You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
घरातल्या या 4 वस्तू तुम्ही स्वच्छ करत नसाल... तर इकडे लक्ष द्या!
प्रत्येक घर हे वेगळं असतं. घरानुसार घरातल्या वस्तू, सामान बदलत असतं. पण सर्वच घरांमध्ये एका गोष्टीला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे स्वच्छतेला.
लोक आपापल्या वेळेनुसार, सवयीनुसार आणि सवडीनुसार स्वच्छता करत असतात.
काही लोक दररोज स्वच्छता करतात. काही लोक आठवड्यातून घरात स्वच्छता करतात.
तसेच काही लोक या नेहमीच्या स्वच्छतेबरोबर सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा पूर्ण घराची स्वच्छता करतात.
आज काल ‘डिप क्लिनिंग’ नावाने घराची पूर्ण स्वच्छता केली जाते.
अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिंगच्या सर्वेक्षणानुसार 70 टक्के घरं वर्षातून एकदा संपूर्ण स्वच्छता करतात.
अनेक लोकांना स्वयंपाकघराला तर अनेक लोकांना बाथरुमच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यायचं असतं.
आपण बहुतेकवेळा ओव्हन, टॉयलेट, गालिचे यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो कारण तिथं जंतू, बुरशी, किडे आणि बॅक्टेरिया एकवटण्याची शक्यता असते हे आपल्याला माहिती आहे.
परंतु आपल्या घरातील काही वस्तूंकडे, कोपऱ्यांकडे लक्ष जात नाही. तिथंही आपल्या नेहमीच्या वस्तूंपेक्षा जास्त घाण, जंतू साचण्याची शक्यता असते. याबद्दल आपल्याला कल्पनाही नसते.
त्यामुळे अशा चार वस्तूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
या 4 वस्तूंची स्वच्छता तुम्ही नेहमी करत नसाल तर आता यापुढे त्याकडे लक्ष द्या.
कॉफी मशीन
अमेरिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक संरक्षण संस्थेने (एनएसएफ) केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त जंतू साठण्याची स्वयंपाकघरातली जागा असेल तर ती कॉफी मशीन.
कॉफी मशीनचे निरीक्षण केल्यानंतर संशोधकांना तिथं 67 प्रकारचे जंतू आढळले.
कॉफी मशीनच्या बाबतीत दोन समस्या आहेत. एक म्हणजे गरम पाण्याने सर्व प्रकारचे जंतू वाहून जात नाहीत आणि दुसरं म्हणजे बॅक्टेरियाच्या वाढीला कॅफिन मदतच करते.
तसेच त्याच्या वापरामध्ये पाण्यातले क्षार तिथं साचतात मग त्याचा एकप्रकारचा साका तयार होतो आणि मशीनही बिघडते.
त्यामुळे कॉफी मशीन प्रत्येक तीन महिन्यांनंतर एकदा तरी स्वच्छ करावे असं तज्ज्ञ सुचवतात.
ज्या मशीन्समध्ये कॅप्सुल वापरली जाते अशी मशीन 100 युनिटनंतर स्वच्छ करावीत असं ते सुचवतात.
गाद्या
होय... गादी स्वच्छ ठेवणं तितकं सोपं नाहीये. पण माणसाच्या त्वचेवरुन प्रत्येक दिवशी मृत पेशी खाली पडत असतात. त्यातल्या बहुतेक गादीवर पडतात.
रॉयल सोसायटी ओपन सायन्सने 2018 साली याबद्दल एक अभ्यास केला होता. त्यात चिंपांझींनी वापरलेल्या गादीपेक्षा माणसाने वापरलेल्या गादीवर 30 टक्के मृतपेशी आणि जंतू जास्त आढळले.
धूळ, मृत त्वचा आणि घाम यामुळे धुळीवर जगणारे किटाणू आणि बॅक्टेरियांना पोषक वातावरण तयार होतं.
गेल्या काही वर्षांत गादी स्वच्छ करण्याचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत.
तज्ज्ञांनी गादी स्वच्छ करण्यासाठी त्या कडकडीत उन्हात ठेवणे तसेच व्हॅक्युम क्लिनरचा वापर करा असं सुचवलं आहे.
गाद्या उन्हात ठेवल्यामुळे त्यातली आर्द्रता निघून जाते आणि जंतूंच्या वाढीसाठी लागणारं पोषक वातावरण कमी होतं.
किराणामालाच्या आणि खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या
आता हवामान बदलावर चर्चा सुरू झाल्यावर अनेकदा वापरता येतील अशा पिशव्या खरेदीला आणि किराणामाल, भाज्या आणायला वापरा असं सुचवलं जातं.
अनेक घरांनी या पिशव्या वापरायला सुरू केलं पण त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही.
चार्ल्स पी गेर्बा हे अरिझोना विद्यापिठातील सुक्ष्मजंतूतज्ज्ञ आहेत. ते सांगतात, अशा पिशव्यांमध्ये अनेक जंतू आणि इ कोलाय सारखे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर आढळतात. अगदी आपल्या अंडरवेअरमध्ये हे बॅक्टेरिया आढळतील त्यापेक्षा जास्त या पिशव्यांवर ते आढळतात.
याच पिशव्या तुम्ही मटण आणि भाज्या आणायला वापरत असाल तर तुम्ही बॅक्टेरियांचं सॅलड आणि जेवण करत आहात हे निश्चित, अशी ते आठवण करुन देतात.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ क्लिनलीनेसने या पिशव्या आठवड्यातून एकदा हाताने धुवाव्यात असं सुचवलं आहे.
भांडी घासायचा स्पंज
आपल्याला वाटतं भांडी घासायचा स्पंज हा स्वच्छतेचं काम करतो आणि त्याचा संबंध डिशवॉशर सोपशी येतो, साबणाशी येतो त्यामुळे तो स्वच्छ करण्याची गरज नाही. परंतु हे योग्य नाही.
जर्मनीती फर्टवांजेन विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात सिंकमध्ये असणारे जंतू आणि बॅक्टेरिया यापेक्षा जास्त जंतू स्पंजवर असतात.
बाथरुमपेक्षा जास्त बॅक्टेरिया या स्वयंपाकघरातील स्पंजावर आढळतात आणि एका अभ्यासात या स्पंजवर 362 प्रकारचे बॅक्टेरिया आढळले.
सतत आर्द्रतेशी, ओलाव्याशी आलेला संबंध हे यामागचं मुख्य कारण आहे. स्पंजहा सच्छिद्र असल्यामुळे बॅक्टेरिया आणि जंतूंची वाढ व्हायला जागा उपलब्ध होते.
त्यामुळे अशा घातक बॅक्टेरियाची वाढ होऊ नये म्हणून स्पंज आठवड्यातून एकदा क्लोरिन किंवा ब्लिचने साफ करावेत असं तज्ज्ञ सुचवतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)