अमेरिकेत न्यू ऑर्लिन्समध्ये ट्रक ड्रायव्हरने घेतले 15 जणांचे प्राण, लास वेगासमध्ये टेस्ला सायबरट्रकचा स्फोट

थोडक्यात
  • या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचं नाव शमसुद्दिन जब्बार असं आहे. तिचं वय 42 असून ती अमेरिकन नागरिक आहे. जब्बारचा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.
  • जब्बार टेक्सस राज्यात राहायचा आणि तो सैन्यातून निवृत्त झालेला आहे.
  • या घटनेसाठी जब्बार एकटा जबाबदार आहे की त्यानं कोणाची मदत घेतली याचा तपास सुरू आहे.
  • या घटनेत वापरल्या गेलेल्या वाहनावर इस्लामिक स्टेटचा झेंडा आढळल्याचं एफबीआयनं सांगितलं आहे. तसेच त्या वाहनात इतर शस्त्रं असण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याबद्दल अधिक तपास सुरू आहे.
  • ही घटना घडवून आणण्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही तसेच या व्यक्तीचा कोणा कट्टरवादी संघटनेशी संबंध आहे का? हे स्पष्ट झालेलं नाही असं एफबीआयनं सांगितलं आहे.
  • याप्रमाणेच अमेरिकेच्या लास वेगास इथं असलेल्या ट्रम्प हॉटेलबाहेर एका टेस्ला सायबरट्रकमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, "ट्रक अपघात घटनेतील आरोपीने हल्ल्याआधी सोशल मीडियावर व्हीडिओ अपलोड केला होता. यावरुन तो इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचे संकेत मिळतात. मात्र लास वेगासमधील सायबर ट्रक स्फोट आणि न्यू ऑर्लिन्स घटनेचा एकमेकांशी संबंध नाही."
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेत नवववर्षाच्या पहाटेच एका ट्रक ड्रायव्हरने जाणूनबुजून केलेल्या अपघातात 15 जणांचे प्राण गेले आहेत.

न्यू ऑर्लिन्सच्या प्रसिद्ध बॉबर्न रस्त्यावर नववर्षाच्या स्वागतासाठी लोकांची मोठी वर्दळ होती. तेव्हाच हा ट्रक लोकांना चिरडत गर्दीत घुसला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत या घटनेत 15 जणांचे प्राण गेले असून 25 जण जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या सांगण्यानुसार चालकानं मुद्दाम ट्रक गर्दीत घुसवला आणि गाडीतून गोळीबारही केला. अमेरिकन माध्यमांच्या माहितीनुसार हा संशयित चालक पोलिसांच्या गोळीमुळे मारला गेला आहे.

स्थानिक पोलीस प्रमुख अॅने किर्कपॅट्रिक यांनी ही व्यक्ती वेगानं पिकअप ट्रक चालवत होती आणि जास्तीत जास्त लोकांना चिरडण्याचा प्रयत्न तिनं केला असं सांगितलं.

त्यांच्या मते, "ही घटना स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वा तीन वाजता घडली. त्यानं बॅरिकेड ढकललं आणि गोळ्या झाडून दोन पोलिसांनाही जखमी केलं."

काय आहे प्रकरण?

स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वातीन वाजता एका व्यक्तीने पिक अप ट्रक वेगानं चालवत बॉबर्न रस्त्यावर गर्दीत घुसवला आणि आतूनच पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

ट्रकने चिरडल्यामुळे जागेवरच 10 जणांचे प्राण गेले होते तसेच तेव्हा 35 जण जखमी झाले होते. त्यात दोन पोलिसांचाही समावेश आहे.

या घटनेचा तपास एफबीआय़ने हातात घेतला आहे,

ल्युझियानाचे ज्येष्ठ वकील लिज मुरील यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहिली आहे, "आपल्यापैकी अनेक जण न्यू ऑर्लिन्समध्ये नववर्षाच्या स्वागताचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांना मुद्दाम मारल्याची बातमी वाचतच आज दिवस सुरू करत आहेत."

या घटनेत बळी पडलेल्या पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करत आहे आणि त्यांना न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करेन असंही त्यांनी लिहिलं आहे.

प्रत्यक्ष साक्षीदारांनी काय सांगितलं?

न्यू ऑर्लिन्सच्या फ्रेंट क्वार्टरच्या बॉबर्न स्ट्रीटचं नाव नाईट लाईफमुळे प्रसिद्ध आहे. इथं अनेक बार, रेस्तराँ आणि क्लब आहेत.

या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्हिट डेव्हिसने बीबीसीला सांगितलं, "आम्ही संध्याकाळपासून या रस्त्यावर होतो. आम्ही बारमध्ये असताना जोरात म्युझिक सुरू असल्यामुळे, गोळीबाराचा आणि गाडी धडकल्याचा आवाज आला नाही. पण नंतर जण इकडेतिकडे पळू लागले, टेबलाखाली लपू लागले, जसंकी एखादी गोळीबाराची ड्रिलच सुरू आहे."

लोकांनी या घटनास्थळापासून दूर राहावं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

न्यू ऑर्लिन्सच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, "शहरातील सुपरडोम स्टेडियमचं संरक्षण करण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी काम करत आहेत. तिथं फुटबॉलचा सामना होणार आहे."

एफबीआयने काय सांगितलं?

एफबीआयनं दिलेल्या एका माहितीत, ट्रक चालक आता जिवंत राहिला नसून अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा एफबीआय या घटनेचा एखाद्या कट्टरवादी घटनेप्रमाणे तपास करत आहे.

एफबीआयच्या स्पेशल एजंट अल्थिया डंकन या प्रकरणाचा तपास करत आहे.

डंकन यांच्यामते, 'घटनास्थळी स्फोटकं सापडण्याची शक्यता आहे, अधिकारी त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत.'

न्यू ऑर्लिन्सच्या महापौर टोया कॅन्टेल म्हणाल्या, "या घटनेची योग्य आणि संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे, आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि ल्युझियानाच्या गव्हर्नरशी संपर्कात आहोत असंही त्यांनी सांगितलं.घटनेची माहिती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना देण्यात आली आहे."