बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..

Published

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. हक्कभंग म्हणजे काय? याअंतर्गत काय कारवाई होऊ शकते?

खासदार संजय राऊत यांच्यापाठोपाठ विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांकडून अजित पवारांविरोधात हक्कभंगाची सूचना देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या ‘महाराष्ट्रद्रोही’ या वक्तव्याबाबत विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाच्या सूचनेचं पत्र उपसभापतीना दिलं.

विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून बुधवारी (1 मार्च 2023) अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला.

"संजय राऊत यांनी सर्वपचे पक्षीय आमदारांचा अपमान केला असून हा महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे," असं म्हणतं सभागृहाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

तर विधानपरिषदेतही भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालत संजय राऊत यांच्या अटकेचे निर्देश द्यावेत अशी मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.

2. G20 राष्ट्रगट म्हणजे काय? त्यात कुठले कुठले देश आहेत?

G20 राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची सध्या नवी दिल्ली मध्ये बैठक सुरू आहे. 1 आणि 2 मार्च रोजी ही बैठक होणार आहे.

G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे.

1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती.

पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता.

सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे.

3. हिंडनबर्ग प्रकरणी चौकशी समिती स्थापन, अदानी म्हणतात...

हिंडेनबर्ग प्रकरणात चौकशी समिती स्थापन करावी असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून उद्योगपती गौतम अदानी यांनी न्यायलयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.

गौतम अदानी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात ते म्हणतात की "अदानी समूह माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतो.

यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल वेळेत लागेल. शेवटी सत्याचाच विजय होईल."

गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती गठीत आदेश दिले आहेत.

या समितीत ओपी भट्ट, न्यायमूर्ती जेपी देवधर, के.व्ही. कामत, नंदन निलेकणी आणि सोमशेखर सुंदरसन यांचा समावेश असेल.

तर या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे असतील.

4. अमेरिकेत जातिभेदाविरोधी कायदा आणणारी मराठी महिला म्हणते...

भारतात दररोज जात आणि जातिभेदाबद्दल कुठे ना कुठे चर्चा होत असते, बातम्या छापून येत असतात. पण भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडल्यानांतरही जर जात आणि तिच्या आधारावर होणारा भेदभाव पाठ सोडत नसेल तर?

अमेरिकेच्या सिॲटल शहराने जातिभेदविरोधी कायदा आणला आहे. वर्ण, वंश, राष्ट्रीयत्व या आधारावर भेदभाव केला जाऊ नये यासाठी तिथे कायदे अस्तित्वात होतेच, आता त्यात जात या निकषाचीही भर पडली आहे.

हा कायदा आणण्यात पुण्यात जन्मलेल्या, मुंबईत शिकलेल्या आणि आता अमेरिकेच्या सिॲटल शहराच्या सिटी काऊन्सिलच्या (महापालिका) सदस्य असलेल्या क्षमा सावंत यांची महत्त्वाची भूमिका आहे.

हा कायदा, त्यासाठी उभं केलेलं आंदोलन, त्याला होत असलेला विरोध या सगळ्याबद्दल क्षमा सावंत यांनी बीबीसी मराठीशी सविस्तर बातचित केली. वाचा क्षमा सावंत यांची मुलाखत..

5. हार्ट अॅटॅक आला होता, अँजिओप्लास्टी झालीये, आता ऑल इज वेल- सुष्मिता सेन

अभिनेत्री सुष्मिता सेन हिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. स्वतः सुष्मिता हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याबद्दल माहिती दिली आहे.

सुष्मिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, 'की काही दिवसांपूर्वी मला हार्ट अटॅक आला होता. अँजिओप्लास्टी झाली आहे. स्टेन्ट जागच्या जागी आहे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्डिओलॉजिस्टनं माझं मन मोठं असल्याचं सांगितलं आहे.

मला योग्य वेळी मदत केल्याबद्दल अनेकांचे आभार मानायचे आहेत. त्यासाठी एक वेगळी पोस्ट लिहावी लागेल,' असं सुष्मिताने म्हटलं आहे.

ही पोस्ट सगळं काही नीट आहे, हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी असल्याचंही सुष्मिताने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)