You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. अर्थसंकल्प 2023: निवडणुकांवर डोळा ठेवून करण्यात आल्या या घोषणा
2024 पर्यंत सरकारमार्फत गरिबांना मोफत तांदूळ आणि गहू पुरविण्यात येईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय.
यासाठी सरकारने दोन लाख कोटींची आर्थिक तरतूद केली असून बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय भाषणावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'एक असा भारत बनवण्याचा प्रयत्न असेल जिथे सर्वांसाठी सुखी जीवन असेल आणि अशा भारताची निर्मिती करण्यामध्ये सर्वांचा सहभाग असेल.'
2020 मध्ये आलेल्या कोरोना साथीच्या काळात लोकांच्या पोटापाण्यावर मोठा परिणाम झाला होता. यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची योजना सुरू केली होती.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार या योजनेसाठी पावणे चार लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकार एका वर्षात दोन लाख कोटी रुपये खर्च करेल.
मोफत अन्नधान्य योजनेचा कार्यक्रम 2022 मध्येच संपणार होता. पण तो आता वाढवण्यात आला आहे.
2. गौतम अदानींवर 20 हजार कोटींचा 'यू टर्न' घेत एफपीओ रद्द करण्याची वेळ का आली?
भारतीय शेअर बाजारात सध्या अभूतपूर्व चढउतार पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण आहे गौतम अदानी यांच्या मालकीचा अदानी समूह.
गेल्या आठवड्यात अमेरिकन रिसर्च एजन्सी हिंडनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आणि अदानी समूहाचे शेअर्स कोसळायला सुरुवात झाली.
दरम्यान, बुधवारी (1 फेब्रुवारी) रात्री गौतम अदानी यांनी अदानी एंटरप्रायजेसचा 20 हज़ार कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करत असल्याची घोषणा केली. हा भारतातला आतापर्यंतचा सर्वांत मोठा एफपीओ होता. या एफपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असल्याचं अदानी यांनी म्हटलं.
ही घोषणा आश्चर्यचकित करणारी होती. कारण मंगळवारीच (31 जानेवारी) अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओ पूर्णपणे सब्सक्राइब झाला होता.
3. आमीर खानला जे जमलं नाही, ते शाहरूखने कसं करून दाखवलं?
“मी चार दिवसांत मागची चार वर्षं विसरून गेलोय.”
चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खानचा पठाण रिलीज झाला आहे. या सिनेमाने पाच दिवसांत जगभरात पाचशे कोटींहून अधिक कमाई करत विक्रम केला आहे. या यशाचा आनंद शाहरूखच्या चेहऱ्यावरून, त्याच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट दिसत होता.
पठाणचं यश सेलिब्रेट करण्यासाठी शाहरूखने 30 जानेवारीला माध्यमांशी संवाद साधला. या प्रेस कॉन्फरन्समध्ये शाहरूख त्याच्या पूर्वीच्याच हसऱ्या, आनंदी रुपात पाहायला मिळाला. चेष्टा-मस्करी करत, प्रश्नांना हजरजबाबीपणे उत्तरं देणारा शाहरूख काही वेळा भावूक झालेलाही पाहायला मिळाला.
शाहरूखने म्हटलं, “मला मनापासून असं वाटतं की, लोकांना आनंद द्यावा. जेव्हा मला हे करण्यात अपयश येतं, तेव्हा इतर कोणापेक्षाही मला सर्वाधिक दुःख होतं. यावेळी मी आनंदी आहे... कारण मी लोकांना आनंद देऊ शकलो.”
4. एका छोट्या कॅप्सूलची दहशत... जवळून जाणंही बेतू शकतं जीवावर...
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात एक छोटी रेडिओ अॅक्टिव्ह (किरणोत्सारी) कॅप्सूल गायब झाल्याने खळबळ उडाली होती. बरीच शोधाशोध करून हरवलेली ही कॅप्सूल सापडली.
ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, "आपत्कालीन कर्मचाऱ्यांना ही कॅप्सूल भूशाच्या ढिगाऱ्यात सापडली."
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना , 1400 किलोमीटरच्या प्रवासात ही कॅप्सूल गायब झाली होती.
कॅप्सूल गायब झाल्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली.
5. U-19 Women's World Cup: विश्वविजेत्या भारतीय संघाबाबत जाणून घ्या..
दक्षिण आफ्रिकेत आयोजित पहिल्यावहिल्या U19 ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
अंतिम सामन्यात इंग्लंडचा 7 विकेट्सनी पराभव करत भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी सर्वप्रथम इंग्लंडला 68 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर फलंदाजांनी सावधपणे खेळ करत निर्धारित आव्हान पूर्ण केलं.
सेमी फायनलच्या लढतीत तुल्यबळ न्यूझीलंडचा धुव्वा उडवत भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरी गाठली होती.
पहिल्या वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या युवा भारतीय महिला संघाचं आता जोरदार कौतुक होत आहे. जाणून घ्या, विश्वविजेत्या भारतीय संघातील सर्व खेळाडू -
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)