तावाचा आराखडा सादर केला आहे.

टेक्नोक्रॅट आंदोलनाने विचारलेले प्रश्न आजही संयुक्तिक आहेत जसं की – तंत्रज्ञानच्या वापरामुळे ज्या नोकऱ्या कमी होत आहेत त्यावर उत्तर कसं शोधायचं? साधनसंपत्तीचा वापर मानवी शोषणशिवाय कसा करायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असमानता कशी संपवायची.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)