2024 मध्ये आयुष्यात कशी सुधारणा कराल? विज्ञान म्हणतं...

    • Author, बीबीसी
    • Role, फ्युचर टीम
  • Published

वर्षाची सुरुवात ही आपल्या आयुष्यात महत्त्वाचे बदल करण्याची आणि संकल्प करण्याची चांगली वेळ असते. विज्ञानामुळे आपण या बदलांच्या दृष्टीने काय करू शकतो हे आपण येथे पाहू, काही महत्त्वाच्या टीप्सही येथे पाहू.

नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर तुम्ही कदाचित या वर्षाचा विचार करायला सुरुवात केली असेल. कोणत्या गोष्टी या वर्षात मिळवायच्या आहेत, आपल्याला कोणत्या प्रकारचा माणूस व्हायचं आहे याचा तुम्ही विचार करत असाल. मात्र बहुतांश लोकांना आपण केलेला संकल्प पूर्ण करणे किंवा त्यासाठी चिकाटी ठेवणं कठीण जातं.

पूर्वीच्या काही सर्वेक्षणातून याची माहिती स्पष्ट झाली आहे. साधारणपणे 17 टक्के ते 45 टक्के लोक आपले संकल्प जानेवारी संपताच मोडून टाकतात. बहुतांश लोक वर्षाच्या मध्यावर संकल्पाला निरोप देतात.

अशा प्रकारच्या अपयशामुळे एका वार्षिक चक्रात आपण अडकतो. त्याला मानसशास्त्रज्ञांनी ‘फॉल्स होम सिंड्रोम’ म्हणजे ‘खोट्या-आभासी आशेची मनोवृत्ती’ असं नाव दिलंय.

त्यामुळे साध्य करता येतील अशीच ध्येयं समोर ठेवावीत असं सुचवलं जातं, त्याला पुरावेही आहेत. आपले ध्येय दृष्टिकोन केंद्रित असलं पाहिजे असं संशोधनं सुचवतात.

ही ध्येयं वास्तवाला धरुन असतात, नेमकी असतात आणि त्यांचं यश सहज मोजता येतं. धूम्रपान-मद्यपान बंद करणं अशी एखादी गोष्ट वर्ज्य करणारी किंवा एखादी गोष्ट टाळण्याची जी ध्येयं ठेवली जातात त्यांच्यापेक्षा ही ध्येयं साध्य करता येण्यासारखी असतात.

आता कशावर लक्ष केंद्रित करायचं, हे ठरवणं कठीण ठरू शकतं. त्यामुळे नववर्षाच्या सुुरवातीला आयुष्यातील कोणत्या 7 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं यासाठी काही विज्ञानसंमत युक्ती येथे पाहू.

पहिली पायरी- झोपेवर लक्ष केंद्रित करा

नववर्षाला सुरुवात होते तेव्हा थंडीचा काळ असतो. या काळात आपण जास्त वेळ झोप घेतली पाहिजे असं शास्त्रज्ञ सांगतात.

माणसाची झोप ऋतूंनुसार वेगळी असते असं अभ्यासात दिसलं आहे. म्हणजेच उन्हाळ्यापेक्षा थंडीतल्या अती काळोखांच्या रात्री आपल्याला अधिक विश्रांती लागते.

जर्मनीतल्या एका अभ्यासानुसार लोक जूनपेक्षा डिसेंबर महिन्यात जास्त झोपतात असं दिसून आलं आहे. त्यामुळे झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी लवकर झोपी गेलं पाहिजे.

झोपेआधी किमान दोन तास प्रखर प्रकाश टाळला पाहिजे. तसेच झोपेआधी फोन पाहाणं बंद केलं पाहिजे. चांगल्या झोपेमुळे आपलं पोटही नीट राहातं असं दिसून आलं आहे.

तुम्ही बराचवेळ बिछान्यात राहिल्यावर तुम्ही 'ल्युसिड ड्रिमिंग' या स्थितीचा अनुभव घेऊ शकता. झोपेत राहूनही जाणीवपूर्वक जागरुकतेचा अनुभव या स्थितीत घेतला जातो. या स्थितीमुळे वाईट स्वप्नं कमी होण्यासाठी, समस्यांची उकल करण्यासाठी, सर्जनशील कल्पनांसाठी मदत होते असं अनेक लोक सांगतात.

दुसरी पायरी- शरीराकडे लक्ष केंद्रित करा

तुम्हालाही सतत चुळबूळ करता का? मग त्याचाही चांगला वापर करुन घ्या, सतत पाय हलवणं, गुडघे, बोटांची हालचाल यामुळेही आपल्या कॅलरी खर्च होत असतात आणि ताणही कमी होत असतो.

थंडीच्या दिवसात व्यायाम करणं हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं तसेच रोगप्रतिकारक क्षमताही वाढते आणि पांढऱ्या मेदपेशींचं तपकिरी मेदपेशींत रुपांतर होण्यास मदत होते.

या काळात तुम्ही उलटं चालण्याचा व्यायामही करू शकता. कारण नेहमीसारखं समोर चालण्याऐवजी तुम्ही उलटं चाललात तर जास्त कॅलरी खर्च होतात. तसेच तुमचे पाठीचे स्नायूही बळकट होतात.

ज्या लोकांना गुडघ्याच्या समस्या आहेत त्यांना गुडघ्यावरील सांध्याचा भार कमी होण्यासाठी मदत होते आणि मांडीच्या मागचा स्नायू (हॅमस्ट्रिंग) लवचिक होण्यास मदत होते. यामुळे मेंदूलाही चालना मिळते.

तसंच असं उलटं चालताना अगदी चिखल असेल तरी चालायला लाजू नका. कारण त्यामुळे आपल्या शरीरावर असणाऱ्या सूक्ष्मजंतूंच्या विविधतेत वाढच होते.

त्वचा हा आपला सर्वांत मोठा अवयव आहे. आपल्या एकूणच आरोग्याला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्वचेकडे असते. या त्वचेची सनस्क्रीन आणि मॉइश्चरायजरने काळजी घेतल्यास अधिक तरुण दिसण्यास मदत होते आणि तुमचं जैविक वयही सुधारतं.

तिसरी पायरी- तुमच्या मनावर लक्ष केंद्रित करा

काहीतरी नवं अनुभवल्यामुळे तुम्हाला आनंदी होता येईल. नवी कौशल्यं शिकून तसेच मेंदूचा लवचिकपणा वाढण्यासाठी, नव्या गोष्टींना जुळवून घेण्यास मदत होईल.

तुम्ही बैठकांचा व्यायाम ही करुन पाहू शकता. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हालचाली केल्यामुळे मेंदूला रक्तप्रवाह चांगला होतो आणि यामुळे समस्या उकल करण्याची कौशल्यं तसेच संज्ञानात्मक क्षमता वाढतात.

याबरोबरच तुम्ही स्वतःला आपण तरुण आहोत असा विचार करू शकता. काही अभ्यासांनुसार स्वतःला तरुण समजल्यामुळे आपण जास्त जगू शकतो. तुम्ही पर्वतारोहण करणं, समुद्राकडे पाहात राहाणं, चांदण्या रात्रीत आकाशाचं निरीक्षण करणं असे प्रयोग करुन पाहू शकता.

भव्यदिव्य, आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टीं अनुभवल्यामुळे ताण कमी होतो, स्मृतिला चालना मिळते तसेच आजूबाजूच्या जगाशी आणि लोकांशी नातं निर्माण होतं.

तुम्ही गाणंही म्हणून पाहू शकता, त्यामुळे ताण कमी होतो. तसेच अरोबिक व्यायामांमुळे एंडॉर्फिन हे आनंदाचं रसायन मेंदूत स्रवतं.

याबरोबरच तुम्ही श्वासाकडेही नीट लक्ष देऊ शकता. श्वासाच्या व्यायामांमुळे ताण, चिंता, रक्तदाब कमी होतो. तसेच झोप लागण्यासाठीही त्याची मदत होते.

पायरी चौथी- नात्यांवर लक्ष केंद्रित करा

मित्र मैत्रिणी असणं अत्यंत चांगलं असतं. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता, हृदय-रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहातं आणि आनंदी वाटतं. तुमच्या मैत्रीला व्यायामाची लय मिळाली तर उत्तमच. जे एका लयीत एका गतीने चालू शकतात ते चांगला संवाद घडवू शकतात. एकमेकांना समजून घेऊ शकतात.

तसेच मित्र आपल्या सवयींमध्ये चांगले-वाईट बदलही घडवतात. आपण लोकांमधील अशा चांगल्या गुणांची निवड करू शकतो त्याचा आपल्या वागण्यावर मोठा परिणाम होतो.

तुम्ही क्षमाशील झालात तर त्याचे आपल्या आयुष्यावर अनेक परिणाम होतात. तुला माफ केलं हे म्हणणं कठीण असलं आणि ते खरंच मनापासून करणं अवघड असलं तरी त्यामुळे ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारतं.

पायरी पाचवी- तुम्ही काय खाताय यावर लक्ष केंद्रित करा

समतोल आहार घेणं हे कधीही चांगलंच असतं. जंकफूडचा आपल्या शरीराबरोबर मनावरही परिणाम होतो.

फळं आणि भाज्यांचा विचार केल्यास फक्त हिरव्या भाज्याच नाही तर तुमच्या ताटात वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ म्हणजे फळं, भाज्या असल्या पाहिजेत. त्यामुळे मेंदूचं आरोग्य विकसित होईल आणि तुमच्या अनेक आजारांवर मात करता येईल. कॉफीसारखी पेयं तुम्हाला एका मर्यादेत पिण्याची सवय ठेवता येईल.

पायरी सहावी- फिटनेसवर लक्ष केंद्रित करा

व्यायाम केल्यामुळे शक्ती वाढते, मेद कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारतं. त्यामुळे तुमच्या पोटातील आवश्यक सुक्ष्मजीवांचे संचही विकसित होतात आणि त्याचा आरोग्याला फायदा होतो.

अगदी सुरुवातीला 10000 पावलं रोज चालण्याचं ध्येय ठेवण्यापेक्षा कमी पावलं चालण्याचं ध्येय ठेवता येतील. 5000 पावलांपेक्षा कमी पावलांनी सुरुवात केली तरी चालेल.

तुम्हाला त्याहीपेक्षा कमी वेळात फिट व्हायचं असेल तर तशा इंटरवल ट्रेनिंगसारख्या मार्गांचा वापर करू शकता त्यामुळे तुमचा फिटनेस सुधारेल आणि शरीरात साठलेला मेदही कमी होईल.

पायरी सातवी- छंदांवर लक्ष केंद्रित करा

कधीकधी रिकाम्या वेळेचा आपल्या मनाला मोठा फायदा मिळू शकतो. जे लोक सहज बोअर होतात, लगेच कंटाळतात त्यांना मोबाईल फोनमध्ये वेळ काढण्यासारख्या सवयी लागतात. अशा सवयींचा परिणाम मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होईपर्यंत जातो.

नवा छंद सुरू केला तर मेंदू अधिक तरुण व्हायला मदत होते. सर्जनशीलतेला वाव मिळतो आणि कंटाळा जातो.

उदाहरण पाहायचं झालं तर नोबेल विजेत्या वैज्ञानिकांचं घेता येईल. त्यांना सामान्य लोकांपेक्षा तिपटीने जास्त छंद असल्याचं दिसून येतात. त्यात संगीत, चित्रकला, कविता करणं अशा सर्जनशील गोष्टीत मन रमवायला त्यांना आवडतं असं दिसतं.

पुस्तकं वाचण्याचेही अनेक फायदे आहेत. तुम्ही कादंबऱ्या वाचल्यात तर इतर लोक कसा विचार करत आहेत, त्यांच्या भावना काय आहेत हे समजून घेणं सोपं जातं.

जर तुम्ही मोठ्यानं वाचलंत तर ते फक्त लक्षात राहातं असं नाही तर अवघड विषय समजून घेण्यासही मदत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)