You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, शिंदे गटातील आमदाराची मागणी
आज सकाळी विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा असा –
1. उद्धव ठाकरेंच्या नार्को टेस्ट करा, शिंदे गटातील आमदाराची मागणी
शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
ही बातमी TV9 मराठीने दिली आहे.
ते म्हणाले, “तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा 50 खोक्याला विकला गेला.”
याला प्रत्युत्तर देताना कांदेनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले.
“खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा. मी ज्या काँट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा. म्हैसकर, आयआरबी कंपनी आणि तुमची पण नार्को टेस्ट करा. उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला. पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा. किती लोकांना फोन केले, किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे. या कॉन्ट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा,” असं ते म्हणाले.
2. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूचक संकेत
मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा सुरु असतानाच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली.
मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांबद्दल भेटीत चर्चा झाली. यावेळी भोंगे प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचक संकेत दिले आहेत.
या भेटीनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मनसे कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते तपासून घेतले जातील. कोणावरही अन्याय करणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ मी सभा घेत नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय आणि कामच करतोय. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर योग्यवेळी बोलेन.”
3. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सच्या विमानांची हवेत टक्कर होणार होती पण...
नेपाळमध्ये 24 मार्चला एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची दोन विमानं हवेत धडकणार होती. पण नियंत्रण कक्षाने वेळीच वैमानिकांना सतर्क केल्याने मोठा अपघात टळला आहे. विमान प्रशासन अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती 26 मार्चला दिली.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित केले आहे.
नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाचे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी मलेशियातील क्वालालंपूरहून काठमांडूला येणारं नेपाळ एअरलाइन्सचं एअरबस ए-320 हे विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूला येणारं एअर इंडियाचं विमान यांची हवेत टक्कर होणार होती. एअर इंडियाचं विमान 19 हजार फूट उंचीवरून खाली येत होतं, त्याचवेळी नेपाळ एअरलाइन्सचं विमान 15 हजार फूट उंचीवरून उडत होतं.
ही दोन्ही विमानं रडारवर जवळपास असल्याचं दिसताच नेपाळ एअरलाइन्सचं विमान सात हजार फूट उंचीवर खाली आणलं, यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
4. राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर, देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी, 26 मार्चला देशव्यापी ‘संकल्प सत्याग्रह’ केला.
हिमाचल प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा आणि गुजरातसारख्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
ही बातमी लोकमतने दिली आहे.
गुजरातमध्ये पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
श्रीनगरमध्ये, जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे (जेकेपीसीसी) माजी अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एमए रोडवरील पक्षाच्या मुख्यालयासमोर निदर्शने केली.
पंजाब आणि हरयाणातही ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात आला. राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने जयपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारच्या विरोधात सत्याग्रह केला.
मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत भुरिया यांना रविवारी भोपाळमधील कमलापती रेल्वे स्थानकावर ‘रेल रोको’ करण्यात आला. त्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली.
3. नांदेडमध्ये केसीआर यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले आव्हान, म्हणाले...
भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाला महाराष्ट्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यापूर्वी तेलंगणातील शेतकरी कल्याणकारी कार्यक्रम आपल्या राज्यात राबवून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, असे आव्हान दिले आहे.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे 26 मार्चला एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले की, तेलंगण मॉडेलला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ते सर्व राज्यांमध्ये ते हवे आहेत.
ते पुढे म्हणाले, “रयथू बंधू, रयथू भीमा यांसारख्या शेतकरी हिताच्या योजना आणि दलितांच्या निर्मूलनासाठी आखलेल्या योजना तेलंगणामध्ये प्रचलित आहेत आणि त्या सर्व ठिकाणी लागू केल्या जातील जिथे BRS उपक्रम करण्याची योजना आखत आहे.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)